पाथर्डी फाटा येथे आढळले धारदार शस्त्र.
तीन तरुणांना पोलिसांनी केली अटक
इंदिरानगर| वार्ताहर
पाथर्डी फाटा येथे लोखंडी धारदार शस्त्र सापडले. धारदार शस्त्र सोबत बाळगले म्हणून तीन तरुणांना इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष कॅफे हॉटेल जवळील धनलक्ष्मी शाळेसमोर असलेल्या मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या तरुणांकडे धारदार शस्त्र असल्याची खबर इंदिरानगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस हवालदार लक्ष्मण बोराडे सदर ठिकाणी पोहोचले. पाठोपाठ इंदिरानगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांबळे, सपोनि निखिल बोंडे त्या ठिकाणी पोहचले. तरुणांकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता सागर बबन जाधव याच्या पँट मध्ये कमरे जवळ लोखंडी तलवार खोचलेली आढळली. यावेळी त्याच्या सोबत इतर दोन तरुण होते.
याप्रकरणी सागर बबन जाधव ( वय – 23 वर्षे, रा. माउंट पॅराडाईज हॉटेल जवळ ,घोटी ), विकास तानाजी घोटे ( वय – 22, रायगड नगर ,नाशिक) उमेश साईनाथ बोंडे (टिटोली ,इगतपुरी ) या तिघा तरुणांना इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे. शस्त्र बंदी आदेश असताना शस्त्र बाळगणे म्हणून त्यांच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.