महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघातील निवडणूक निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कोणत्याही पक्ष किंवा आघाडीला खर्या अर्थाने मतदारांच्या परीक्षेला सामोरे जावे लागलेले नाही. मात्र, सुशिक्षित मतदारांच्या या निवडणुकीत भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) युती आणि महाविकास आघाडीची एक जनमत चाचणी म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जात होते. शिवसेना (आता शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी एकत्रित राहिली, तर भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे) यांचा मुकाबला करणे तसे अवघड नाही, असेच संकेत या निकालांतून दिले गेले आहेत. पदवीधर आणि शिक्षक हे सुशिक्षित मतदार म्हणून ओळखले जातात. माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षक (प्राध्यापक) पदवीधर असल्याने त्यांचा समावेश पदवीधर मतदारसंघातही होत असतो. हे सुशिक्षित मतदार अभ्यासू असतात आणि विचारपूर्वक मतदान करतात. त्यांनी भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना या सत्ताधारी पक्षांना नाकारले आहे. पाचपैकी तीन जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. एक जागा भाजपाला आणि एक जागा अपक्षाने जिंकली. भाजपाला नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघ गमवावे लागले, तर कोकणातील शिक्षकांची एक जागा भाजपाने खेचून आणली. नाशिक पदवीधरमध्ये विजयी झालेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला होता. त्यामु़ळे ही जागा आमची, असा दावा भाजपाला करता येईल. औरंगाबाद शिक्षकांची जागा महाविकास आघाडीने राखली. पक्षनिहाय विचार केला, तर पाचपैकी दोन जागा (नागपूर व अमरावती) काँग्रेसला, भाजपा (कोकण) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (औरंगाबाद) यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. नाशिकची एक जागा अपक्ष उमेदवाराने (तांबे) जिंकली. शिवसेनेच्या दोन्ही गटांचे उमेदवार (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना) या निवडणुकीत नव्हते. भाजपाला विदर्भात दणका बसल्याने महाविकास आघाडीत विश्वासाचे वातावरण निर्माण होऊ शकेल. पुढील वर्षी होणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत महाविकास आघाडी एकसंध राहिली आणि तिला वंचित बहुजन आघाडीची साथ लाभली, तर भाजपासमोर कडवे आव्हान उभे राहू शकते, असे संकेत या निकालांतून मिळतात.
बालेकिल्ल्यात पराभव
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे तीनही भाजपाचे वजनदार नेते नागपूरचे आणि त्यांचे वर्चस्व संपूर्ण विदर्भात. विदर्भ हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याने नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघात विजय निश्चित मानला जात होता. अमरावती पदवीधर मतदारसंघात दोन वेळा प्रतिनिधित्व करणारे डॉ. रणजित पाटील यांचा पराभव भाजपासाठी मोठा धक्का ठरला. डॉ. पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपाने शक्तिप्रदर्शनही करुनही पदरी पराभव पडला. हा पराभव डॉ. पाटील यांच्याप्रमाणे फडणवीस आणि बावनकुळे यांचाही आहे. तसाच पराभव नागपूरमध्ये त्यांच्या वाट्याला आला. भाजपाचे विद्यमान आमदार नागो गाणार यांच्यापेक्षा दुपटीहून अधिक मते घेऊन काँग्रेसचे सुधाकर अडबाले सहज निवडून आले. आपल्या बालेकिल्ल्याकडे भाजपाच्या वजनदार नेत्यांना लक्ष देता आले नाही. बालेकिल्ला असल्याने भाजपाने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला विश्वासात घेतले नाही, असेही दिसते. भाजपाने विश्वासात घेतले असते, तर अमरावतीत काँग्रेसचा पराभव झाला असता, असे शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. यावरुन दोन सताधारी पक्षांत ताळमेळ नव्हता. पण, कोकणात शिंदे गटाने मनापासून साध दिल्याने भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी होऊ शकले. शिक्षक सेनेतून ऐनवेळी ते भाजपात आले होते. कोकणात शिंदे गटाचे वर्चस्व, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा राबता यामुळे भाजपाने विजय मिळविला. गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडून आलेले शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांनी यावेळी पक्षाची उमेदवारी घेतली नव्हती. त्यांच्याविरुद्ध असलेल्या नाराजीचा लाभ भाजपाला झाला. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेसचे विक्रम काळे यांनी चौथ्यांदा विजय मिळविला असला, तरी ते दुसऱ्या पसंतीच्या १३ व्या फेरीत निवडून आले. त्यांच्याविषयी नाराजी असल्याचा लाभ भाजपाला उठविता आला नाही. परिणामी किरण पाटील यांना पराभूत व्हावे लागले. डिसेंबर २०२० मध्ये महाविकास आघाडीने मराठवाडा, नागपूर, पुणे पदवीधर, अमरावती व पुणे शिक्षक मतदारसंघातही महाविकास आघाडीने बाजी मारुन भाजपाला दणका दिला होता. त्यावेळीही भाजपाला नागपूर आणि अमरावती या जागा गमवाव्या लागल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती आता झाली आहे.
महाविकासची सरशी
गडकरी, फडणवीस आणि बावनकुळे जसे नागपूर-विदर्भातील तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही नागपूर-विदर्भातीलच. नागपूर आणि अमरावतीच्या जागा जिंकण्यात त्यांची रणनीती यशस्वी झाल्याचे म्हणता येते. नाशिकची जागा काँग्रेसने हातची घालवली, तरी विदर्भात मात्र, काँग्रेसने आपल्यातील जिवंतपणा दाखवून दिला. यामुळे पटोले यांचे दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींसमोर निश्चित वजन वाढणार आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे सुधाकर अडबाले यांच्या विजयाचे भाकित कोणीही करत नव्हते. पण, त्यांचा विजय हा चमत्कारच मानला जात असून, त्यामागे पटोले असल्याचे मानले जाते. असाच चमत्कार अमरावतीत झाला. शिवसेनेतून ऐनवेळी आलेले धीरज लिंगाडे हे नवखे असूनही त्यांना महाविकास आघाडीतील मतांची मोट बांधण्यात यश आले. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी आपली जागा रडतखडत राखली, तरी विजयाला महत्व आहे. कोकणात काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नव्हता अपक्ष उमेदवारी करणारे शेकापचे बाळाराम पाटील यांना नाराजी भोवली. डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसचे तिकीट खिशात ठेवून आपले पुत्र सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिल्याने नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणूक चुरशीची ठरली. तांबे पितापुत्रांवर काँग्रेसने कारवाई केली. भाजपाने त्यांना पाठिंबा दिला. भाजपाकडून उमेदवारीची आस असलेल्या शुभांगी पाटील यांनी ऐनवेळी महाविकास आघाडीची अपक्ष उमेदवारी स्वीकारली. पण, त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपेक्षित साथ मिळाली नाही, यावरुन शुभांगी पाटील यांचा पराभव निश्चित होता. भाजपाने शब्द पाळला नाही म्हणून त्या रिंगणात राहिल्या. तांबे यांची आधीपासून तयारी होती. त्यामु़ळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. काँग्रेसने सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली पाहिजे होती, असे अजित पवार यांनी निकालाच्या दिवशी म्हटले. काँग्रेसने सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली असती, तर महाविकास आघाडीला पाचपैकी चार आणि काँग्रेसला तीन मिळाल्या असत्या. सत्यजित तांबे यांना आम्ही मदत केली, असे अजित पवार म्हणाले आहेत. यावरुन महाविकास आघाडीत नाशिक पदवीधर मतदारसंघात ताळमेळ नव्हता. तरीही महाविकास आघाडीची सरशी या निवडणुकीत झाल्याने भाजपाचा मुकाबला करणे अवघड नाही, हा विश्वास बळावला गेला आहे.
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…