शाळेत असताना गणिताच्या तासाला घात हा शब्द माहीत झाला .गणितातील वर्ग व घातांक या गणिती क्रियांमुळे तो परिचित झाला.पण… पुढे या गणितामुळेच घात झाला ती गोष्ट वेगळी .हळूहळू भाषेतील विविध गोष्टीमधून तो अधिकच उलगडत होत गेला .त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे मगर आणि माकडाची.हि गोष्ट आपणां सर्वांना ज्ञात आहे. मगर एका माकडाशी मैत्री करून माकडाचे काळीज बायकोला खाऊ घालण्यासाठी घेऊन जात असताना, त्याचा घात करण्याच्या प्रयत्नात असताना माकडाच्या लक्षात आल्यावर ते ही मोठ्या चतुराईने आलेल्या प्रसंगातून स्वतःची सुटका करून घेतं. तर कोल्हा आणि हत्तीची गोष्ट देखील अशाच आशयाची.ज्यामधून लबाडांची संगत नेहमी घात करणारीच असते असा बोध देणारी. शाळेच्या भिंतीबाहेरील जगात तर त्याची प्रचिती येतेच.
वर्तमानपत्र,रेडिओ ,टीव्हीवरील बातम्यांमधून आपण वाचतो, ऐकतो, पाहतो की, मित्राने मित्राचा पैशासाठी घात केला .भावाने भावाचा संपत्तीसाठी घात केला .प्रियकराने प्रेयसीचा घात केला. नोकराने मालकाचा घात केला. तर कधी कधी माणूस काही कारणास्तव आत्मघातही करतो.
घात करणे म्हणजे विश्वासाला तडा जाणे होय. घाताचं शेवटचं टोक म्हणजे वध करणे, हत्या करणे होय.अस्त्र-शस्त्राने वेळ साधून एखाद्याचा काटा काढणे होय. फसवणूक करणारे, निंदनीय असे कृत्य म्हणजे घात होय. घात करणारी व्यक्ती ही बहुतांश जवळचीच असते .जवळच्या व्यक्तीकडूनच बऱ्याचदा घात केला जातो. ‘ध’ चा ‘मा’ करणारी आनंदीबाई, ‘काका मला वाचवा’ असा विश्वास टाकणाऱ्या माधवरावांचा घात करणारे राघोबादादा .महाभारतातील धृतराष्ट्र, दुर्योधन,गांधारीचा भाऊ शकुनी. आदी उदाहरणे याची साक्ष देतात.
जेव्हा स्वतःचा स्वतःवरील विश्वास उडतो ,मनातील भावनांचा कोंडमारा होतो , नकारात्मक विचारांनी मनात काहूर उठते ,चांगल्या- वाईटाची निर्णय घेण्याची बुद्धीची क्षमता संपते तेंव्हा माणूस आत्मघाताकडे वळतो. व्यसनाधीनतेमुळेही व्यक्ती आत्मघातास प्रवृत्त होते.
काही समाजकंटक देखील समाजात अस्थैर्य, अशांतता, दुही माजविण्याकरीता घातपात घडवून आणत असतात.
स्वतःच्या सीमारेषा वाढविण्यासाठी, स्वतःचं वर्चस्व दाखविण्यासाठी, प्रस्थापित करण्यासाठी शत्रुराष्ट्रात अंतर्गत अशांतता ,अराजकता माजविण्यासाठी शत्रूपक्ष हा नेहमीच घातपातासारखे कृत्य करीत असतो.
सद्य:स्थितीत पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे कुठे अतिवृष्टी तर कुठे कोरडा दुष्काळ असे चित्र आपणास बघावयास मिळत आहे. अतिवृष्टीमुळे पिके वाहून जात आहे . अवेळी आलेल्या या पावसाने जणू घातच केला आहे. कोरड्या दुष्काळामुळे पिके जळून जात आहे. कित्येकांचा उष्माघाताने मृत्यू होत आहे. मुलांकडून एखादा अपराध घडावा आणि बापानं रागानं लाल होऊन पोरांकडे बघावं ,तसं हा सूर्य
आग ओकत आहे. या आगीत कित्येकजण होरपळून निघतायेत. या उष्म्यानं कित्येकांचा घात होतोय. सर्वांनाच त्याची धग जाणवतेय. याला जबाबदार कोण?
खरंच!मानवाने किती मोठा अपराध केला
आहे. मोठ्या विश्वासाने या जगत्पालकानं मानवाच्या हाती ही सुजलाम सुफलाम धरा सोपविली होती.पण…पण.. मानवानं त्याच्या स्वार्थी, हावरट, लोभी वृत्तीमुळे तिचे संपूर्ण वैभवच लुटण्याचा प्रयत्न केला. जागोजागी तिला खाणून, उकरून, रासायनिक खते वापरून तिच्यातील पोषकद्रव्य संपवून टाकले. तिला ओरबाडून,ओरबाडून पार नेस्तनाबूत करण्याचा जणू घाटच घातलाय.हिरव्यागर्द जंगलांच्या जागी सिमेंटची जंगलं उभी केलीत. डोंगर भुईसपाठ केलेत. नद्यांना बांध घालून त्यांचे आधुनिकीकरण करत नैसर्गिक झरे कायमचे बंद करून टाकलेत. विहिरी बुजवून त्यावर इमारती उभारल्या. पशुपक्ष्यांचा अधिवास संपवून टाकला. मानवाने संपूर्ण सृष्टीचाच घात केला आहे.या अपराधाची शिक्षा तर त्याला भोगावीच लागणार. तो विश्वनियंता या अपराधाची शिक्षा देणारच.
अहो! मुलांकडून अपराध घडला तर सामान्य बाप मुलांना चांगले वळण लागावे म्हणून
शिक्षा देतो. हा तर विश्वाचा पालनहार आहे तो शिक्षा देणार नाही काय?
पण बाप बाप असतो.उगीच नाही त्याला नारळाची उपमा देत.तो सांगतोय डोळ्यावरची धुंदी बाजूला सारा. अजून वेळ गेलेली नाही. पावसाळ्यापूर्वी जमेल तेथे,जमेल तसे डोंगरांवर, माळरानावर ,तलावाच्या, घराच्या आजूबाजूला ,रस्त्याच्या दुतर्फा बिया पेरा.रोपे लावा.हि धरित्री लई मायाळू आहे.क्षमाशील
आहे .तुमचे अपराध पोटात घेईन. तुम्हांला फळा-फुलाचं,अन्न-धान्याचं दान देईल. ही भूमी पुन्हा सुजलाम सुफलाम होईल.
चला तर मग! विचार कसला
करताय.घडलेल्या अपराधाचे या मार्गाने प्रायश्चित्त करूया.
अखेर आईबाप हे आईबापच असतात. मुलं किती वाईट वागले तरी ,आईबाप मोठ्या मनानं त्यांचे अपराध पोटात घालतात. तसेच हा जगत्पिता आणि धरित्रीमाता देखील
आपल्या अपराधांना क्षमा करेल यात शंका नाही.
आरती डिंगोरे