देवळी कॅम्प येथील बेलतगव्हाण या ग्रामीण भागात गरीब परंतु होतकरू आणि प्रगतिशील शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. कॅन्टोनमेंट बोर्डाच्या सामान्य रुग्णालयात ६ एप्रिल १९७२ या दिवशी माझा जन्म झाला. घरची गरीबी आणि सुविधांचा अभाव यामुळे जनरल हॉस्पिटलमध्येच जन्म घेणे नशिबात होते. बालपणीच्या अनेक आठवणी खूप रोमांचक आहे. वडील व इतर चार भावंडे असे पाच खटल्यांचे मोठे एकत्र कुटुंब होते. सर्वांनी एकत्रित राहून शेतीमध्ये चांगल्या प्रकारे प्रगती केली कारण त्यांचे विचार प्रगत होते, पुरोगामी होते. त्यातील एका भावंडाला शिक्षणात रस आहे हे ओळखून, प्रतिकूल परिस्थितीतही त्यांना शिक्षणास प्रोत्साहन आणि सहकार्य केल्याने ते चार्टर्ड अकाउंटंट झाले. पुढच्या पिढीलाही उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने आम्हाला इंग्लिश मिडीयम शाळेत दाखल केले. त्या काळच्या सर्वोत्तम शाळेत शिक्षण घेतले. प्राथमिक शिक्षण नाशिकरोडच्या फिलोमीना कॉन्व्हेंट स्कूल, तर मधील काही काळचे शिक्षण गौतम पब्लिक स्कूल मध्ये घेऊन दहावीला पुन्हा कॉन्व्हेंट स्कूल मधून शालेय शिक्षण पूर्ण केले. नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झालो.
डॉक्टरच का व्हावे, याची एक अनोखी कहाणी आहे. माझे स्वप्न इंजिनियर बनण्याचे होते. मला गणित, भूमिती या विषयात विशेष रस होता. मला आठवतं, मी अकरावीत होतो, माझ्या सी. ए. काकांनी मला विचारलं, तुला काय बनायचं आहे. मी त्यांना माझे उत्तर दिले. त्यांनी विचारलं की इंजिनिर होऊन काय करशील, नोकरी करशील ना ? कारण आपल्याकडे फॅक्टरी टाकणे, कंपनी सुरू करण्यासाठी पैसे तर नाही. त्यापेक्षा तू डॉक्टर हो. स्वतःचा व्यवसाय कर, कुणासाठी काम करण्यापेक्षा सर्वांसाठी काम करण्याची संधी मिळेल. स्वतःला सिद्ध केलंस तर यशस्वी होऊ शकतो. ते पुढे म्हणाले की, दुसरे कारण असे की तू डॉक्टर झाल्याने आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल, शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो, हे सिद्ध करून दाखव. आपले मोठे कुटुंब आहे, खूप सारे नातेसंबंधी आहेत, त्याची तुला व्यवसायात मदत होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, सर्वांना तुझ्या शिक्षणाचा आणि व्यवसायाचा लाभ होईल. याकरता तुला डॉक्टर व्हायचं आहे. पैसे कमवण्यासाठी नाही, तर नांव, प्रतिष्ठा आणि मानसन्मान कमावण्यासाठी डॉक्टर हो. पैसेच कमवायचे आहेत, तर शेती काय वाईट आहे? मला त्यांचे म्हणणे आणि विचार पटले. तेव्हापासून ठरवले, व्हायचे तर डॉक्टरच. पैशासाठी नाही, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःचे आणि कुटुंबाचे नाव उज्वल करण्यासाठी. यासाठी कुटुंबाने दिलेली प्रमाणिकपणाची, नैतिकतेची, कष्ट करण्याची, संघर्ष करण्याची आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याची शिकवण पाठीशी होतीच.
१९८९ साली बारावी नंतर खऱ्या अर्थाने वैद्यकीय शिक्षणाला सुरवात झाली. मला बेळगावच्या प्रतिष्ठित KLE सोसायटीच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात MBBS साठी प्रवेश मिळाला. जेमतेम १७ वर्षांचा होतो. घरापासून पाचशे किलोमीटर दूर, जिथे कुणीही नातेसंबंधी नाही की कुणी ओळखीचेही नाही, अशा ठिकाणी राहणे म्हणजे दिव्यच होते. त्यावेळी आताच्यासारखे रस्ते नव्हते, दळणवळणाचे साधने नव्हती, संपर्काचे साधने नव्हती. नवीन प्रदेश, नवीन भाषा, नवीन वातावरण, नवे शिक्षण, नवे सहकारी. त्याकाळी होस्टेलमध्ये सर्रास रॅगिंग चाले. त्याची भीती, एकटेपणाची भीती, कोण कसा याची कल्पना नसल्याने भीती. पण करणार काय, पर्याय ही नव्हता. तिथे राहणे भाग होते. शिक्षण घेणेही भाग होते. मोबाईल तर नव्हताच, माझी खुशाली कळवण्यासाठी तेव्हा पत्रव्यवहार चाले. तीन एक वर्षांनी कुठे एस.टी. डी. ची सुविधा सुरू झाली, पण महाग खूप होती. त्यामुळे कधीतरी अडचण भासली तरच फोनवर बोलणे व्हायचे, अन्यथा पत्रच. घरच्यांची व नाशिकच्या मित्रांची आलेली पत्रे अनेक वर्षे जपून ठेवली होती. माझ्यासोबत नाशिकचे आणखी तिघे विद्यार्थी असल्याने थोडा धीर आला, परप्रांतात त्यातले त्यात ओळखीचे आणि जवळचे लोक भेटले. हळू हळू त्या वातावरणाशी स्वतःला एकरूप करून घेतले. पुढील पाच वर्षे बेळगावात राहिलो. अनेक चांगले, जिवाभावाचे मित्र मिळाले, जे आजही फेसबुक, व्हाट्सअप्प च्या मेहेरबाणीमुळे संपर्कात आहे. जवळपास सगळेच आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत.
१९९५, डॉक्टर तर झालो, आता पुढे काय? असा प्रश्न पुन्हा एकदा पडला. वाटलं की, अरे आपण पाच वर्षे काय शिकलो. या शिक्षणाच्या आधारावर तर काहीच करू शकत नाही. म्हणायला डॉक्टर झालो, पण उपयोग काहीच नाही, कारण व्यवसायात स्थिरावण्यासाठी स्पेशालिटी शिक्षण घेणे गरजेचे होते. इंजिनिअरिंगची मूळ आवड असल्याने अपशुकच अस्थिरोग तज्ञ होण्याची इच्छा शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात जागृत झाली. याचे कारण म्हणजे इंजीनियरिंगचे बरेचशे तत्त्वे आणि कौशल्य मला मदत करू शकतील असे वाटू लागले होते. त्यावेळी बॉम्बे हॉस्पिटलचे डायबिटीस तज्ञ डॉ. गोकाणी यांचे देवळाली कॅम्प येथे फार्म हाऊस होते. कुटुंबाची ओळख असल्याने मी त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांना भेटायला गेलो. त्यांनी मला त्यांचा पत्ता देऊन मला भेटण्यासाठी बोलावले. मी मुंबईला जाऊन त्यांना भेटलो व त्यांच्याशी चर्चा करताना सांगितले की मला अस्थिरोग या विषयात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे आहे. मला त्यांनी मुंबईतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ व केईएम हॉस्पिटलचे माजी अस्थिरोग विभाग प्रमुख, डॉ. अरविंद बावडेकर यांचे नांव सुचवून मला एक शिफारस पत्र दिले व त्यांना भेटून ते सांगतील तसे कर, असा सल्ला दिला.
