वन विभागाची बंदी असूनही पर्यटनासाठी मोठी गर्दी

इगतपुरी : प्रतिनिधी
मागील आठवड्यापासून इगतपुरी तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने तालुक्यातील धरण साठयात कमालीची वाढ झाली आहे. भावली धरण दोन दिवसापुर्वीच ओव्हरफ्लो झाले आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी डोंगर उतारावरून पाण्याचे धबधबे सुरू झाल्याने पर्यटकांची इकडे गर्दी वाढत आहे. तालुक्यात भावली डॅम, अशोका धबधबा, वैतरणा डॅम, भंडारदरा, दारणा, भाम आदी ठिकाणी पर्यटनासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र शनिवारी वन विभागाच्या वतीने पर्यटनस्थळी जाण्यास बंदी घातल्याने पोलिसांनी भावली धरणाकडे जाण्यास बंदी घातली आहे.

पर्यटन स्थळाकडे जाणार्‍या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. मात्र पर्यटकांना येथे येण्यासाठी बंदी असूनही चोरी छुप्या मार्गाने पर्यटक शनिवार व रविवारी मोठया प्रमाणात हजेरी लावत आहेत. या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मुंबई, नाशिक, पुणे अशा महाराष्ट्राच्या विविध भागातून शनिवार, रविवारी व सुट्टीच्या काळात हजारो पर्यटक आनंद लुटण्यासाठी येत आहेत. मात्र पर्यटन स्थळावर बंदी घातल्याने आलेल्या पर्यटकांनी इगतपुरी शहरातील रेल्वे तलाव व नगरपरिषद तलावाकडे आपला मोर्चा वळवल्याचे पाहावयास मिळत आहे.पर्यटन बंदीमुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड होताना पाहावयास मिळत आहे.

सुरक्षेच्या कारणावरून वनविभागाने पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यास बंदी घातली आहे. जिल्हा पोलीस विभागाकडून मोठा पोलीस बंदोबस्त पाठवण्यात आला आहे. मुंबई- आग्रा महामार्गावरील पिंप्रीसदो चौफुलीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. छुप्या पध्दतीने भावली धरणाकडे जाणार्‍या पर्यटकांवर कारवाई करण्यात येत आहे.
– वसंत पथवे, पोलीस निरीक्षक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *