निर्माल्य व्यवस्थापनासाठी शाश्वत मॉडेल

कुंभमेळा प्राधिकरण व मंदिर संस्थानांची 18 ला बैठक

नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळा- 2027 पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीने पार पाडण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने निर्माल्य व्यवस्थापनासाठी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरातील प्रमुख मंदिर संस्थानांचे विश्वस्त आणि प्रतिनिधींची 18 जून रोजी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मंदिर परिसरात निर्माण होणारे निर्माल्य, फुले आणि पूजाविधीनंतर जमा होणार्‍या साहित्याचे वैज्ञानिक पद्धतीने संकलन व प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक यंत्रणा विकसित करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. मंदिर संस्थानांच्या सहभागातून निर्माल्य व्यवस्थापनाची प्रभावी व्यवस्था उभारून गोदावरी नदीचे संवर्धन करणे आणि सिंहस्थापूर्वी कायमस्वरूपी स्वच्छता व्यवस्था निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, सिंहस्थ कुंभमेळा-2027 हा धार्मिक परंपरा आणि पर्यावरणसंवर्धन यांचा समन्वय साधण्याची मोठी संधी आहे. मंदिर संस्थाने, नागरिक आणि विविध घटकांच्या सहभागातून गोदावरी संवर्धनासोबतच नाशिक व त्र्यंबकेश्वरसाठी दीर्घकालीन उपयोगी ठरेल असे शाश्वत मॉडेल विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बैठकीत मंदिर स्तरावरील निर्माल्य संकलन व्यवस्था, आवश्यक सुविधा, वाहतूक व्यवस्था तसेच निर्माल्यावर प्रक्रिया करणार्‍या संस्थांसोबत समन्वय यावरही चर्चा होणार आहे. याशिवाय ‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पनेंंतर्गत संकलित निर्माल्यापासून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याच्या शक्यता तपासल्या जाणार आहेत. त्यातून महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.

निर्माल्यातून पर्यावरणसंवर्धन आणि रोजगार
18 जून रोजी मंदिर संस्थानांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक.
सिंहस्थ 2027 पूर्वी निर्माल्य व्यवस्थापनाचा शाश्वत आराखडा.
गोदावरी नदीसंवर्धन आणि स्वच्छतेला प्राधान्य.
मंदिर स्तरावर निर्माल्य संकलन व प्रक्रिया व्यवस्था उभारणार.
‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पनेतून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याचा प्रयत्न.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी रोजगार निर्मितीवर भर.
मंदिर संस्थानांच्या सहभागातून आदर्श व्यवस्थापन मॉडेल विकसित करण्याचे उद्दिष्ट.

 

A sustainable model for the management of floral waste

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *