नाशिक : प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कॉंग्रेस शहराध्यक्षपदाच्या निवडीला अखेर मुहूर्त लागला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कै. जयप्रकाश छाजेड यांचे चिरंजीव आकाश छाजेड यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत त्यांना नियुक्तीपत्र दिले.
गेल्या आठ वर्षांपासून पूर्णवेळ अध्यक्ष नसलेल्या शहराला पुन्हा दुसर्यांदा प्रभारी अध्यक्ष नियुक्त केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. नियुक्ती झाल्यानंतर छाजेड यांनी जुन्या व नव्या सर्व सहकार्यांना बोरबर घेऊन काम करणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला गती देण्यात येईल असे सांगितले. कॉंग्रेस पक्षाची सध्याची विस्कळीत झालेली संघटनात्मक घडी आणि विविध गट याचा विचार करता छाजेड यांच्यापुढे सगळ्यांना एकत्र करणे मोठे आव्हान आहे. त्यातून ते कसा मार्ग काढता याची उत्सुकता आहे. नाशिक शहराच्या अध्यक्षा अश्विनी बोरस्ते यांनी राजीनामा दिल्यानंतर मग पुढे शरद आहेर यांना 2014 मध्ये प्रभारी अध्यक्ष नियुक्त केले होते. विशेष म्हणजे आहेर हे ओझरचे अर्थात ग्रामीण भागातील आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहेर एकाच वेळी प्रदेश समिती व शहराचे प्रभारी अध्यक्ष होते. ते सलग सात वर्षे प्रभारी अध्यक्ष होते. त्यानंतर पुन्हा दुसर्यांदा आकाश छाजेड यांची नियुक्ती झाली आहे.
सात वर्षांनंतरही पुन्हा प्रभारीच अध्यक्ष
नाशिक शहर कॉंग्रेसला अध्यक्ष मिळाला असला तरी ही निवड प्रभारीच आहे. सात वर्षांपासून शहर कॉंग्रेसचे प्रभारी अध्यक्ष म्हणून शरद आहेर हे काम पाहत होते. अध्यक्ष निवडीसाठी अनेक जण इच्छुक होते. मधल्या काळात गुरमित बग्गा यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची अध्यक्षपदी निवड होईल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, त्यांच्या नावालाही अंतर्गत विरोध झाला. त्यामुळे ती निवड बारगळली. तब्बल सात वर्षांनंतर कॉंग्रेसने शहराध्यक्ष म्हणून आकाश छाजेड यांची नियुक्ती केली असली तरी ही नियुक्तीही प्रभारीच आहे. शहर कॉंग्रेसमध्ये अनेक गट-तट आहेत. या सर्वांशी जुळवून घेण्याचे काम छाजेड यांना करावे लागणार आहे. शिवाय सद्या शहर कॉंग्रेसचे संघटनही फारसे प्रभावी राहिलेले नाही, अशा परिस्थितीत छाजेड यांच्यापुढे कॉंग्रेसला नवसंजिवनी मिळवून देण्याचे मोठे आव्हान असणार आहे.