वासवदत्ता अग्निहोत्री
आपल्या पृथ्वीच्या भूगोलात एक चतुर्थांश जमीन आणि तीन चतुर्थांश पाणी आहे.म्हणजेच पाण्याचा वेढा मोठा, त्यातही खाऱ्या पाण्याचा…अश्रूंचा स्वाद काहीसा खारट असतो. मानव जन्माला येतो तो रडतच. मूल जन्माला आल्याबरोबर लवकर रडले पाहिजेच, त्यावरून त्याच्या आरोग्याची खात्री करण्यात येते. जन्मापासून त्याला काहीच उमगत नसते. त्याच्याजवळ फक्त एकच व्यवस्था असते ‘रडणे’ त्यामुळेच त्याची भूक शमते. तान्ह्याची एकच गरज असते आणि ती रडून तो पूर्ण करतो, त्यानंतर बऱ्याच वेळेस तो रडणे याला आपले योग्य हत्यार ठरवून वापरतो. माणसाच्या स्वभावात रडणे हे अगदीच प्राथमिक असते.
पुढील आयुष्यात अनेक वेळेस अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते, पण प्रगल्भ झाल्यावर त्याला प्रतिकार करण्याचे अनेक दुसरे उपाय सापडतात आणि तसा त्याचा विकास होत जातो.
सुदूर राजस्थानात कुणाच्याही घरात मृत्यू झाल्यानंतर, त्याना मोठ्याने विलाप करण्याची बंदी असते. त्या घरातील स्त्रिया आणि पुरुष मूक आक्रंदन करतात म्हणून त्या आणि आसपास च्या क्षेत्रात ‘रूदाली ‘ म्हणून बायकांची एक जमात असते. त्या स्त्रिया काळे कपडे परिधान करतात, म्हणजे शोकस्वरूप आणि घुंगट काढून धाय मोकलून मृत व्यक्तिच्या घरात जाऊन रडतात. त्याच्या मोबदल्यात त्याना पैसे, धान्य, वस्त्र देण्याची पद्धत आहे.ही पद्धत तिथे खूप प्रचलित आहे. आपले जीवन दोन तत्वावर टेकले आहे, उर्ध्वगामी आणि अधोगामी,जसे एका नेण्याच्या दोन बाजू असतात, हसणे आणि रडणे. दोन्हीचा अतिरेक एकच वाटू शकेल इतके त्यांच्यात साम्य आहे आणि दोन्ही एकदम भिन्न वाटवेत असे त्याच्यात भिन्नत्व सुध्दा आहे. माझे म्हणणे त्यावरून लक्षात येईल कि खूप हसून हसून पुरेवाट झाली की डोळ्यातून पाणी येते आणि खूप दुखाःत असल्यावर माणूस हसतोय असा भास होतो. दोन्ही नैसर्गिक क्रिया आहेत. बाळ म्हणून रडते की त्याचे रडणे आईपर्यंत पोहोचावे आणि त्याची त्यावेळची गरज पूर्ण व्हावी. कळायला लागल्यानंतर त्याला वाचा फुटते, शब्द ज्ञान होते, विचार करण्याची, वयोमानानुसार शक्ति येते आणि त्याची वाढ रडल्या शिवाय होऊ लागते.
आक्रंदन याला पुराणात खूप रंगवले गेले आहे पण प्रत्येक वेळेस विलाप हा हृदयापासून झाला असेल तरच फळला आहे असे अनेक कथेतून आपल्याला कळते. उदाहरणार्थ हत्तीचा पाय जेव्हा सुसर धरते आणि तो श्रीविष्णू ला खूप आळवतो . त्याचा विलाप, आक्रंदन विष्णू पर्यंत पोहोचते आणि विष्णू, सुदर्शन चक्राने सुसरीचा संहार करतात. प्राण्यांत अहंकार नसतो पण माणूस अहंभावा विना संभवतच नाही. कौरव सभागृहात जेव्हा द्रौपदी ला ओढून आणले गेले त्यावेळेस तिला आपल्या पतींचा विश्वास होता, अहंकार होता. नंतर एक एक करून जेव्हा सर्वचजण हरले त्यानंतर तिने केशवास आळवले,पूर्ण समर्पित झाली, अहंकार संपूर्ण सोडून, आणि तिला तत्क्षणीच मदत मिळाली. शरीराला कुठेही अपघात झाला की त्याचे दुखः निराळे असते पण मनाला दुखापत झाली की अंतर्बाह्य दुःख व्यक्त होते. मन चीत्कार करत असते आणि अश्रू त्याच्या असह्य स्वरूपात डोळ्यातून बाहेर वहात असतात. अश्रूंच्या वहाण्याने दुःख कमी होते काय?मुळीच नाही पण दुःखाची परिणिती बाहेर पडल्याने इतर जणांना आपल्या दुःखाची जाणीव होते आणि चार सांत्वनाचे शब्द ऐकून बरं वाटते. आपण रडण्याला दुःखाचा पर्याय समजतो पण तो फक्त व्यक्त करण्याचा एक उपाय आहे.
खरे रडणे आणि खोटे रडणे हे सुध्दा आक्रंदनाचे प्रकार आहेत. खोटे रडणार्याला वाटते की आपले अश्याप्रकारे रडणे इतरांना कळणार नाही पण असे रडणे अगदी बालिश दिसते आणि चारचौघात त्याचे हशे होते. खरोखर रडणारा आत्म्यापासून दुःख व्यक्त करतो. त्याचे अंतर्मन शोकमग्न असते, तेव्हाच त्याच्या डोळ्यातील अश्रू इतरांच्याही पापण्या ओलावण्याला कारणीभूत होतात. आपल्या जीवनातील दोन महत्त्वपूर्ण घटक आईवडील यांच्यावर कितीतरी असले प्रसंग येतात. आईचे हृदय मऊ असते, तिचे डोळे चटकन भरून येतात मग काय वडिलांना दुःख कमी होते काय?नाही पण आपल्या सामाजिक व्यवस्थेत पुरुषाला रडण्याची मनाही आहे, त्याने नेहमीच खंबीर राहून कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायचे असते, कारण त्याच्यामुळेच एक कुटुंब तरणार असते, त्याच्यामागे एक लवाजमा असतो, पत्नी मुले, आईवडील, त्याला रडून चालणार नाही. अनेकवार बऱ्याच लोकांना आपले दुःख कुरवाळीत बसायची सवय असते. असे लोक फार कमी आनंदी राहू शकतात. कुठल्याही गोष्टीपासून ते दुःखी होऊ शकतात. सहानुभूतीदार समोर असेल तर त्यांचे घोषित अघोषित दुःख उन्मळून येते आणि आपल्यातली नकारात्मकता ते भोवतालच्या वातावरणात पसरवतात.
विरहात दुःख असते. त्यावर साहित्यिकांनी नेहमीच पाने रंगली आहेत अगदी कृष्ण गवळणींना सोडून मथुरेला गेल्यापासून ते आजतागायत नायक परदेशात गेल्यावरही विरहाचे दुःख म्हणजे कवींचा आवडता विषय आहे. शोक हा खरतर अगदी मनाच्या गाभाऱ्यातून आला तरच तो खरा असतो. आक्रंदन हे माणसासोबत येते आणि माणूस सोडून गेल्यानंतर आप्तांना काही दिवस शोकमग्न करते. ‘जन पळभर म्हणतील हाय हाय….’ त्यानंतर जग आपल्या प्रपंचात सर्व विसरते. अगदीच जवळच्या व्यक्तीलाही थोडे जास्त दिवस दुःख होते मग हळूहळू सर्व सामान्य होतात. आक्रंदनाचे मूळ कारण लक्षात घेऊन त्याचे प्रदर्शन कमीत कमी करण्याचा हा काळ आहे. धावपळीच्या जीवनात स्वतःचे दुःखच इतके असतात की इतरांच्या दुःखाला बघायला, समजून घ्यायला वेळ फारच कमी आहे.आपले दुःख लवकर विसरून आपणच आपली शुश्रूषा करावी. हेच काळाचे मागणे आहे.सुख दुःख या सर्व परिस्थिती माणसानेच निर्माण केलेल्या असतात. कुणासोबत अत्यंत मोह, तितक्याच शोकाचे कारण तयार करतो आणि कुणाबद्दल चा संताप तितकाच क्षोभ उत्पन्न करतो. आनंदाचीही तीच गत असते. माणसाभोवती हेच चक्र फिरत असते म्हणतात ना…
“संसार जाल पतितस्य जग्न्निवास….”
वासवदत्ता अग्निहोत्री.