इन्स्टाग्रामवरून प्रेमाचे आमिष; तोतया पोलिसाकडून तरुणीची फसवणूक

एआयने अश्लील फोटो बनवून व्हायरल करण्याची धमकी; वावी पोलिसांचा सापळा, आरोपी अटकेत

सिन्नर : प्रतिनिधी
सोशल मीडियावर ओळख करून स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवत एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याकडून तीन लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार सिन्नर तालुक्यात उघडकीस आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून पैसे उकळल्यानंतर एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने बनावट अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या तोतया पोलीस अधिकार्‍याला वावी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष पाटील या नावाने ओळख सांगणार्‍या भामट्याचे खरे नाव आसिफ कौसर तडवी (रा. जळकी बाजार, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आहे. त्याने इन्स्टाग्रामवरून सिन्नर तालुक्यातील एका तरुणीशी ओळख वाढवली. सुरुवातीला आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस दलात कार्यरत असल्याचे सांगत त्याने तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर खात्यांतर्गत बढती मिळून आपण पीएसआय झाल्याचे सांगितले. नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयात प्रशिक्षण घेत असल्याचे सांगत त्याने तरुणीला लग्नाचे आश्वासन दिले.
यादरम्यान त्याने विविध कारणे सांगत तरुणीकडून वारंवार पैशांची मागणी केली. प्रेमाच्या नात्यावर विश्वास ठेवून तरुणीने त्याला वेळोवेळी पैसे पाठवले. मात्र, या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर चौकशी केली असता, सदर व्यक्ती बनावट नावाने फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तरुणीने वावी पोलीस ठाण्यात धाव घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांना आपबिती सांगितली.
दरम्यान, आरोपीने एआय तंत्रज्ञानाच्या आधारे तरुणीचे अश्लील फोटो तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही समोर आले. पोलिसांच्या सल्ल्यानुसार तरुणीने आरोपीला भेटण्यासाठी बोलावले. ठरल्याप्रमाणे तो तिच्या गावी आला असता, दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस बनून पल्सरवर थाटात एन्ट्री
आरोपी तडवी हा महागड्या स्पोर्ट बाइकवरून तरुणीला भेटण्यासाठी आला होता. त्याने मिलिटरी रंगाची पॅन्ट, पांढरा टीशर्ट, टोपी तसेच गळ्यात ओळखपत्र अडकवून पोलीस प्रशिक्षणार्थी अधिकार्‍याचा आव आणला होता. बाइकच्या पुढील बाजूस ‘पोलीस’ असे ठळक अक्षरांत लिहिलेले होते.

इतर ठिकाणीही फसवणुकीचे प्रकार
तडवी हा उच्चशिक्षित असून, यापूर्वीही फसवणुकीच्या प्रकारांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस असल्याची बतावणी करून त्याने वाळू वाहतूक करणार्‍या ट्रकचालकांना अडवून लुटल्याचा प्रकार 2022 मध्ये उघड झाला होता. अजिंठा पोलीस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Bait of love on Instagram; Impersonator police officer cheats young woman

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *