विंचूरला भर दिवसा कांदा व्यापाऱ्याला लुटले
सहा लाख रुपयांची रोकड लंपास
विंचूर (प्रतिनिधी)
येथील प्रभू श्रीराम चौकात (तीनपाटी) भर दुपारी कांदा व्यापाराच्या हातातून सहा लाख रुपये रोकड असलेली पिशवी घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. याबाबत अधिक माहिती अशी की येथील उपबाजार आवारातील कांदा व्यापारी सचिन परदेशी हे आज दुपारी शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे अदा करण्यासाठी लासलगाव येथून बॅंकेतून सहा लाख रुपयांची रोकड घेऊन दुचाकीवरून विंचूर बाजार आवारात जात असताना येथील वर्दळीचे व विंचूरच्या मुख्य बाजारपेठच ठिकाण असलेलं प्रभू श्रीराम चौक (तीनपाटी) येथे दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी सचिन परदेशी यांच्या हातातील रोख रक्कम असलेली पिशवी हिसकावून येवला रोडकडे पोबारा केल्याची घटना घडली .सदरची घटना सि.सि.टी. व्ही. त कैद झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी येथे लग्नासाठी आलेल्या एका महिलेची चार तोळे सोन्याची पोत याच परिसरातून चोरट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना ताजी असतानाच त्यातच आता भर दुपारी घडलेल्या चोरीच्या घटनेने नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.येथील प्रभू श्रीराम चौक हे तसे गजबजलेले व वर्दळीचे ठिकाण आहे. तसेच पोलीस चौकी देखील येथेच आहे.मात्र पोलीस चौकीत बऱ्याच वेळा पोलीस नसतात.त्यामुळे अशा गुन्हेगारानचे फावत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विंचूर हे मुंबई संभाजी नगर महामार्गांवर वसलेले गाव आहे.येथे असलेल्या उपबाजार आवारा मुळे व औद्योगिक वसाहतीमुळे वर्दळ वाढलेली आहे.वाढलेल्या वर्दळीमुळे येथील व्यापार व्यवसायात निश्चितच वृद्धी झाली आहे. मात्र त्याच बरोबर गुन्हेगारी देखील वाढीस लागली आहे. विंचूर गाव हे परिसरातील टवाळखोर व टपोरींचा अड्डा होऊ पहात आहे.कोण चोर व कोण साव ओळखणे मुश्किल झाले आहे. पोलीस प्रशासनाने या टवाळखोर व टपोरींचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.सदर घटने बाबत लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे