बाप्पा, यंदा तरी खड्डेमुक्त शहर होऊ दे!

– अश्विनी पांडे

गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने शहरात गणपतीचे आगमन झाले. मात्र, नाशिककरांसोबत बाप्पालाही प्रतिष्ठापना होईलपर्यंतच्या प्रवासात खड्ड्यांचा सामना करावा लागला. परिणामी उत्सवाच्या या आनंदी वातावरणात मात्र नाशिककरांच्या मनात यंदा एक वेगळीच अपेक्षा आहे, बाप्पा, यंदा तरी खड्डेमुक्त नाशिक होऊ दे! कारण गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन आणि प्रशासनाकडून वारंवार आदेश देऊनही अनेक भागांतील रस्त्यांची अवस्था अद्याप जैसे थे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाप्पाचे स्वागत जरी खड्डेमय रस्त्याने झाले असले, तरी बाप्पाला निरोप हा खड्डेविरहित रस्त्यांतून देता यावा, अशी अपेक्षा नाशिककर गणेशभक्तांची आहे.

शहरात खड्डयांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण जखमी झाले. खड्डयांच्या प्रश्नावर सामाजिक संघटना, राजकीय पक्षांकडून आंदोलने, निर्दशने करण्यात आली. मात्र, खड्डेविरहित रस्ते नाशिककरांना काही पाहायला मिळाले नाहीत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्रमुख रस्ते, चौक, तसेच गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणूक मार्गांची पाहणी करून खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले होते. महापालिकेकडून मोठ्या संख्येने खड्डे बुजविल्याचा दावा करण्यात आला. मात्र, शहरातील अनेक भागांत अद्याप खड्डे आणि खराब रस्ते कायम असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी गणेशमूर्ती घेऊन जाणार्‍या ट्रॉलीला रस्त्यावरील खड्ड्यामुळे अडथळा निर्माण झाल्याचे घटनेतून समोर आले. गणेश मंडळांच्या बैठकीत मिरवणूक मार्गावरील खड्डे, अडथळे आणि इतर समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. हजारो नागरिक सहभागी होणार्‍या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरच रस्त्यांची दुरवस्था असेल, तर उत्सवाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
खड्ड्यांचा प्रश्न केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित नाही, तर तो वर्षभरातील प्रत्येक दिवसाचा प्रश्न आहे. मात्र, पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अधिक बिकट होते. त्यातच यंदा ठिकठिकाणी सुरू असलेल्या सिंहस्थ कामांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचे चित्र आहे. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही खड्डेच खड्डे असल्याने बाप्पाला घरी नेताना गणेशभक्तांना मोठी कसरत करावी लागली. शहरातील अनेक ठिकाणी बाप्पाला घरी नेताना खड्डयांमुळे वाहनचालकाचा तोल जाऊन मूर्ती भग्न झाल्या. एकीकडे रस्त्यावर खड्डे असताना मिरवणूक मार्गावर 20 स्पीड ब्रेकर असल्याने गणेश मंडळांपुढे बाप्पाच्या विसर्जन मिरणूकीत मूर्ती सुरक्षित ठेवताना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे बाप्पाच्या विसर्जन मिरवणूक व बाप्पाला निरोप देताना तरी रस्ते चांगले व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शाळकरी मुलांनाही खराब रस्त्यांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था ही नागरिकांच्या सोयीचा प्रश्न न राहता त्यांच्या सुरक्षिततेशी व आरोग्याशी जोडलेली बाब बनली आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, रस्त्यांवरील खड्ड्यांची चर्चा सुरू होते आणि एखादा सण जवळ आला की, त्यांची तातडीने डागडुजी केली जाते. काही दिवसांनी परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येते. हीच पद्धत कायम राहणार असेल, तर खड्डे बुजविण्यासाठी होणारा खर्च आणि त्यासाठी खर्च होणारा वेळ दोन्ही वाया जाण्याची शक्यता आहे. खड्ड्यात डांबर किंवा खडी टाकून केलेली तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी रस्ता खराब होण्यामागील मूळ कारण शोधून टिकाऊ काम करण्याची गरज आहे.
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. शहराच्या भविष्यासाठी ही कामे आवश्यक असली, तरी विविध कामांसाठी वारंवार रस्ते खोदले जात असतील तर खोदकामानंतर रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारीही तितक्याच गांभीर्याने पार पाडली पाहिजे. एका यंत्रणेने रस्ता तयार करायचा आणि काही काळातच दुसर्‍या कामासाठी तो पुन्हा खोदायचा, अशी परिस्थिती टाळण्यासाठी सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला कायमस्वरूपी त्रास होणे योग्य नाही. नाशिककरांना केवळ सणाच्या काही दिवसांसाठी चांगले रस्ते नको आहेत. वर्षभर सुरक्षित आणि सुस्थितीत रस्ते मिळणे ही त्यांची अपेक्षा आहे. त्यासाठी रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता तपासणे, संबंधित ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करणे आणि निकृष्ट काम आढळल्यास कारवाई करणे आवश्यक आहे.शहरातील रस्त्यांवर खर्च होणारा पैसा हा नागरिकांच्या करातून येतो. त्यामुळे रस्त्याचे काम किती खर्चात झाले, त्याची गुणवत्ता काय होती आणि काही महिन्यांतच तो खराब का झाला, याची उत्तरे नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. किती खड्डे बुजविले यापेक्षा पुन्हा खड्डे पडू नयेत यासाठी काय केले, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे.
गणरायाच्या चरणी नाशिककर दरवर्षी सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान मागतात. यंदा त्यात आणखी एका मागणीची भर पडली आहे, खड्ड्यांच्या त्रासातून मुक्तीची. ही मागणी केवळ उपरोध म्हणून न पाहता प्रशासनाने त्यामागील नागरिकांची अपेक्षा समजून घेण्याची गरज आहे. उत्सवाच्या काळात शहर सुंदर दिसावे, गणरायाच्या मिरवणुका सुरक्षितपणे पार पडाव्यात आणि नागरिकांना विनाअडथळा प्रवास करता यावा एवढीच त्यांची अपेक्षा आहे. तात्पुरती डागडुजी न करता दर्जेदार रस्ते, योग्य नियोजन आणि जबाबदारी निश्चित करणारी यंत्रणा उभी राहिली, तरच ही अपेक्षा पूर्ण होईल.

Bappa, let the city be pothole-free this year, at least!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *