कोकण वगळता महाराष्ट्रात जुलैमध्ये पुन्हा मुसळधार नाहीच!

हवामानतज्ज्ञ होसाळीकर यांचे ट्विट

मुंबई/पुणे । प्रतिनिधी
महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार अशा आशयाच्या बातम्या खोट्या आहेत. पावसाच्या अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, अशा आशयाचे ट्विट हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी केले आहे. भारतीय हवामान विभाग (आयएमडी)चे अधिकृत हवामान अंदाजच फॉलो करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती उद्भवलेल्या शहरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. मात्र, लवकरच मुसळधार पावसाचा अलर्ट असल्याचे वृत्त सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे.
येत्या दोन आठवड्यांत महाराष्ट्रभरात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात असल्याचें संदेश व्हायरल होत आहेत. याबाबत होसाळीकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
होसाळीकर यांनी ट्विटमध्ये म्हटलेय की, पुढील दोन आठवड्यांत संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाच्या शक्यतेबाबत काही खोटे संदेश पसरवले जात आहेत. कृपया सतर्क राहा आणि हवामानाबाबतच्या आयएमडीच्या सूचनांचे पालन करा. या अंदाजानुसार, 13 ते 20 जुलै या कालावधीत कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण खूप कमी राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि पश्चिम घाट परिसरात मात्र तीव्र हवामानाचा इशारा असून, येथे मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही.

विविध राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभाग (आयएमडी)ने देशभरातील पावसाच्या स्थितीबाबत गंभीर इशारा दिला आहे. ताज्या हवामान अपडेटनुसार, देशात एकाच वेळी तीन सायक्लोनिक सर्क्युलेशन (चक्रीय वातस्थिती) आणि कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहेत. या अनुकूल हवामान प्रणालींमुळे मान्सून पुन्हा एकदा अत्यंत आक्रमक झाला आहे. आगामी सात दिवस देशातील विविध राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Apart from Konkan, there will be no heavy rainfall in Maharashtra in July!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *