नाशिक

बडगुजरांची भाजप-शिंदेसेनेतील विरोधकांकडून नाकाबंदी

राजकीय पुनर्वसन कुठे होणार?

नाशिक : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चेत आलेले सुधाकर बडगुजर यांची शिवसेना ठाकरे गटातून बुधवारी हकालपट्टी केली. दरम्यान, बडगुजर यांचा पुढील राजकीय प्रवास कसा असेल? हे आताच सांगणे कठीण झाले आहे. कारण बडगुजर भाजपमध्ये येणार असल्याची कुणकुण लागताच पश्चिम मतदारसंघाच्या आ. सीमा हिरे यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे. तर शिंदेसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनीदेखील सुधाकर बडगुजर पक्षात नको, अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, भाजप-शिंदेसेनेतीलच प्रमुख पदाधिकार्‍यांकडून बडगुजरांना विरोध करून त्यांच्या नाकाबंदीचे प्रयत्न सुरू झाल्याने बडगुजरांचे पुढे काय, याकडे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा विजय झाल्यानंतर बडगुजर यांचा आत्मविश्वास दुणावला. पक्षाकडून त्यांनी नाशिक पश्चिममधून उमेदवारी मिळवत जोरदार प्रचार केला. विशेष म्हणजे, त्यांनी माजी आ. अपूर्व हिरे, डॉ. डी. एल. कराड आदींसह इतर नेते सोबत घेतले. परंतु, त्यांंचा भाजपच्या सीमा हिरे यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला. निवडणुकीपूर्वीच आरपीआयचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर चार वर्षांपूर्वीच्या गोळीबार प्रकरणात त्यांचे पुत्र दीपक बडगुजर याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. विधानसभेच्या तोंडावर बडगुजरांसाठी हा धक्का होता. तसेच बडगुजरांचे 1993 मधील बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताबरोबर नाचतानाचे व्हिडिओ व फोटो विधिमंडळात भाजप आमदार नितेश राणे व मंत्री दादा भुसे यांनी दाखवत खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी ठाकरे गटाने त्यांची पाठराखण केली होती. मात्र, बडगुजरांविरोधात नाशिक शहरात शिंदेसेनेबरोबरच भाजपने आंदोलन करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, एकामागोमाग येणार्‍या अडचणींचा सामना करून बडगुजरांनी निवडणूक लढवली. मात्र, त्यात पराभव झाला. पराभवानंतर ते कमालीचे अस्वस्थ झाले होते. हे पाहून पक्षाने त्यांच्याकडील जिल्हाप्रमुखपद काढून घेत त्यांची उपनेतेपदी नियुक्ती केली. अशातच त्यांची भाजपशी जवळीक वाढल्याचे पाहून आणि पक्षविरोधी भूमिका घेतल्याने ठाकरे गटाने त्यांची हकालपट्टी करत धक्का दिला.

कोण आहेत सुधाकर बडगुजर

सुधाकर बडगुजर अपक्ष नगरसेवक म्हणून 2007 मध्ये महापालिकेवर निवडून गेले. 14 जून 2008 रोजी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश झाला होता. अभ्यासू आणि आक्रमक शैलीमुळे पक्षाने 2009 ते 2012 अशी तीन वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपद दिले. 2012 ते 2015 या कालावधीत बडगुजर यांनी महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद भूषविले. 2014, 2019 आणि 2024 मध्ये बडगुजर यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, या तिन्ही निवडणुकांत त्यांचा पराभव झाला.

शिंदेसेनेत विरोधच
सुधाकर बडगुजर यांचा मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी सलीम कुत्ताशी संबंध असल्याचे आरोप आहेत. त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास सर्व शिवसैनिकांचा विरोधच राहील. सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन ठेकेदारीसाठी त्यांना सत्तेत सहभाग हवा आहे. शिवसेनेत जनसामान्यांना सोबत घेऊन वाटचाल करणे वंदनीय बाळासाहेबांना आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेबांना अपेक्षित होते. त्यांच्या शिकवणीतून शिवसेनेचा झेंडा घेऊन सामाजिक कार्यात उतरणार्‍यांना शिवसेनेची दारे नेहमीच उघडी आहेत. मात्र, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणार्‍यांना प्रवेशाला विरोधच राहील.
– प्रवीण तिदमे,
महानगरप्रमुख, शिंदेसेना

Gavkari Admin

Recent Posts

कांद्याचे भाव गडगडणार

कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…

14 hours ago

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…

16 hours ago

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

1 day ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

1 day ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

1 day ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

2 days ago