काही दिवसांनी मी डॉ. बावडेकर सरांना भेटलो. तेव्हा त्यांच्याकडे जागा शिल्लक नसल्याने त्यांनी माझ्यापुढे एक प्रस्ताव ठेवला. ते म्हणाले की, मी गोंदवल्याला जात असतो, इथे जागा होईपर्यंत तू तिथे काम कर, नंतर मी तुला इथे घेईल. मी लगेचच त्यांना होकार दिला, कारण काही करून मला त्यांच्यासोबत काम करायचे होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घ्यायचे होते. विशेष म्हणजे, डॉ. गोकाणी यांनी सांगितले होते की, ते म्हणतील तसे कर, आणि मी तसे केले. जगाच्या नकाशावर गोंदवले कुठे आहे हे माहीतच नव्हतं कारण हे नाव मी पहिल्यांदाच ऐकलं होतं. निर्णय ठाम होता. काही दिवसांनी ते मला गोंदवल्याला घेऊन गेले. तुला आवडलं तर तू इथे जाईन करू शकतो, असे त्यांनी सांगितले. पुण्यापासून दीडशे किलोमीटर दूर, सातारा जिल्ह्यात, माण या दुष्काळी तालुक्यात, अती दुर्गम भागात हे गाव आहे. तिथे गोंदवलेकर महाराजांचे मठ आहे. त्या संस्थानचे ते हॉस्पिटल. सरांसोबत काम करण्याची संधी मिळते आहे, यापेक्षा मला काय हवे होते? त्या आश्रमात मी राहून तिथल्या धर्मादाय रुग्णालयात मी सेवा द्यायला सुरुवात केली. डॉक्टर झाल्यानंतरचे ते माझे पाहिले सेवाकार्य. अस्थिरोग विषया व्यतिरिक्त मी खूप काही शिकलो. खूप काही बघितलं. विशेषतः गरिबी काय असते, दुष्काळी भागातील लोकांचे जीवन जवळून बघितले. तिथे उच्च प्रतीची विनाशुल्क आरोग्यसेवा पूरवली जात होती. जवळपासच्या शहरी भागातून अनेक डॉक्टर्स विनामूल्य सेवा देण्यासाठी येत होती. मला आश्रमात राहण्यासाठी एक खोली दिली गेली. कुठल्याही प्रकारचे करमणुकीचे साधन नव्हते. ना टेप रेकॉर्डर, ना टीव्ही, ना सिनेमा, ना हॉटेल, ना मित्रमंडळी. साधी राहणी, धार्मिक आणि आध्यत्मिक वातावरण. आश्रमात विविध विभागात सेवा देणारे माझ्यासारखे इतर सेवेकरी होते. कुणी मंदिरात, कुणी ऑफिसात, कुणी स्वयंपाक घरात तर कुणी साफसफाई किव्हा गोशाळेत सेवा देत होते. माझ्याकडे हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाची जबाबदारी दिली गेली. तो सर्व अनुभव, तसेच डॉ. बावडेकर सरांनी दिलेले प्रेम, त्यांचे मार्गदर्शन, व शिकवण माझ्यासाठी गुरुमंत्रच होय. ते स्वतः त्यांच्या संपूर्ण टीमसह महिन्यातून काही दिवस तिथे जाऊन मोफत तपासणी आणि ऑपरेशन्स करत असे. त्यांच्या खोलीत एक पाटी होती, ज्यावर लिहिले होते, “तक्रार न करणे, ही साधकाची पहिली निशाणी होय”. किती गहन अर्थ आहे ना? त्यातून मी हे शिकलो की, जर तुम्ही स्वतःला साधक समजत असाल, अर्थात तुम्हाला काही साध्य करायचे आहे, किव्हा साधायचे असेल, तर तुम्ही तक्रार करायची नाही. जे आहे त्यातच तुम्हाला साधायचे आहे…
दीड वर्षे गोंदवल्यात राहिल्यानंतर मला सरांनी मुंबईला बोलावले व त्यांच्याकडे असिस्टंट म्हणून मी काम सुरू केले. आता मला मुंबईत राहून पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेणे सुलभ होणार होते. आत्तापर्यंत माझ्याकडे केवळ MBBS ची डिग्री होती. पुढे पदव्युत्तर शिक्षण घेणे आवश्यक होते. त्यांच्याकडे एक वर्ष काम केल्यानंतर मला ऑर्थोपेडिक्स ला प्रवेश मिळाला. तोपर्यंत सरांनी मला बरेच काही शिकवले होते. भरपूर प्रेम मिळाले, अगदी आपल्या मुलासारखे वागवले. त्यांच्याकडून ऑर्थोपेडिक्स पेक्षाही इतर गोष्टी मी जास्त शिकलो. विशेषतः पेशंटशी कसे बोलावे, कसे वागावे, त्यांच्या व्यथा, त्यांच्या अडचणी, त्यांच्या गरजा, त्यांच्या अपेक्षा कशा हँडल कराव्या, हे शिकलो. ऑपरेशन करतांना सर्जनचा दृष्टिकोन कसा असावा, हे मी शिकलो. ऑपरेशन कसे करावे, हे पुस्तकांत दिलेले असते, परंतु सर्जनच्या भावना आणि पेशंटची मानसिकता कशी असते, हे कुठल्या पुस्तकात नसते. माझ्या डॉक्टरकीच्या जडणघडणीत डॉ. बावडेकर सरांचा खूप मोठा प्रभाव आहे. ते माझ्या वैद्यकीय सेवेतील गुरू आहेत, यात शंकाच नाही. नंतर मला नानावटी हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळाला. तिथे मला माझे दुसरे गुरू मिळाले. डॉ. एम. एन. शहाणे सर. बावडेकर सरांसारखेच ज्येष्ठ, अनुभवी, कुशल, शांत आणि मितभाषी सर्जन. तिथे एकूण आठ बॉसेस च्या हाताखाली काम करतांना खूप काही शिकायला मिळाले. काम खूप असल्या कारणाने अनुभव ही चांगला मिळाला. अडीच वर्षे 24X7 ऑन ड्युटी असायचो. माझ्यासोबत इतर विद्यार्थी देखील माझ्यासोबत काम करत असे. काम करताना त्रास वाटे, पण मजाही येई. त्या काळातले काही विशेष क्षण आजही जीवनाचा अनमोल खजिना म्हणून स्मरणात साठवून ठेवलेला आहे. चांगल्या वाईट काळात साथ देणारे, मदतीला धावून येणारे, जीवाला जीव देणारे अनेक मित्र मिळाले.
शेवटी, २००२ च्या सुरवातीला घरून सांगावा आला, आता शिक्षण बस झाले, घरी यावे कारण आता पोटपाण्याचा आणि प्रपंचाचा विचार करावा. फेब्रुवारी महिन्यात नाशिकला आलो, आणि नोकरी करू लागलो. पुढील काही महिन्यात, म्हणजे मे महिन्यात लग्न झाले. एकाचे दोन तोंडे आणि दोनाचे चार हात झाल्याने आता जबाबदारी वाढली होती. नोकरीने स्थैर्य दिले, किमान दैनंदिन खर्चाची सोय झाली होती. व्यवसायाकरिता देवळाली कॅम्प दूर असल्याने आम्ही दोघे नाशिकरोडला शिफ्ट झालो. ग्राहस्थाश्रमाच्या आणि व्यावसायिक जीवनाच्या गाडीच्या प्रवासाला सुरवात झाली होती. पल्ला लांबचा होता, मेहनतीचा आणि जिकरीचा असणार आहे, याची कल्पना होतीच. परंतु संघर्षाचा आणि इतक्या साऱ्या चढ उत्तरांचा असेल याचा अंदाज नव्हता. एक मात्र स्वतःशीच ठरवले होते की, जे काही करायचं आहे ते स्वतःच्या हिमतीवर, मेहनतीने करायचे आहे. यशस्वी झालो तर साहजिकच त्याचे श्रेय मला मिळेल, पण अपयश आले तर कुणाला दोष देणार नाही किव्हा कुणाला जबाबदार धरणार नाही. नोकरी करत असताना एक हॉस्पिटलचा प्रस्ताव आला. काही डॉक्टर्स मिळून हॉस्पिटल सुरू करायचे होते. तो प्रस्ताव स्वीकारत पुढील वर्षभरात म्हणजे जून २००३ मध्ये मा. श्री. विलासराव देशमुख यांच्या शुभहस्ते आम्ही शरणपूर रोड येथे तपोवन हॉस्पिटलची स्थापना केली. स्कुटरवर ये जा करत हा प्रवास सुरु होता. कामाची व्याप्ती वाढल्याने चारचाकी गाडी घेणे भाग होते, परंतु नवीन गाडीसाठी पैसे कुठून आणायचे म्हणून एक सेकंड हॅन्ड मारुती कार घेतली. इमर्जन्सी, ऍक्सिडेंट, फ्रॅक्चरच्या पेशंटची सेवा सुरू झाली. त्यासाठी बाहेरगावी जावे लागत होते. ग्रामीण भागात जाऊन तिथे ऑपरेशन्स करू लागलो. तेव्हापासून सुरू झालेली ग्रामीण भागातील सेवा कोविड काळापर्यंत अविरत सुरू होती. आजही काही विशिष्ठ केसेस साठी जावे लागते.
नोकरी चालू होती, हॉस्पिटल झाले, काम वाढत गेले. हळू हळू जबाबदाऱ्या वाढत गेल्या, तसतशा अडचणीही वाढत गेल्या. पत्नीला शिक्षणात आवड असल्याने तिला पदव्युत्तर शिक्षण घ्यावे म्हणून तयारी केली आणि MS साठी प्रवेश मिळाला. माझी रोजची कामं, त्यामुळे होणारी ओढाताण, प्रवास व तिचे शिक्षण यात दिवस कसे चाललेत हे कळतच नव्हते. त्यातच २००४ च्या ऑक्टोबर महिन्यात एक विलक्षण घटना घडली. वडिलांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. माझ्या नजरेसमोर, माझ्या हॉस्पिटलच्या ICU मध्ये त्यांना अटॅक आल्याने ते कोसळले. सर्व डॉक्टर्स, स्टाफ आणि सुविधा असूनही मी त्यांना वाचवू शकलो नाही, याची खंत आणि सल माझ्या मनात अनेक वर्षे मला जाणवत होती. ती रात्र वैऱ्याचीच होती. आज अठरा वर्षांनंतरही सर्वकाही सुस्पष्टपणे आठवते. इतके मोठे संकट ओढवल्याने मी निराश झालो. त्या दिवसानंतर त्या हॉस्पिटलमध्ये काम करण्याची इच्छाच राहिली नाही. आता आपल्याला दुसरे हॉस्पिटल सुरू करायचे आहे असा निर्णय घेतला. आता स्वतःचे असेल असे ठरवले. पैसे नव्हते, पण हिम्मत होती, जिद्द होती आणि म्हणून योग जुळून आले. जून २००५ मध्ये सुदर्शन हॉस्पिटलची स्थापना झाली. सुरवातीला ते ३० बेडचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होते, आज तिथे ५० बेडचे हॉस्पिटल कार्यरत आहे. हा प्रवासही काही सुखकर नव्हता. अनेक अडचणी, संकटं आली. माणसांसह बऱ्याच गोष्टींची जुळवाजुळव करावी लागली.
या सर्व घडामोडींत तिचे शिक्षणही पूर्ण झाले. आता लग्नाला पाच वर्षे होऊन गेलेली. शिक्षण झाले, हॉस्पिटल झाले आता कुटुंब प्रपंचाकडे लक्ष देण्याची वेळ आली. कालांतराने कळले की वंध्यत्वाचे संकट आमची वाटच बघते जणू. त्याला कारण एक आजार होता. त्याचा उपचार सुरू करावा लागला. यात दोन वर्षे वेळ गेला. शेवटी तो क्षण आला, ज्याची आम्ही वाट बघत होतो. बाप होणार ही आनंदाची बातमी कळली, पण त्यातही एक ट्विस्ट होता. सोनोग्राफी मध्ये कळले की गर्भाशयात दोन अर्भक दिसताय. म्हणजेच जुळी मुलं होणार होते. म्हणतात ना ते, आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन, अशी काही अवस्था झाली होती आमची. नऊ महिन्यांनी या भूतलावर दोन पाहुणे आमच्या घरी अवतरले, एक मुलगा, एक मुलगी. तो पृथ्वी आणि ती वसुंधरा.
अशा प्रकारे जीवनाची रोलर कोस्टर राईड सुरू होती. अनेक संकटे आली. अनेक अडचणी आल्या. कठीण काळानंतर चांगले दिवस आणि चांगल्या अनुभवांनंतर गोड अनुभव येत गेले. बिकट परिस्थितींना सामोरे गेलो, हिम्मत ठेवली, धीर आणि संयम राखत वाट सरत गेली. वयक्तिक आयुष्यात कधी आरोग्य विषयक, तर कधी आर्थिक अडचणी आल्या. कधी व्यावसायिक तर कधी कौटुंबिक समस्या आल्या. कामाचा व्याप तर होताच, त्याचा तणाव जाणवत होता. परंतु या सर्व अडचणीतून मार्ग काढण्यासाठी काहीतरी वेगळे करावे, असे वाटू लागले. काय करावे हे माहीत नव्हते, परंतु मार्ग असणार हे मी जाणून होतो. २०१४ च्या सुरवातीला, माझ्या एका मित्राने मला एक कोर्स करण्याचा सल्ला दिला. मला तर ही कल्पना पटलीच नव्हती, परंतु त्याने माझी कोर्स फी भरून मला जबरदस्तीने त्या कोर्सला पाठवलं. दोन दिवसांचा तो कोर्स होता. वाटलं की, चला यातून काही मार्ग सापडतो का बघूया. आणि ते दोन दिवस माझ्यासाठी खरोखर नवसंजीवनी ठरले. त्यात असे काही नवीन गोष्टी शिकलो, काहीतरी वेगळेपण जाणवले, काही निर्णय घेतले आणि बऱ्याच गोष्टी करण्याचे ठरवले. त्या कोर्सचे परिणाम दिसायला लागले, आणि मग जीवनात एक नवीन परंतु हटके शिक्षण सुरू झाले. एकेक कोर्स करण्याची संधी येत गेली. नवनवीन प्रयोग करत, आयुष्यात बदल घडत गेला. एकामागून एक कोर्स करत गेलो. वेगवेगळ्या विषयांशी संबंधी कोर्सेस झाले, त्या निमित्ताने अनेक पुस्तके वाचण्याची संधी मिळाली. अध्यात्मापासून ते बिजनेस आणि मानवी मूल्यांपासून ते आर्थिक अशा विभिन्न विषयात ज्ञान मिळाले. विचार बदलले, सवयी बदलल्या, वागणूक बदलली, संबंध सुधरले, दृष्टिकोन बदलला तसे काम करण्याची पद्धत बदलली. स्वतःकडे, जीवनाकडे आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळे माझ्यासाठी नवीन विश्व निर्माण झाले. त्याच गोष्टी मला नव्याने दिसू लागल्या. मनावरील आणि कामावरील तणाव कमी झाला. अंगी नवचैतन्य संचारले. शिक्षणाची भूक अजुनही तशीच आहे, आज मितीलाही एक कोर्स करतोय, पुस्तकं वाचतोय. आता जगण्याला मजा येत आहे. कुठलेच संकट, कितीही बिकट अवस्था मला मागे ओढू शकत नाही.
गेल्या सात ते आठ वर्षांत हळु हळु जीवनप्रवास कुठेतरी स्थिरावला आहे, असे वाटत असतांनाच जगाच्या आणि माझ्या नशिबी कोरोना नामक महाभयंकर महामारी आली. जग हादरले, पण मी नाही. आयुष्यात इतके संकटे पेललेली होती, की महामारीचे संकट मला डगमगू शकले नाही. यातून मार्ग काढण्याची कला मी अवगत केली होती. एक क्षणही मी कधी पॅनिक झालो नाही. जग थांबले, पण मी नाही. जनता कर्फ्युच्या दिवशी सकाळी नऊ वाजता घराबाहेर पडलो. नाशिकच्या सुन्या रस्त्यांचे व्हीडिओ चित्रीकरण करत हॉस्पिटलला आलो. दोन दिवसांनी लॉक-डाऊन सुरू झाले, पण माझे काम सुरू होते. पहिल्या २१ दिवसांच्या लॉक-डाऊन मध्ये २१ ऑपरेशन्स केली, आणि तेही शहराबाहेर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाऊन तिथे सेवा दिली. गाडीवर डॉक्टरचा बोर्ड लावलेला असल्याने मला कधी कुणी आडवले नाही. अडीच महिन्याच्या लॉक-डाऊन मध्ये एकूण ४८ ऑपरेशन्स केली. जून महिन्याच्या सुरवातीला हळू हळू लॉक-डाऊन हटले, तसतसे कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. त्याचा काळात माझ्याकडील एक रुग्ण कोरोना पॉजीटिव्ह निघाला. त्यावेळी खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचा उपचार करण्याची परवानगी नव्हती. माझ्याकडे दोन पर्याय होते, एक तर त्या रुग्णाला सरकारी दवाखान्यात हलवायचे किव्हा मग माझ्याच हॉस्पिटलमध्ये त्याचे उपचार करायचे. त्यावेळी काही गोष्टी अशा काही घडून आल्या की मी प्रशासनाकडे अर्ज करून मला कोविडचे रुग्ण ऍडमिट करून त्यावर उपचार करण्याची परवानगी मिळाली. तद्नंतर मला असे कळले की अशी परवानगी मागणारा देशातला मी पहिला डॉक्टर होतो, आणि परवानगी मिळालेले सुदर्शन हॉस्पिटल हे पहिले हॉस्पिटल होते. यात भूषण मिरवण्यासारखे काही वाटले नाही, कारण तेव्हा जे करणे गरजेचे होते, ते मी केले.
संपूर्ण जग जेव्हा भीतीपोटी घरात बसून होते, अशा जीवघेण्या संकटसमयी कोरोना रुग्णांची सेवा करावी, उपचार करावे हा विचार कुठून आला? स्वतःचा जीव धोक्यात टाकून असा वेडेपणा करण्याची काय गरज होती? हा निर्णय घेतांना तुम्हाला कुणी आडवले कसे नाही? असे काही प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असणार आहे. मला असे वाटते की, आपण ज्या समाजात राहून नोकरी करतो, व्यवसाय करतो, उद्योगधंदे करतो, थोडक्यात काय तर आपण आपला उदरनिर्वाह करतो, त्या समाजाप्रती आपल्या काही जबाबदाऱ्या असतात. समाज आपल्याला बरेच काही देत असतो. पैशांच्या व्यतिरिक्त, आदर, मानसन्मान, प्रेम करतो, आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला हवं ते देत असतो, तर आपल्यालाही समाजाला काही देणं लागतं. किंबहुना ही आपली जबाबदारीच असते. जर आपण यात कमी पडलो तर ते आपले अपयश आहे, असे मला वाटते. उदा. पोलीस यंत्रणा असतांना कायदा सुव्यवस्था टिकली नाही तर ते पोलीस दलाचे अपयश आहे, असे आपण समजतो. देशाची सेना असताना देशावर हल्ले होत असेल तर याला देशाच्या सुरक्षा यंत्रणेचे अपयश आहे, असे आपण मानतो. सरकार सत्तेवर असतांना अनागोंदी चालते, भ्रष्टाचार चालतो, अर्थव्यवस्था ढासळते तेव्हा आपण सरकारला जबाबदार धरतो. त्याच प्रमाणे, वैद्यकीय व्यावसायिक असतांना आरोग्यविषयक संकट आले तर, मला एक डॉक्टर या नात्याने समाजाची सेवा करून, जनतेचे जीव वाचवणे, ही माझी प्राथमिक जबाबदारी बनते. म्हणून मी यात उडी घेतली. या कार्यासाठी मला कुणीच्या शाबासकीची अपेक्षा नाही, कौतुकांची आणि पुरस्कारांची इच्छा नाही.
कोविड काळातील माझा अनुभव खूप रोमांचक आहे. त्या पहिल्या तीन महिन्यांच्या काळात सर्व प्रकारच्या भावना निर्माण झाल्या, व्यक्त झाल्या, अनुभवल्या, आणि जाणवल्या. जनतेला मी कोविडसेवा सुरू केली आहे, याची माहिती मिळावी म्हणून मी एक व्हीडिओ समाजमाध्यमांवर पोस्ट केला होता. तो काळच असा होता की, लोक चक्रावलेले असताना असे काही बघणे आणि ऐकणे, हे प्रत्येकासाठी आशेचे किरणच होते. खूप साऱ्या लोकांनी त्यांच्या भावना कॉलद्वारे, मेसेजद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवल्या. त्यात ओळखीचे कमी अनोळखी लोकच जास्त होते. अनेकांनी देवाचीच उपमा दिली, तर काहींनी माणसातल्या देवाची. काहींना आश्रू आवरेना, तर काहींनी माझ्या जीवाचे रक्षण करण्यासाठी देवाला साकडे घातले. स्वप्नवत वाटावे असे कार्य करत असल्याचे जाणवले. तेव्हा खऱ्या अर्थाने डॉक्टर झाल्याचा अभिमान वाटला, हे शिक्षण आणि हे जीवन सार्थकी लागले असे जाणवले. लोकांनी केलेल्या कौतुकांचे मेसेज मी आजही जपून ठेवले आहे. कुणाच्याही आयुष्यात असे प्रसंग येण्यासाठी भाग्य लागते, आणि ते भाग्य मला मिळाले, म्हणून मी या समाजाचा, या जनतेचा आणि माझ्या प्रत्येक रुग्णाचा ऋणी आहे. समाजाला अपेक्षित असलेले कार्य तुम्ही केले तर तो समाज तुम्हाला डोक्यावर घेतो, कौतुक करतो, प्रेम देतो, आशीर्वाद देत तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो, वेळप्रसंगी तुम्हालाच देव मानतो. या सर्व भावना मी कोविड काळात अनुभवल्या आहेत. त्याबरोबर माझ्या आजवरच्या जीवनाप्रवासाच्या सर्व जडणघडणीत, चढ-उतारांत, बिकट समयी, निराशेच्या काळात मला साथ मिळाली ती माझ्या कुटुंबियांकडून. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मी आज इथवर पोहोचू शकलो. कितीही संकटे आलीत तरी कधीच साथ सोडणार नाही, अशी जिवाभावाची, रक्ताची नाती असलेली माणसे माझ्या जीवनात आहे. भविष्यात जे काही करेल, त्यात त्यांनी दिलेली शिकवण, त्यांचे विचार, संस्कार आणि मूल्य स्मरून कार्य करेल. डॉक्टर बनतांना बघितलेले स्वप्न साकार होवो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना…!!!
*डॉ. संजय धुर्जड.*
अस्थिरोग तज्ञ, सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
अध्यक्ष, नाशिक अस्थिरोग संघटना, नाशिक.
9822457732.