25 हजार युवकांना रोजगार देण्याचे मविप्रचे उद्दिष्ट
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित महारोजगार मेळाव्याने अनेक बेरोजगार युवकांच्या रोजगाराचे स्वप्न साकार केले.
मेळाव्यात अडीच हजार उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी पात्र ठरलेल्या 659 उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. दहा हजारांहून अधिक युवकांनी नावनोंदणी करून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
समारोपप्रसंगी मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी शिक्षणासोबत रोजगारनिर्मितीही संस्थेचे महत्त्वाचे ध्येय असल्याचे सांगितले. सुशिक्षित युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून 25 हजार बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे होते. यावेळी मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, मनोज भगत, राजीव ठाकरे, सीआयआयचे व्यवस्थापक सागर शिरसाठ, सागर चौधरी, प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, उपप्राचार्य एस. बी. शेलार आणि मेळाव्याचे समन्वयक प्रा. डॉ. राम सोनवणे उपस्थित होते.
बाळासाहेब क्षीरसागर यांनी राज्यभर आयोजित रोजगार मेळाव्यांमधून आतापर्यंत सहा हजार युवकांना रोजगार मिळाल्याची माहिती दिली.
डेन्मार्क आणि जपानमधील कंपन्यांनी तीन लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक वेतनाच्या नोकर्यांची संधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे यांनी प्रास्ताविकात मेळाव्याच्या नियोजनाची माहिती दिली. संस्थेच्या पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली महिनाभर नियोजन करून हा उपक्रम यशस्वी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. डॉ. डी. बी. वेलजाळी यांनी सूत्रसंचालन, प्रा. डॉ. राम सोनवणे यांनी प्रमाणपत्र वाचन, तर उपप्राचार्य आर. व्ही. पवार यांनी आभार मानले.
नामांकित कंपन्यांचा सहभाग
तालुक्यात प्रथमच झालेल्या या महारोजगार मेळाव्यात फार्मा, आयटी, ऑटोमोबाइल, बँकिंग आणि सेवा क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. महिंद्रा, बजाज, टाटा, बॉश, डब्ल्यूएनएस, एचडीएफसी, आयसीआयसीआय, एअरटेल आदी कंपन्यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची निवड केली.
Appointment letters handed to 659 youths at the mega job fair.