गोरख काळे
महत्त्वाच्या नेत्यांनी टप्प्याटप्प्याने सोडलेली साथ, ठाकरे नावापलीकडे कुठलीही ताकद नाही, सत्ताधार्यांनी केलेले खच्चीकरण, अशा राजकीय प्रतिकूल परिस्थितीतही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नाशिक महापालिकेत 15 जागांवर यश मिळवत नाशिकमधून ठाकरे ब्रँड संपलेला नाही, हे दाखवून दिले. भलेही भाजपने एकहाती सत्ता मिळवली; परंतु ठाकरे गटाला पंधरा का होईना जागा मिळाल्या, पण त्यांच्या या विजयावर भाजप-शिंदेसेनेला नक्कीच विचार करण्यास भाग पाडले असेल. निवडणुकीत धक्का बसलेल्या शिंदेसेनेला आत्मपरीक्षण करावे लागेल. तगड्या उमेदवारांबरोबरच सत्ता, मंत्री व प्रमुख नेत्यांची फौज असूनही अवघ्या 26 जागांवर गटांगळ्या खाण्याची वेळ शिंदेसेनेवर आली. चाळीस ते पन्नास जागा जिंकू, असा दावा केला जात होता. त्यास खोट्या सर्र्व्हेेतून हवा मिळाल्याने शिंदेसेनेच्या नेत्यांचा आत्मविश्वास अधिक दुणावला. मात्र, निकालात या आत्मविश्वासाचा फुगा फुटला. 2017 च्या निवडणुकीत असेच चित्र होते. तेव्हा झालेल्या वेगवेगळ्या
सर्वेक्षणातून शिवसेना सर्वांत मोठा पक्ष असेल, हे सांगितले गेले. पण निकालात भाजपने एकहाती सत्ता मिळवली. त्याचीच पुनरावृत्ती आताही झाली. असो. शिंदेसेनेला त्यांच्या ताकदीच्या तुलनेने खूपच कमी 26 जागा मिळाल्याने त्यांना आत्मचिंतन करावे लागणार आहे.
शिवसेना ठाकरे गटासाठी यंदा नाशिक महापालिकेची निवडणूक सोपी नव्हती. पक्षाचे उपनेते दत्ता गायकवाड व माजी आमदार वसंत गिते वगळता एकही प्रमुख चेहरा पक्षाकडे नव्हता. राज-उद्धव या ठाकरे बंधूंची संयुक्त सभा वगळता पक्षाचा कोणीही मोठा नेता उमेदवारांकरिता नव्हता. याउलट शिंदेसेनेचेे मंत्री दादा भुसे सहाही विभागांतील उमेदवारांच्या विजयासाठी झटले. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पंचवटी, नाशिकरोड विभागात रोड शो करत पक्षात उत्साह भरला. ठाकरे गटाचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची विहितगाव येथील सभा वगळता त्यांचेही शहरात रोड शो झाले नाहीत. अशाही परिस्थितीत पंधरा जागांवर विजय मिळवत ठाकरे संपणार नाहीत, हे विरोधकांना दाखवून दिले. ठाकरे गटाचे कसे होईल अशी चिंता पक्षातील निष्ठावान शिवसैनिकांना होती. यात पक्षाची इभ्रत वाचवण्याचे काम कोणी केले असेल तर ते नाशिकरोड विभागाने. तेवीसपैकी तब्बल दहा जागांवर ठाकरेंची मशाल पेटली अन् कमाल करत विरोधकांचा सुपडा साफ केला. त्या तुलनेत पक्षाला पंचवटी, नाशिक पूर्व, पश्चिम, सातपूर या विभागांत एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही. याची जबाबदारी कोणाची हे ठरवावे लागेल. तसेच पक्षात काही बदलही होण्याची शक्यता आहे. सिडकोत प्रभाग 25 मधून मुरलीधर भामरे यांचा विजय पक्षाला अनपेक्षित म्हणावा लागेल. कारण या प्रभागाचे नेतृत्व एकेकाळी ठाकरे गटात असलेले व नंतर भाजपात गेलेले सुधाकर बडगुजर यांच्याकडे होते. त्यांच्या प्रभागात मशाल पेटल्याने याची चर्चा आहे. प्रभाग 31 मध्ये माधुरी डेमसे व वैशाली दळवी यांनी विजय खेचला. मा. आ. वसंत गिते यांच्या प्रभागातून त्यांचे पुत्र प्रथमेश गिते व सीमा पवार विजयी झाले. मात्र, 31 पैकी 26 प्रभागांत पक्षाला भोपळाही फोडता आला नाही, हे पक्षासाठी मोठे अपयश म्हणावे लागेल. शहरातील विद्यमान परिस्थिती बघता ठाकरे गटाला मर्यादा आल्याचे दिसले; परंतु कुठे चुकले याचे मंथन करावे लागणार आहे. नाशिकरोडमधून निवडून आलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे कौतुक करावे लागेल. विशेषत: त्या प्रभागातील प्रमुखांच्या खांद्यावर दिलेली जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. त्यामुळेच नगरसेवकांची संख्या वाढली. प्रभाग सतरातील मंगला आढाव यांचा येथे विशेष उल्लेेख करावा लागेल. मुळात आढाव म्हटले की, शिवसेना व ठाकरेंशी कायम एकनिष्ठ राहिलेले घराणेे. मंगला आढाव यांचे दिवंगत पती व माजी नगरसेवक प्रकाश आढाव हे त्यांच्या शिवसेनेवरील प्रेम व निष्ठा यासाठी ओळखले जायचे. आजही जेल रोडमध्ये त्यांची आठवण काढली जाते. शिवसेनेत बंड झाल्यानंतर नाशिकरोड विभागातील एकेका नगरसेवकाने पक्षाची साथ सोडली. परंतु मंगला आढाव या अखेरपर्यंत सोबतच राहिल्या. सत्ताधार्यांकडून त्यांनाही विविध आमिषे दाखवली गेली. मात्र, त्याला न भुलता, न जुमनता ठाकरे सेनेशी त्यांनी निष्ठा दाखवली. त्यामुळेच प्रभागात त्यांना त्यांच्या एकनिष्ठतेचा फायदा झाला. नाशिकरोड विभागातील 23 ठिकाणच्या लढतींतून सर्वाधिक तेरा हजार मते घेतली. त्यांच्यासोबत प्रमिला मैद, शैलेश ढगे या पक्षाच्या उमेदवारांनाही त्यांनी निवडून आणले. प्रभाग 22 मधील लढतीकडे सवार्ंचे लक्ष लागले होते. आ. सरोज आहिरे यांनी या प्रभागाची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पण उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे, योगेश गाडेकर विरोधकांना पुरून उरले व चारही जागा खेचून आणल्या. केशव पोरजे मधळ्या काळात पक्षावर नाराज होते. पक्षाने प्रमुख पदांच्या नियुक्त्या केल्या. उपजिल्हाप्रमुख पोरजे यांना जिल्हाप्रमुखपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, डी.जी. सूर्यवंशींच्या गळ्यात जिल्हाप्रमुखपद टाकल्याने पोरजे कमालीचे दुखावले गेले. त्यांच्या पक्षांतराच्याही वावड्या उठवण्यात आल्या. पण त्यांनी कुठेही न जाता निष्ठेने ठाकरेंसाठी खिंड लढवत प्रभागावर युवानेते योगेश गाडेकरांच्या साथीने एकहाती सत्ता मिळवली. मा. आ. योगेश घोलप यांनीदेखील जोरदार प्रचार केला. सीसीटीव्ही प्रकरणावरून प्रभाग 22
चर्चेत आला. यात आ. आहिरे यांनी सभा घेत गाडेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. गाडेकर यांनी चारही जागा जिंकत आ. आहिरेंनी केलेल्या आरोपांची परतफेड केली. पक्षाचे जिल्हाप्रमुख सूर्यवंशी हे त्यांच्या पत्नीचा पराभव झाल्याने त्यांच्या पदाचा राजीनामा देणार का?, हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, पोरजे यांनी चारही उमेदवार निवडून आणल्याने जिल्हाप्रमुख पदावर त्यांची दावेदारी पक्की झाली आहे. शिंदेसेनेने बहुतेक ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांना गळाला लावलेे. काँग्रेसच्याही तीन माजी नगरसेवकांना सोबत घेऊन महापालिकेतील सत्तेची दावेदारी पक्की करत कोणत्याही परिस्थितीत महापालिका ताब्यात घेऊ, असा आत्मविश्वास होता. परंतु मतदारांनी शिंदेसेनेला मर्यादित ठेवले. विलास शिंदे यांनी 2017 मध्ये प्रभागातील चारही उमेदवार निवडून आणले होते. त्यांचे त्यावेळी पक्षात कौतुकही झालेे. यंदा मात्र त्याच शिंदेंचा 284 मतांनी निसटता विजय झाला. नाशिकरोडमध्ये सूर्यकांत लवटे, ज्योती खोले, जयश्री खर्जुल यांना मतदारांनी नाकारले. नाशिकरोड विभागातील तीन प्रभागांत तर शिंदेसेनेच्या हाती भोपळा आला. दोन्ही सेनेचे मूल्यमापन केल्यास ठाकरे गटाला मिळालेले यश प्रतिकूल परिस्थितीतील आहे. ते मिळवणे सोपेही नव्हते. याउलट शिंदेसेनेकडे सर्व यंत्रणा असतानाही मतदारांनी त्यांच्या झोळीत 26 जागांचे दान टाकले, याचे आत्मचिंतन शिंदेसेनेला करावे लागेल. विशेषत: मंत्री दादा भुसे, मा. खा. हेमंत गोडसे, उपनेते अजय बोरस्ते या नेत्यांना ते करावे लागणार आहे.
An army defeated by defeat…
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…