आले गणराय : बुकिंगसाठी नागरिकांची स्टॉलवर गर्दी
नाशिक : प्रतिनिधी
गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर आला आहे. बच्चेकंपनीपासून आबालवृद्धांना गणपतीच्या आगमनाचे वेध लागले आहेत. गणरायाच्या स्वागताची जोरदार तयारी करत असताना घरी सुबक व आकर्षक बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी गणपती मूर्तीच्या स्टॉलवर ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे. बाप्पाच्या मूर्तीची बुकिंग करत गणरायाच्या स्वागताची तयारी करण्याची नागरिकांची लगबग सुरू आहे.
शहरातील प्रमुख परिसरात गणरायाच्या मूर्ती विक्रीचे स्टॉल लागले असून, पीओपीबरोबरच शाडूच्या मूर्तींना अधिक पसंती मिळत असल्याचे गणेशमूर्ती विक्रेत्यांनी सांगितले.
शाडूच्या मूर्ती सहा इंचापासून दीड फुटापर्यंत असून, त्यांच्या किमती चारशे ते अडीच हजार रुपयांपर्यंत आहे. अनेक स्टॉलधारकांना 15 ऑगस्टापासून बाप्पांच्या मूर्तीचे बुकिंग सुरू केले असून, नागरिकही मूर्ती बुकिंग करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. यंदा पेण, पनवेल, कल्याण येथून नाशिक शहरात मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत. गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत नवचैतन्य पसरल्याचे चित्र आहे.
महागाईचा फटका
यंदा बाप्पाच्या मूर्तींनाही महागाईचा फटका बसल्याचे चित्र असून, मागील वर्षीच्या तुलनेत 20 ते 30 टक्क्यांनी गणपतीच्या मूर्तीच्या किमती वाढल्या आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने गणरायाच्या मूर्तीच्या किमतीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
यंदा बाप्पाच्या मूर्तीच्या किमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नागरिकांकडून शाडूच्या मूर्तींना अधिक पसंती मिळत आहे. गेल्या 35 वर्षांपासून आमचा गणेशमूर्ती विक्रीचा व्यवसाय असल्याने नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनही ग्राहक दरवर्षी मूर्ती खरेदीसाठी येत असातात.
– विजय पाटील, मुद्रा आर्ट
विविध प्रकारच्या मूर्ती वेधताहेत लक्ष
विविध प्रकारच्या बाप्पाच्या सुबक व आकर्षक मूर्ती लक्ष वेधून घेत आहेत. यात पद्मासन, अर्धपद्मासन, म्हैसुरी बैठक, पगडी गणेश, फेटा गणेश, चौरंग गणेश, लालबागचा राजा, बालगणेश, अष्टविनायक, दगडूशेठ, उंदीर आसन, शंखावर बसलेले बाप्पा, जास्वंद, कमळ, विड्याच्या पानातील बाप्पा, महाराजा बैठक अशा विविध प्रकारातील बाप्पाच्या मूर्ती बाजारपेठेत विक्रीसाठी आहेत.
Bappa gets costlier; idol prices rise by 20 percent.