23 चित्ररथांनी वेधले लक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह
नाशिक : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शहरात दिवसभर जनसागर लोटला होता. आसमंती निळ्या पताका फडकवत, नेत्रदीपक रोषणाई, ढोल-ताशांचा दणदणाट आणि डीजेच्या तालावर सायंकाळी शहरातील जुने नाशिकमधील मोठा राजवाडा येथून निघालेल्या मिरवणुकांनी लक्ष वेधून घेतले.
यावेळी मुख्य मिरवणुकीत 23 लक्षवेधी चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. ’लय मजबूत भीमाचा किल्ला..’ ’व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं.. व्हीआयपी मानसन्मान..’ यांसारख्या भीमगीतांच्या स्वरांनी आणि ‘जय भीम’च्या जयघोषाने मंगळवारी (दि.14) शहर दुमदुमून गेले. सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली ही मिरवणूक मध्यरात्री 12 पर्यंत सुरू होती. तत्पूर्वी, मिरवणुकीस आमदार प्रा. देवयानी फरांदे, महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आनंद सोनवणे, यश शिंदे, अर्जुन पगारे, बाळासाहेब शिंदे, निखिल पवार, रामसिंग बावरी, बॉबी काळे यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे चित्ररथांवर साकारलेली कल्पकता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासोबतच भारतीय संविधानाची प्रत आणि
सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीची भव्य प्रतिकृती चित्ररथांवर साकारण्यात आली होती. लोकप्रिय भीमगीतांच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसत होती. विद्युत रोषणाईने न्हाऊन निघालेले हे चित्ररथ पाहण्यासाठी मार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. डीजेच्या तालावर युवकांनी धरलेला ठेका आकर्षणाचे केंद्र
ठरला.
दरम्यान, जयंतीनिमित्त शहरात रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. एकूणच नाशिकमध्ये आंबेडकर जयंती उत्साह, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरी झाली.
यामार्गे निघाली मिरवणूक
मोठा राजवाडा येथून निघालेली मिरवणूक चौकमंडई, वाकडी बारव, दूध बाजार, गाडगे महाराज पुतळा, रेडक्रॉस सिग्नल आणि नेहरू गार्डन यामार्गे पुढे सरकली. शिवाजी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली.
Bhimsagar surged during the procession