नाशिक: प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेलेले माजी आमदार अपूर्व हिरे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या तसेच परत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एका मागून एक धक्के बसतच आहे. विधानसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम मधून राष्ट्रवादी च्या तिकिटासाठी अपूर्व हिरे यांनी प्रयत्न केले होते. मात्र ही जागा भाजपला सुटल्याने त्यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून सुधाकर बडगुजर यांना पाठिंबा दिला परंतु बडगुजर यांचाही पराभव झाला. राज्यात सत्ताही महायुती ची आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला महत्व प्राप्त होणार असल्याने पाच वर्षे विरोधात राहण्यापेक्षा सत्ताधारी पक्षासोबत राहिलेले चांगले ही बाब हेरून अपूर्व हिरे यांनी पुन्हा अजित पवार गटात जाणे पसंत केले असावे असे बोलले जात आहे. अजित पवार यांची त्यांनी आज भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच परत पक्षात येणार असल्याचे सांगितले. पुढील आठवड्यात अजित पवार यांनी बैठक बोलावली आहे त्यात पुन्हा प्रवेश होईल, असे समजते.