आभाळमाया


मायेचे हृदय हे प्रेम, वात्सल्य, आभाळमाया यांनी भरलेल असतं. ती करुणामय मायमाऊली असते म्हणूनच तिला माय म्हणत असावेत.
असे म्हटले जाते की, माय मरो अन् मावशी जगो. मायची माया मिळाली नसेल तर ती एखाद्या तुटलेल्या सरीतून मोती विखुरले जावेत तशी ती आपल्या सभोवताली विखुरली आहे. तिला ओळखावे तिची संवेदना मनामनांत असावी. मायेचा सुगंध हा सर्वत्र पसरलेेला आहे. आपल्या काळ्या मातीलाही असा सुगंध लाभला आहे. हा सुगंध आपणही दरवळू द्यावा. त्यास मोकळी वाट मिळावी. जसा कधी भुंग्याप्रमाणे फुलातील मुग्धरस अलगद टिपता यावा…या निसर्गसृष्टीत, चराचरात, कणाकणात मायेची सावली वसली आहे. तिला पारखण्यासाठी अंतर्मनात भावनांना स्थान असले म्हणजे मायावी नगरी समजते. अशा नगरीत आपलेही स्वागत होते..
येथील माया ही मधाळ असावी..न मोजता येणारी…न बघता येणारी..विलक्षण…जाणिवेतून स्पर्श करणारी आभाळमाया…यात भुकेल्यास-अन्न, तहानलेल्यास-पाणी, पीडितास-दवा दुवा, वेदनेवर फुंकर, निराधारास-आधार, वाटसरूला वाट मिळत जावी..निसर्गाप्रमाणेे बहरावी.. जादूने वार्‍याच्या वेगात सर्वत्र पसरावी. अशी ही माया आभाळाप्रमाणे सर्वत्र व्यापलेली असेल तर आभाळमायेतून कधी प्रेमाचा, उदारतेचा वर्षाव झाला तर कोणीही मायेविना पोरका राहणार नाही.

शुभांगी माळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *