सिडको : प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग दुसर्या दिवशी रविवारी सायंकाळी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणारे, टवाळखोरी करून नागरिकांना त्रास देणारे तसेच संशयास्पदरीत्या वावरणार्या व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. या मोहिमेत एकूण 105 जणांवर विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली.
सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ कांबळे, मिलिंद नवगिरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती गवांदे, पोलीस हवालदार किशोर पाटील यांच्यासह अंबड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.
दरम्यान, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईबाबानगर, पवननगर, संभाजी स्टेडियम परिसर, गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक, त्रिमूर्ती चौक, खुटवडनगर, उत्तमनगर आदी भागांत पोलिसांनी विशेष तपासणी केली. यावेळी संशयित व्यक्तींची चौकशी, वाहनांची तपासणी तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणार्यांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्यात आली. गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि सार्वजनिक शांतता कायम राखणे हा या विशेष मोहिमेचा उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Action taken against 105 loafers in the CIDCO area.