थकबाकीदारांसाठी आजपासून अभय योजना

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिका प्रशासनाकडून थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही 95 टक्के माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी अभय योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने पालिकेच्या महसुलात वाढ झाली होती. पालिकेवर थकबाकीचा पाचशे कोटींचा डोंगर वाढला असून, शास्ती माफीतून सदर थकबाकी कमी होण्यास मदत होणार आहे.
सदर योजनेसाठी तीन टप्पे ठरवण्यात आले आहे. 1 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत 95 टक्के दंड माफ, 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत 85 टक्के दंड माफ करण्यात येणार आहे. मालमत्ताधारकांनी त्याचा लाभ घेत कर भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आर्थिक सवलत मिळत असल्याने मालमत्ताधारकही त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतात. मागील वर्षी या तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल 110 कोटींचा मालमत्ता कर भरणा झाला होता. त्यामुळे मनपाला सवलत योजना हमखास पावते व मनपाची तिजोरी मालामाल होते हे पहायला मिळते. यंदाही दरवर्षीप्रमाणे सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत ही सवलत योजना लागू राहणार आहे.
यंदा महापालिकेने रेकॉर्डब्रेक 256 कोटींचा मालमत्ता कर वसूल केला. त्यात सवलत योजना महत्त्वपूर्ण होती. नियमित करदात्यांना प्रोत्साहन म्हणून महापालिका करसंकलन विभाग सवलत योजना राबवते. मालमत्ताधारकांनी सवलतीच्या कालावधीत कर भरणा केल्यास त्यांना एकूण बिल रकमेवर आठ टक्के सूट दिली जाते. हाच कर भरणा ऑनलाइन अदा केल्यास दहा टक्के
सूट मिळते.

योजनेचा कालावधी     दंड माफी
1 सप्टेंबर ते
1 ऑक्टोबर       –               95 टक्के
1 नोव्हेंबर ते
30 नोव्हेंबर      –              85 टक्के

 

मालमत्ताधारकांनी करभरणा करून सवलतीचा लाभ घ्यावा. महापालिका प्रशासनाने नियमित करदात्यांसाठी सवलत योजना लागू केली आहे.
– अजित निकत, उपायुक्त, करसंकलन विभाग, मनपा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *