दिलगिरी

मराठी भाषा आणि मराठी माणसांची अस्मिता हे विषय आपल्या महाराष्ट्रात अत्यंत संवेदनशील आहेत. अमराठी माणसांकडून मराठी भाषा व मराठी माणसांचा अपमान होण्याचे प्रकार अनेकदा घडलेले आहेत. त्यावरून अनेक वाद उपस्थित झाले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयास शिवसेना (ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मराठी अस्मितेच्या पक्षांसह विरोधी पक्षांनी विरोध केला, तेव्हा राज्य सरकारने हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय मागे घेतला. महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णयही घेण्यात आला. मराठीला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा देऊन एक प्रलंबित मागणी मार्गी लावली. या ना त्या कारणाने मराठी भाषा सतत चर्चेत असते. मराठी माणसाविषयी वादही अधूनमधून उपस्थित होतात. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असेल तर मराठी शब्दांचा उच्चारही नीट आणि व्यवस्थित करायलाच पाहिजे, याविषयी कोणाचेही दुमत नाही. परंतु, घटनात्मक पदावर बसलेल्या मराठी माणसानेच मराठी शब्दांचा चुकीचा उच्चार केला असेल तर? हा प्रश्न आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत अध्यक्ष राहुल
नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव वाचून दाखविताना शब्दांचा उच्चार अत्यंत चुकीचा केला. याबद्दल त्यांनी नंतर सभागृहात दिलगिरी व्यक्त केली असली, तरी त्यांच्यावर तशी वेळ का आली? हा प्रश्नच आहे.
‘यथोचित’ऐवजी त्यांनी ‘यशोचित’,
‘दुर्दम्य इच्छाशक्ती’ऐवजी ‘दुर्दमय इच्छाशक्ती’,
‘आशा’ऐवजी ‘अशा’, ‘दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या’ऐवजी ‘दीनदयाळ मंगेशकरांच्या कन्या, ‘सुमन कल्याणपूर’ऐवजी ‘सुमन
कल्याण पूर’
असे चुकीचे उल्लेख नार्वेकर यांनी केले. याबद्दल त्यांनी सभागृहात नंतर दिलगिरी व्यक्त केली. शोकप्रस्तावांची प्रत अस्पष्ट होती, टंक (फॉण्ट) अत्यंत बारीक होते, अक्षरे बारीक होती इत्यादी तांत्रिक गोष्टी पुढे करत त्यांनी आपल्या चुका झाकण्याचा प्रयत्न केला. अनवधानाने चुका झाल्याचे त्यांनी सांगितले. शोकप्रस्ताव वाचताना केलेल्या भाषिक चुका आणि चुकीचे उच्चार दुरुस्त करून किंवा वादग्रस्त भाग वगळून तो अधिकृत शोकप्रस्ताव विधिमंडळाच्या कामकाजाच्या पटलावर घेतला गेला. दिवंगत पार्श्वगायिका यांच्याविषयीच या चुका झाल्या. नार्वेकर यांच्या चुकांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्षेप घेऊन तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करणे साहजिकच आहे. नार्वेकरांनी मराठी भाषेची “चिरफाड” केल्याची टीका त्यांनी केली. हा शोकप्रस्ताव आशा भोसले यांच्यापुरता न राहता, मराठी भाषेच्या शोकप्रस्तावासारखा वाटल्याचे त्यांनी म्हटले. नार्वेकरांकडून ही चूक कशी झाली असेल, हाच खरा प्रश्न आहे. विधानसभा सभागृहाच्या सचिवालयात शोकप्रस्ताव तयार करण्याचे काम होत असते. सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी शोकप्रस्ताव तयार करताना भाषेकडे लक्ष दिले नसल्याचे स्पष्ट होत आहे. विधानसभा सचिव ऋतुराजकुडाळकर आहेत. सचिवालयातील कामकाजाची अंतिम जबाबदारी त्यांच्यावर आहे, तेही मराठी आहेत. मात्र, शोकप्रस्तावाचा मसुदा तयार करताना गफलती झाल्या आणि प्रस्ताव तयार झाल्यावर अंतिम हात न फिरवता, तो अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठविला गेला. अध्यक्षांनीही त्यावर नजर फिरवली नाही. सचिवालयाने पाठविलेल्या शोकप्रस्तावाचा मसुदा बिनचूक असल्याचे गृहीत धरून त्यांनी तो वाचायला घेतला. शोकप्रस्तावात जे शब्द होते, तेच त्यांनी जसेच्या तसे वाचून दाखवले. चुका कोणी केल्या तर सचिवालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी. हे मान्य केले तरी घटनात्मक बाब लक्षात घेता शोकप्रस्ताव वाचणारे नार्वेकर यांनीच चुका केल्या, सभागृहात जे बोलले जाते, त्याची सभागृहाच्या कामकाजात नोंद होत असते. नार्वेकर यांनी जबाबदारी स्वीकारून दिलगिरी व्यक्त केली, पण मराठी भाषेची अवहेलना झाल्याबद्दल माफी मागितली नाही. महाराष्ट्र सरकारचा एक मराठी भाषा विभाग आहे. या विभागाचे मंत्री उदय सामंत आहेत. मराठी भाषा विभागांतर्गत मंत्रालय राज्य मराठी विकास संस्था कार्यरत आहे. महाराष्ट्र शासनाने काही पारिभाषिक शब्द निश्चित केले असले, तरी शोकप्रस्तावात बोलीभाषेचा वापर झाल्याचे दिसते. ‘आशा’ऐवजी ‘अशा’ हा शब्द आला. हा बोलीभाषेचा किंवा सामान्य भाषेचा परिणाम दिसतो. ‘दुर्दमय, दीनदयाळ’ यांसारखे शब्द शोकप्रस्तावात आल्याचा परिणाम म्हणजे संदर्भ आणि अभ्यासाचा अभाव असल्याचे दिसते. अनुभवातून शोकप्रस्ताव आधीच तपासून घेतला असता तर ‘आशा’चे ‘अशा’ झाले नसते.

Apology

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *