संपादकीय

अपघात अन् भविष्यवाणी

अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या दुर्घटनेत 275 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. मृत्यूचा हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या अपघाताने विज्ञान व तंत्रज्ञानावर असलेल्या मर्यादा अधोरेखित केल्या आहेत, तर दुसरीकडे या अपघाताबाबत काही तथाकथित भविष्यवेत्त्यांंनी याअगोदरच या अपघाताबाबत वेळ व तारखेनुसार भविष्यवाणी केलाचे दावे सोशल मीडियावर सुरू आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानामुळे माणसाचे जीवन सुखकर झाले असले, तरी या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन समाजात अंधश्रद्धा पसरविण्याचे काम काही तथाकथित व्यक्तींकडून सुरू आहेत. श्रद्धेच्या आडून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे हे प्रकार विश्वगुरू म्हणून वाटचाल करणार्‍या भारतासाठी धोकादायक ठरू शकतात. विज्ञानसुद्धा श्रद्धेवरच अवलंबून आहे. ती श्रद्धा कामात असेल अथवा एखाद्या गोष्टीचा शोध घेण्याबाबत असेल. मात्र, या श्रद्धेची जागा अंधश्रद्धेने घेतली की, विनाशाकडे वाटचाल सुरू होते. तेथे तंत्रज्ञानदेखील फोल ठरते. अहमदाबाद विमान दुर्घटनेत अनेकांनी आपले आप्तेष्ट गमावले आहेत. दुर्घटना होऊन चार दिवस झाले असले, तरी याबाबत रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. कोणी काही दिवसांनी लग्नाच्या बोहल्यावर चढणार होते, तर कोणी नोकरीच्या शोधात निघाले होते. कोणी लग्न समारंभासाठी परदेशातून भारतात आले होते, तर कोणी आपल्या मुलांना भेटण्यासाठी परदेशात निघाले होते. या दुःखात सारा देश बुडाला असताना सोशल मीडियावर मात्र या अपघाताची भविष्यवाणी आधीच करण्यात आल्याचे दावे सुरू आहेत. चौधरी गोगराज नेहरा यांनी 1 डिसेंबर 2024 ला या विमान दुर्घटनेची भविष्यवाणी केल्याचा दावा केला आहे. त्यांनी दुर्घटनेची तारीख व वेळदेखील आपल्या या पोस्टमध्ये दिली आहे. मात्र, या पोस्टची खातरजमा न करता अनेक जण अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या या रील व्हायरल करत आहेत. या गोगराज चौधरींबाबत विशेष अशी माहिती उपलब्ध नाही. त्यांनी मीडियासमोर येत आपण ही भविष्यवाणी केल्याचा व ती खरी ठरल्याचा अद्याप दावा केलेला नाही. मात्र, त्यांचे तथाकथित भक्त रील्स बनवून न पटणारे दावे करत आहेत. या विमान दुर्घटनेने सारा देश हळहळला असताना सोशल मीडियावरील झुंड मात्र रील्स बनवण्यात व्यस्त आहे. मोबाईलमुळे सारी दुनिया आपल्या तळहातावर एकवटली असली, तरी माणुसकी मात्र हरवत चालली आहे. एखाद्या अपघातात तत्परतेने मदत करण्याऐवजी हा अपघात आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करण्यासाठी अनेक हात सरसावतात. हेच हात मात्र मदतीसाठी थरथरतात. सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या याच रीलमध्ये गोपालशास्त्री व्यास या व्यक्तीच्या नावाने दुसरा दावा करण्यात आला आहे. 12 जून रोजी भारतासहित चीन, अमेरिका, फ्रान्स या देशांत विमान पडण्याच्या मोठ्या दुर्घटना घडतील व त्यात नामवंत व्यक्तीचा मृत्यू घडेल, असा दावा करण्यात आला आहे. ही पोस्ट 31 मे रोजीची असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, गोपालशास्त्री व्यास नावाची व्यक्ती कोण आहे, हे कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे, गोगराज चौधरी यांच्याप्रमाणेच गोपाळशास्त्री व्यास यांनी मीडियासमोर येऊन हा दावा केलेला नाही. सोशल मीडियावरील ही झुंड एवढ्यावरच थांबली नाही. 12/6 म्हणजेच 12 जून रोजी अहमदाबाद विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. रूपाणी यांच्यासाठी 1206 हा नंबर लकी असल्याचे सांगण्यात आले आहे, पण तोच आता दुर्दैवाने अनलकी ठरला आहे. त्यांच्या गाडीचा नंबर बारा शून्य सहा असा दाखवण्यात आला आहे. मात्र, ज्या गाड्या दाखवल्या आहेत त्यातली फोरव्हीलर आणि टूव्हीलर पाहिली तर रूपाणी यांच्याकडे खरंच एवढ्या स्वस्तातल्या गाड्या असतील का, असा प्रश्न निर्माण होतो. दुर्घटना ही दुर्घटनाच असते. त्यामागील कारणांचा तांत्रिक व शास्त्रीयदृष्ट्या शोध घ्यावा लागतो. भविष्य वर्तवण्यापेक्षा वर्तमानात अशा घटना घडणार नाहीत, याबाबत रणनीती आखली जाते. अहमदाबाद विमान दुर्घटनेचा तपास विविध आठ यंत्रणांकडून सुरू आहे. घातपातापासून ते अपघातापर्यंत याबाबत तपासणी सुरू आहे. मात्र, दुसरीकडे या घटनेबाबत डिसेंबर व मे महिन्यात भविष्यवाणी करण्यात आली होती, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. अशा दाव्यांमुळे मूळ घटनेकडे दुर्लक्ष होतेच, पण त्याला वेगळे वळण लागते. सोशल मीडियावरील ही झुंड एवढ्यावर थांबली नाही तर मिड डे या दैनिकात त्याचदिवशी प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीचा संबंध या अपघाताशी जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला आहे.

विविध विद्युत खेळण्यांसंबंधित असलेल्या या जाहिरातीत एअर इंडियाच्या विमानाचा अर्धवट भाग एका इमारतीवर दाखवण्यात आला आहे. या जाहिरातीचा संबंध या अपघाताशी जोडणे सुरू आहे. तपास यंत्रणा जेवढ्या बारकाईने या दुर्घटनेचा शोध घेत नसतील त्याहीपेक्षा जास्त बारकाईने या घटनेचा संबंध विविध गोष्टींची जोडण्याचा प्रयत्न सोशल मीडियावर सुरू आहे. लाइक, शेअर, सबस्क्राइब या तीन शब्दांवर या सोशल मीडियाची सध्या मदार टिकून आहे. तंत्रज्ञानाचा योग्य फायदा घेत अनेक कंपन्यांनी सोशल अ‍ॅप नावाचे तंत्र मोबाईलमध्ये विकसित करून हाताला मळ लागणार नाही अशाप्रकारे आपला व्यवसाय विकसित केला आहे. तरुण पिढी दिवसेंदिवस या अ‍ॅपच्या आहारी जाऊन येईल ते पुढे ढकलण्याच्या कामात माहीर बनली आहे. सध्या तरी या सोशल मीडियावर कसलेही बंधन नाही. काय व्हायरल करायचे आणि काय नाही, याचे तारतम्य पाळले जात नाही. विधायक कामाऐवजी बिनकामाच्या गोष्टी व्हायरल करून आपण किती मीडियासॅव्ही आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका मोठ्या विमान दुर्घटनेतून देश सावरला जात असताना आता पुन्हा खराब हवामानामुळे केदारनाथ येथे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात सात जणांनी आपला प्राण गमावला आहे. यात महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील तीन जणांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत मूळ घटनेपासून, मुद्द्यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यापेक्षा सामाजिक भान जपणे केव्हाही चांगले. अन्यथा भविष्याच्या शोधात आपण आपला वर्तमान हरवून बसू.

Gavkari Admin

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

16 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

16 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

17 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

17 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

17 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

17 hours ago