44 किलो प्लास्टिक जप्त; 21 हजार रुपये दंड वसूल
येवला : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी येवला नगर परिषदेच्या वतीने पुन्हा एकदा शहरात धडक कारवाई करण्यात आली. मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील आठवडे बाजार
परिसरासह विविध भागांत ही मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईदरम्यान बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व इतर प्लास्टिक साहित्याचा वापर करणार्या व्यापार्यांवर कारवाई करण्यात आली. नगर परिषद पथकाने एकूण 44 किलो प्लास्टिक जप्त केले. नियमांचे उल्लंघन करणार्या दुकानदारांकडून 20 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला.
प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. नाले, गटारी व जलवाहिन्या तुंबण्याच्या समस्या निर्माण होते. जनावरांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याने शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक व व्यापार्यांनी पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
कारवाईला सहकार्य करावे
पालिकेच्या स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे यांनी सांगितले की, प्लास्टिकबंदी नियमांचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध कारवाई यापुढेही नियमित सुरू राहणार आहे. व्यापारी व नागरिकांनी बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर टाळून नगर परिषदेच्या कारवाईस सहकार्य करावे. या मोहिमेत पालिकेतील स्वच्छता अधिकारी दीपक जावळे, प्रकल्प अधिकारी संदीप बोढरे, कर्मचारी लखन बाकळे, वृषाली अहिरे, राहुल जाधव आदींनी सहभाग घेतला. शहर स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी अशी कारवाई सातत्याने करण्यात येणार आहे.
Action taken against plastic ban violations in Yeola