नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरातून 6 लाखांची रोकड असलेली बॅग लंपास

अज्ञात रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरातील नालंदा रिक्षा स्टँडवर एका प्रवाशाची सहा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन रिक्षाचालक पसार झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 20) घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौरभ गिरीश आहेर (वय 30, रा. साईविश्व रेसिडेन्सी, काठेगल्ली) हे शनिवारी सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास नाशिकरोड रेल्वे स्टेशनबाहेरील नालंदा रिक्षा स्टँड परिसरात आले होते. त्यांच्याकडे 500 रुपये दराच्या एकूण 1200 नोटा असलेली 6 लाख रुपयांची रोख रक्कम ठेवलेली बॅग होती.
ही पैशांची बॅग त्यांनी एका अज्ञात रिक्षाचालकाच्या रिक्षामध्ये ठेवली होती. फिर्यादी यांचे लक्ष नसताना, सदर अज्ञात रिक्षाचालकाने लबाडीच्या इराद्याने ही सहा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन रिक्षासह तेथून पळ काढला. बॅग चोरीला गेल्याचे लक्षात येताच आहेर यांनी तातडीने नाशिकरोड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सहाय्यक निरीक्षक सूर्यवंशी आणि पोलीस हवालदार देवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फिर्यादी सौरभ आहेर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करत आहेत. रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस संशयित रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.

Bag containing ₹6 lakh in cash stolen from Nashik Road railway station area.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *