जलाशयांतील अनधिकृत पाणी उपशावर प्रशासनाचा वॉच!

डोंगळे, अनधिकृत मोटारी व अनधिकृत वीज जोडण्यांवर होणार कारवाई ; निफाड तालुक्यात 11 मंडळांत भरारी पथके नियुक्त

निफाड : तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील जलाशय, नदी, नाले, तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तसेच कालव्यांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत जलसाठ्यांचे संरक्षण आणि पाण्याच्या अनधिकृत वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुक्यातील 11 महसूल मंडळांमध्ये स्वतंत्र भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सायफन पद्धतीने होणारा पाणी उपसा, अनधिकृत मोटारी, अनधिकृत वीज जोडण्या आणि अन्य गैरप्रकारांवर ही पथके नियमित पाहणी करून कारवाई करणार आहेत.
निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दि. 17 नोव्हेंबर 2026 रोजी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. त्यानुसार निफाड, रानवड, पिंपळगाव (ब.), पालखेड, सायखेडा, ओझर, चांदोरी, देवगाव, लासलगाव, नांदूरमध्यमेश्वर आणि विंचूर या 11 मंडळांसाठी भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्य जलनीतीनुसार पिण्याचे पाणी, शेती आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. मात्र, जलाशय, नद्या, तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि कालव्यांमधून होणार्‍या अनधिकृत पाणी उपशामुळे पाणीसाठ्याच्या नियोजनावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर शासन निर्णय आणि वरिष्ठ कार्यालयांच्या निर्देशानुसार तालुकास्तरावर ही विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रत्येक मंडळातील भरारी पथकात जिल्हा परिषद, महावितरण, महसूल आणि पोलीस विभागातील अधिकार्‍यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद शाखा अभियंता प्रशांत किशोर आराक यांच्याकडे सर्व मंडळांतील पथकांच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. महावितरणचे अधिकारी अनधिकृत वीजजोडण्या आणि विद्युत उपकरणांची तपासणी करणार आहेत. महसूल विभागाचे मंडळ अधिकारी प्रत्यक्ष पाहणी व कारवाईच्या प्रक्रियेत सहभागी होतील, तर पोलीस विभाग आवश्यक सहकार्य करणार आहे. भरारी पथकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील जलाशय, नदी, नाले, तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि कालव्यांची नियमित पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाहणीदरम्यान अनधिकृत पाणी उपसा, सायफन पद्धतीने पाणी वळविणे, विनापरवानगी मोटारी बसविणे, अनधिकृत वीजजोडण्या किंवा अन्य गैरप्रकार आढळल्यास संबंधित विभागाच्या समन्वयाने तातडीने नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
विशेष म्हणजे, पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेल्या जलसाठ्यांचा अन्य कारणांसाठी अनधिकृत वापर होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारीही पथकांवर सोपविण्यात आली आहे. कारवाईदरम्यान आढळलेल्या प्रकरणांची नोंद ठेवून केलेल्या कारवाईचा नियमित अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व भरारी पथकांच्या कामकाजावर तहसीलदार, निफाड हे संनियंत्रण ठेवणार असून, पथकांनी केलेल्या पाहणीचा आणि कारवाईचा अहवाल नियमितपणे सादर करण्याचे आदेशात नमूद आहे. पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेशी संबंधित ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याने सर्व संबंधित अधिकार्‍यांनी वैयक्तिक लक्ष घालून जबाबदारीने काम करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात नियमानुसार वैधानिक कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

जलसाठ्यांमधील उपलब्ध पाणी जपणे, पिण्याच्या पाण्याची गरज प्राधान्याने भागविणे आणि अनधिकृत पाणी उपशाला आळा घालणे, या उद्देशाने प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे आता तालुक्यातील जलाशय, नद्या आणि कालव्यांमधील पाणी उपशावर भरारी पथकांची करडी नजर राहणार आहे.
-विशाल नाईकवाडे, तहसीलदार, निफाड

Administration keeps a watch on unauthorized water extraction from reservoirs!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *