सहकार उद्योग विकासला 8 तर उद्योजक विकासला 4 जागा स्टाइस बचावचा सुपडा साफ
सिन्नर:
सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या निवडणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे समर्थक नामकर्ण आवारे यांच्या नेतृत्वाखालील सहकार उद्योग विकास आघाडीने 12 पैकी 8 जागांवर विजय मिळवत सत्ता मिळवली तर आमदार माणिकराव कोकाटे समर्थक सुधा माळोदे, माजी चेअरमन अविनाश तांबे, पंडितराव लोंढे यांच्या नेतृत्वाखालील उद्योजक विकास पॅनलला 4 जागा मिळाल्या. दिलीपराव शिंदे, किशोर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्टाइस बचाव पॅनलचा सुपडा साफ झाला. तिरंगी झालेल्या या निवडणुकीत वसाहतीचे संस्थापक नानासाहेब गडाख यांची कन्या सुधा माळोदे गडाख यांच्या नेतृत्वाखालील उद्योजक विकास व माजी चेअरमन दिलीपराव शिंेदे यांच्या नेतृत्वाखाली स्टाइस बजाव असे आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांचेच दोन पॅनल झाल्याने त्याचा फायदा नामकर्ण आवारे यांना झाला.
क्रॉस वोटींगमुळे या निवडणुकीत पाडा-पाडीच्या राजकारणाचा प्रत्यय आला. कारखानदार मतदार संघातील 7 जागांपैकी आवारे यांच्या सहकार उद्योग विकास आघाडीला 5 तर उद्योजक विकास पॅनलला 2 जागा मिळाल्या, महिला राखीव गटातून दोन्ही पॅनलला प्रत्येकी एक जागा मिळाली तर इतर मागास प्रवर्गातून उद्योजक विकास पॅनल व अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग व भटक्या विमुक्त जाती-जमाती गटातून आवारे गटाने विजय संपादन केला.