कर्जदार व जामीनदारावर गुन्हा
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
बँकेचे 15 लाखांचे कर्ज थकवून न्यायालयाने जप्त केलेली आणि अधिकृतरीत्या सील ठोकलेली मालमत्ता कर्जदारांनी संगनमत करून पुन्हा हडपल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकरोड परिसरातील देवळाली शिवारात उघडकीस आला आहे. न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून बँकेचे सीलबंद कुलूप, सूचनाफलक आणि ताबा नोटीस तोडून फ्लॅटमध्ये अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात कर्जदार व जामीनदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दि नाशिकरोड देवळाली व्यापार सहकारी बँक लि.चे मुख्य व्यवस्थापक संजय जगन्नाथ जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कर्जदार रूपेश सुरेश पाटोळे (वय 43), सुरेखा सुरेश पाटोळे (वय 67) आणि जामीनदार प्रणव सुरेश पाटोळे (वय 46, सर्व रा. साईविश्व अपार्टमेंट, सिन्नर फाटा) यांच्याविरुद्ध कायदेशीर उल्लंघन आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित पाटोळे यांनी 3 फेब्रुवारी 2021 रोजी देवळाली शिवारातील पाटोळे टॉवर्स इमारतीमधील बी विंगमधील तिसर्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 4 वर बँकेकडून 15 लाखांंचे सिक्युअर्ड लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी घेतले होते. यासाठी प्रतिमहिना 22,100 रुपयांचा हप्ता ठरवण्यात आला होता. मात्र, जून 2021 पासूनच कर्जदारांनी हप्ते भरणे बंद केले. बँकेने वेळोवेळी संधी देऊन आणि तगादा लावूनही कर्जदारांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्यामुळे अखेर बँकेने हे खाते एनपीए म्हणून घोषित केले.
बँकेने थकबाकी वसुलीसाठी सरफेसी कायदा 2002 अंतर्गत कारवाई करत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टात धाव घेतली. न्यायालयाने 7 नोव्हेंबर 2025 रोजी सदर प्रॉपर्टीचा ताबा बँकेकडे देण्याचे आदेश दिले. त्यानंतर न्यायालयीन आयुक्त सुनील निंबाजी बागुल यांनी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत 11 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजता या फ्लॅटचा ताबा बँकेकडे सुपूर्द केला. फ्लॅटच्या चारही दरवाजांवर सील ठोकून ताबा नोटीस व सूचनाफलक लावण्यात आले होते. 11 जून रोजी जेव्हा कोर्ट कमिशनर जप्तीची कारवाई करत होते, तेव्हा जामीनदार प्रणव पाटोळे याने एका 70 वर्षीय वृद्ध इसमाला बेडवर झोपवून ठेवले होते. तसेच एका अनोळखी व्यक्तीने आपण शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. “तुम्ही जरी ताबा घेतला तरी आम्हाला मान्य नाही. आम्ही फ्लॅटचा वापर पुन्हा सुरू करू,‘ अशी धमकीही संशयितांनी बँक अधिकार्यांना दिली होती. 15 जून रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास बँकेचे मुख्य व्यवस्थापक संजय जाधव व त्यांचे सहकारी या जप्त मिळकतीची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना मोठा धक्का बसला. फ्लॅटवर लावलेले बँकेचे सील, कुलूप, सूचनाफलक आणि नोटीस गायब होतेा. त्या जागी संशयितांनी दुसरे कुलूप लावून फ्लॅटचा ताबा घेतल्याचे आणि त्याचा लॉजसारखा वापर सुरू असल्याचे दिसले. बँकेने घटनास्थळीच संशयित रूपेश पाटोळे याला जाब विचारला असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. न्यायालयाने जप्त केलेली मालमत्ता बेकायदेशीरपणे कुलूप तोडून हडपल्याची खात्री पटताच बँक प्रशासनाने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
हवालदार गायकवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणार्या संशयितांवर आता पोलीस काय कारवाई करतात, याकडे बँकिंग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
Allegation of re-appropriating the bank’s sealed property