अनियंत्रित मालवाहू ट्रकची दुचाकीला धडक एक कामगार ठार

सिन्नर ः प्रतिनिधी
सिन्नर बायपासवरील डुबेरे पुलाजवळ गुरुवारी (दि. 8) सकाळी अनियंत्रित झालेल्या मालवाहू ट्रकने पुढे चाललेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रक रस्त्यावर उलटला. या भीषण अपघातात दुचाकीस्वार रामदास रामकृष्ण पोटे (52) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेले त्यांचे मित्र प्रकाश साबळे (55) गंभीर जखमी झाले.
रामदास पोटे व प्रकाश साबळे हे खिरविरे (ता. अकोले, जि. अहमदनगर) येथील रहिवासी असून, सिन्नरच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत नोकरीस होते. बुधवारी रात्री नाईट शिफ्ट आटोपून गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ते दुचाकी (क्र. एमएच -05, एएच -9033)वरून बायपासने खिरविरेकडे जात होते.
डुबेरे पुलाजवळ नाशिककडून पुण्याच्या दिशेने येणार्‍या अशोक लेलँड कंपनीच्या मालवाहू ट्रकने (क्र. जीजे 18, बीटी- 3144) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेनंतर ट्रक अनियंत्रित होऊन उलटला. अपघातात रामदास पोटे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रकाश साबळे यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मृताचा भाऊ पंढरीनाथ रामकृष्ण पोटे (45) यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक हेमंत तांबडे करीत आहेत.
दरम्यान, अपघातानंतर काही काळ सिन्नर बायपासवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सातत्याने घडणार्‍या अपघातांमुळे बायपासवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

A worker was killed when an uncontrolled cargo truck hit a two-wheeler

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *