अग्रलेख

कृत्रिम प्रज्ञा

जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात कृत्रिम प्रज्ञा चर्चेत आहे. एआयचा वापर सर्वच क्षेत्रांत होऊ लागला आहे. एआय तंत्रज्ञान मानवाने विकसित केले असून, मानवच त्याचा वापर करत असला, तरी त्याच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. भारताने नवी दिल्लीत ‘इंडिया एआय इम्पॅक्ट’ शिखर परिषद भरवली. ही परिषद 16 फेब्रुवारीपासून सुरू झाली. या परिषदेचा समारोप आज 20 फेब्रुवारी रोजी होत आहे. परिषदेच्या स्थळाला ‘भारत मंडपम’ नाव देण्यात आले. परिषदेत शंभरहून अधिक देशांनी सहभाग नोंदविला. शिखर परिषदेला 20 देशांचे राष्ट्रप्रमुख आणि नेते, उद्योजक, जागतिक एआयतज्ज्ञ, स्टार्टअप उद्योजक आणि सरकारी अधिकारी आदींची उपस्थिती लाभली. विश्वगुरू म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारताला या नव्या क्षेत्रात जबरदस्त मुसंडी मारायची आहे, हेच या परिषदेच्या निमित्ताने दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 फेब्रुवारी रोजी परिषदेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. जगातील ही सर्वांत मोठी परिषद ठरली. पंतप्रधानांनी विविध स्टॉल्सना भेट देत तरुण उद्योजकांशी संवाद साधला. नव्या तंत्रज्ञानातून शेती, आरोग्य, शिक्षण व उद्योग क्षेत्रात कसा बदल घडवता येईल, याबाबत त्यांनी माहिती घेतली. ‘एआय’मुळे नोकर्‍या जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, यात घाबरून न जाता शांत राहा, नोकरी वाचविण्यासाठी एआयची नवी साधने शिका आणि स्वतःला सतत अपडेट ठेवा, असा स्पष्ट संदेश तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांनी कर्मचार्‍यांना या परिषदेत दिला. ‘एआय’ मानवतेच्या सेवेसाठी, नोकर्‍या हिरावण्यासाठी नाही, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. “तंत्रज्ञानाचा अंतिम उद्देश सर्वांचे कल्याण आणि सर्वांचा आनंद हाच असायला हवा. ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ ही भारताची संस्कृती आहे
आणि याच भावनेतून भारत एआयकडे पाहत आहे. एआय हे मानवी क्षमतेत वाढ करणारे साधन आहे, ते मानवाची जागा घेण्यासाठी किंवा नोकर्‍या हिरावण्यासाठी नाही,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेतील एका सत्रात स्पष्ट केले. सन 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी एआई
महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी विविध क्षेत्रांतील उदाहरणे दिली. ते म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टीबी आणि मधुमेहासारख्या आजारांचे निदान एआईद्वारे केले जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिकण्यासाठी एआई प्लॅटफॉर्म मदत करत आहेत. ‘अमूल’च्या पुढाकाराने 36 लाख महिला दुग्ध उत्पादकांना गुजराती भाषेत एआईद्वारे मार्गदर्शन दिले जात आहे. तसेच ‘भारत विस्तार’ उपक्रमातून शेतकर्‍यांना हवामानाची अचूक माहिती मिळत आहे. यांकडे त्यांनी लक्ष वेधले. आगामी कालावधीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता सकारात्मक पद्धतीने वापरण्याचे संकेत देण्यात आले असले, तरी अद्यापही या तंत्रज्ञानाबाबत संभ्रम आणि संशय कायम आहे. कृत्रिम प्रज्ञा शिखर परिषद भरली असताना, सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाची टिप्पणी केली. सर्वोच्च न्यायालयात किंवा अन्य कोणत्याही न्यायालयात दाखल करण्यात येणार्‍या याचिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर चिंताजनक असल्याचे स्पष्ट मत सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी व्यक्त केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआयचा वापर करून दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये बनावट आदेशांचा संदर्भ आणि चुकीची उदाहरणे दिली जात असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले. अशा प्रकारच्या चुकीच्या संदर्भांमुळे आणि चुकीच्या माहितीमुळे न्यायदानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आणि भीतीही सरन्यायाधीशांनी व्यक्त केली आहे. अस्तित्वातच नसलेल्या एखाद्या केसचा उल्लेख करून एआयच्या माध्यमातून याचिका दाखल केल्या जात असल्याची माहितीही सरन्यायाधीश यांनी दिली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता एक तंत्रज्ञान आहे. वापर केल्यानंतरच त्याचे चांगले-वाईट परिणाम दिसतात. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आशय निर्मिती केली जाते. त्या आशयावर विश्वास कसा ठेवायचा, हा प्रश्न आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आता अस्तित्वात नसलेल्या गोष्टीच समोर आणल्या जात असल्याने गैरसमजाचे आणि संभ्रमाचे वातावरण पसरण्याची भीती लक्षात घ्यायला हवी. औद्योगिक किंवा आर्थिक विकास यासाठी या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर जरी स्वीकारार्थ असला तरी हे तंत्रज्ञान जर चुकीच्या हातात पडले तर त्यातून अनेक नकारात्मक गोष्टी बाहेर येऊ शकतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून जे विविध प्रकारचे आशय समोर येत आहेत. त्यांच्यामध्ये मुक्तपणे आणि चुकीच्या पद्धतीने एआयचा वापर होताना दिसत आहे. एखादी गोष्ट खरी आहे का खोटी आहे याबाबत संभ्रम निर्माण व्हावा, अशी परिस्थिती या तंत्रज्ञानाने निर्माण केलेली असल्याचे दिसते. दिल्लीत एआय परिषद भरण्यापूर्वी केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी कठोर नियम जारी केले. एआय वापरून तयार केलेले फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओबाबत सरकारने कठोर नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 20 फेब्रुवारी 2026 पासून अशा सर्व कंटेंटवर स्पष्टपणे ‘एआय’असे लेबल लावणे आवश्यक असेल. याचा उद्देश डीपफेक, बनावट व्हिडिओ आणि दिशाभूल करणारी माहिती रोखणे आहे, जेणेकरून वापरकर्ते खर्‍या आणि बनावटीत फरक करू शकतील. नवीन नियमांनुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केलेले कोणतेही फोटो, व्हिडिओ किंवा ऑडिओ स्पष्ट लेबलसह प्रदर्शित करावे लागतील. सोशल मीडिया कंपन्यांना खात्री करावी लागेल की, वापरकर्ते अचूक माहिती देत आहेत. जर कोणताही दिशाभूल करणारा किंवा बेकायदेशीर एआय कंटेंट आढळला तर तो तीन तासांच्या आत काढून टाकणे बंधनकारक असेल. या नियमांमुळे इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मच्या कार्यप्रणालीत लक्षणीय बदल होतील. केवळ वापरकर्त्याच्या माहितीवर विश्वास ठेवणे पुरेसे राहणार नाही. प्लॅटफॉर्मना कंटेंटमध्ये एआय वापराचे प्रमाण तांत्रिकदृष्ट्या पडताळावे लागेल. एआय वापरून रील, फेस-स्वॅप व्हिडिओ किंवा बनावट आवाज तयार करून लोकप्रियता मिळवणार्‍यांना आता सावधगिरी बाळगावी लागेल. सर्व एआय कंटेंटवर एक लेबल दिसेल, जे प्रेक्षकांना सतर्क करेल की तो खरा नाही. जर कोणी जाणूनबुजून एआयचा वापर लपवला तर त्यांचे खाते निलंबित किंवा कायमचे बंद केले जाऊ शकते. नवीन नियमांनुसार एआयद्वारे परवानगीशिवाय एखाद्याचा चेहरा किंवा आवाज वापरणे कायदेशीर अडचणी
निर्माण करू शकते. आज विनोद किंवा ट्रेंड वाटणारी गोष्ट भविष्यात गंभीर समस्या ठरू शकते. त्यामुळे कंटेंट तयार करताना निर्मात्यांना अधिक जबाबदारी घ्यावी लागेल. आशयांविषयी लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी सरकारचे नियम चांगले आहेत. जगातील सर्वांत मोठी कृत्रिम परिषद भारतात भरली. त्याच परिषदेत एका विद्यापीठाने रोबोट तयार केल्याचा दावा फोल ठरला. ग्रेटर नोएडा येथील गलगोटिया विद्यापीठाच्या वतीने सादर करण्यात आलेला चार पायांचा रोबोटिक डॉग हा विद्यापीठानेच विकसित केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, तो प्रत्यक्षात चीनमध्ये तयार होणारे व्यावसायिक उत्पादन असल्याचे समोर आल्यानंतर टीकेचा भडिमार झाला. भारताच्या विद्यापीठाने चिनी रोबोट स्वतःचा म्हणून सादर केल्याचे म्हणत चीनमधील नेटकर्‍यांनी चांगलीच खिल्ली उडविली. परिषदेच्या आयोजकांनी दाव्यांमधील तफावत आणि सोशल मीडियावरील वाढत्या गोंधळाचे कारण देत विद्यापीठाला तात्काळ एक्स्पो स्थळ रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, 18 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजकांनी गलगोटिया विद्यापीठाला आपला प्रदर्शन स्टॉल तातडीने रिकामा करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे, या स्टॉलचे कौतुक करणारी विशेष बातमी दूरदर्शनच्या अर्थात डीडी न्यूजच्या प्रतिनिधीने आधी दिली होती. भारत मंडपम येथे आयोजित समिटमध्ये गलगोटिया विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापक नेहा सिंग यांनी ‘ओरायन’ नावाचा रोबोटिक डॉग सादर केला. त्यांनी हा रोबोट गलगोटिया विद्यापीठाच्या “सेंटर ऑफ एक्सलन्स”मध्ये विकसित करण्यात आल्याचे सांगितले.

artificial intelligence

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

3 hours ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

3 hours ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

3 hours ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

3 hours ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

3 hours ago

बांगलादेशमधील सत्तांतर

दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. बांगलादेशमधील नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दीर्घकाळ…

3 hours ago