2 एप्रिल 2022 म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेत मशिदींवरच्या भोंग्यांचा उल्लेख करीत संघर्षाचा भोंगा वाजवला. तेव्हापासून आज 35 दिवस झाले तरी हा भोंगा वाजतोच आहे. या भोंग्यांमुळे महाराष्ट्रात दंगा तर होणार नाही ना, अशी परिस्थितीही निर्माण झाली होती. याच भोंग्यांची परिणती एक खासदार आणि एक आमदार अशा दाम्प्त्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होण्यातही झाली. आज शांतता जाणवत असली तरी ती वादळापूर्वीची शांतता तर नाही ना, अशी शंका सर्वसामान्यांच्या मनात भेडसावते आहे. या 35 दिवसांच्या संघर्षात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन प्रमुख प्रतिस्पर्धी दिसत असले तरी यात भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भा. रा. कॉंग्रेस यांच्यासह छोटे-मोठे पक्ष आणि संघटनाही अधूनमधून आपले अस्तित्व दाखवून देत होते. या 35 दिवसांच्या संघर्षात कोणाला काय मिळाले आणि कोणी काय गमावले, याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखात केला जाणार आहे.
भोंग्यांचा हा घटनाक्रम तपासल्यास या घटनाक्रमात अनेक वेगवेगळे पदर असल्याचे जाणवते. यात उद्धव आणि राज या दोन चुलतबंधूंमधला जगजाहीर संघर्ष हे प्रमुख कारण तर आहेच. त्याचबरोबर भाजप आणि महाआघाडी यांच्यातील संघर्ष हे देखील एक कारण आहे. कॉंग्रेसने गेल्या 74 वर्षांत अल्पसंख्याकांचे केलेले लांगूलचालन आणि हे करीत असताना हिंदूंवर केलेला अन्याय हा देखील एक पदर या प्रकरणात तपासावाच लागतो. इतरही अनेक छोटे-मोठे पदर या संघर्षात दिसून येतात.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी भारतात मुस्लिम आणि हिंदू हे मोठ्या संख्येत होते. यावेळी हिंदूंसाठी भारत हा देश बनवला गेला तर मुस्लिमांसाठी पाकिस्तानचे गठन झाले. हिंदूंनी भारतात राहावे आणि मुस्लिमांनी पाकिस्तान जवळ करावा, असे अपेक्षित होते. ज्याप्रमाणे पाकिस्तानातून हिंदू भारतात परत आले. त्याप्रमाणे तितक्या प्रमाणात मुस्लिम पाकिस्तानात परत गेले नाही. तत्कालीन राज्यकर्ते पंडित नेहरू आणि त्यांचे राजकीय गॉडफादर महात्मा गांधी यांनी या मुस्लिमांबाबत अतिरेकी प्रेम दाखवले. ती प्रथा नंतरही सुरू राहिली. देशात हिंदूंसाठी वेगळे कायदे तर मुस्लिमांसाठी वेगळे कायदे केले गेले. त्यातही मुस्लिमांना अतिरेकी झुकते माप दिले गेले आणि हिंदूंवर अन्याय केला गेला. हे करीत असताना कॉंग्रेसने मुस्लिमांची गठ्ठा मते मिळावी हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. एकूणच बहुसंख्य मुस्लिम हे अशिक्षित आणि धर्मवेडे होते. त्यामुळे मुल्ला मौलवी अशा धार्मिक नेत्यांवर ते विश्वास ठेवायचे. त्याचा फायदा घेत कॉंग्रेसने या मुल्ला मौलवी इमामांना हाताशी धरले आणि ते मागतील तशा सवलती देत. लांगूलचालन सुरू केले. त्यामुळे वर्षानुवर्षे हिंदू समाज दुखावला गेला. मात्र, हिंदूंमध्ये एकी नसल्यामुळे फारसा संघर्ष झाला नाही.
मशिदींवर वाजणारे भोंगे हे देखील एक लांगूलचालनाचे प्रकरण होते. भारतीय कायद्यानुसार सार्वजनिक स्थळावर भोंगा म्हणजे ध्वनिक्षेपक वाजवायचा झाल्यास पोलीस परवानगी घ्यावी लागते. त्यातही या भोंग्यामुळे समाजातील इतर घटकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. मात्र, इथे मुस्लिमांना सूट दिली गेली. देशात असलेल्या असंख्य मशिदींवर दिवसातून पाच वेळा नमाज पढण्यासाठी जी बांग दिली जाते ती लाऊडस्पीकरवरून देणे सुरू झाले. पहिली बांग पहाटे चार वाजता तर शेवटली बांग रात्री उशिरा दिली जाते. मात्र, भरवस्तीत असलेल्या मशिदीत अशी बांग लाऊडस्पीकरवरून देऊन सार्वजनिक शांतता भंग केली जाऊ लागली. इथे सरकारचा छुपा पाठिंबा असल्यामुळे पोलीस तक्रार करून काहीच फायदा होत नव्हता.
या मुद्यावर 2005-06 या दरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आवाज उठवला होता. इतरांनीही अनेकदा आवाज उठवले होते. मात्र, फारसा फरक पडला नव्हता. 2 एप्रिल 2022 रोजी राज ठाकरे यांनी आता भोंगा लावून अजानची बांग दिल्यास आम्ही त्याचवेळी त्या मशिदीसमोर भोंगा लावून हनुमान चालिसाचे पठण करू, अशी चेतावणी दिली. तिथून संघर्षालाभोंग्यांचा संघर्ष.. कोण जिंकले, कोण हरले?
सुरुवात झाली. नंतर 12 एप्रिल रोजी ठाणे येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी 3 मेची रमझान ईद संपताच 4 मेपासून आंदोलन सुरू करू, असे जाहीर केले. 1 मे रोजी औरंगाबाद येथे झालेल्या सभेत त्यांनी या आंदोलनाचा पुनरुच्चार केला. या सर्व घटनाक्रमात वातावरण तापायला सुरुवात झाली होती. याच दरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा केली आणि वातावरण अधिकच तापले. नंतर काय घडले हे उभ्या महाराष्ट्राला ज्ञात असल्यामुळे त्याची माहिती इथे दिली जाणार नाही.
1 मे रोजी राज ठाकरे यांनी 4 मेपासून खुला संघर्ष करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात तणावाचे वातावरण होते. राज ठाकरे आंदोलनावर ठाम होते. त्याचवेळी काही मुस्लिम संघटनांनी राज ठाकरे यांनी आंदोलन केल्यास प्रतिकार करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे महाराष्ट्रात धार्मिक विद्वेष वाढण्याची भीती निर्माण झाली होती. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात अशांतता निर्माण व्हावी यासाठीच राज ठाकरे यांच्यामार्फत हे आंदोलन घडवून आणले आणि आता तणाव निर्माण झाला की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाईल, अशी ओरड महाआघाडीच्या नेत्यांनी सुरू केली होती.
सुदैवाने 4 आणि 5 मे रोजी महाराष्ट्रात कोणतेही अनुचित प्रकार न घडता मनसेचे आंदोलन पार पडले. या सर्व प्रकारात विशेष म्हणजे अनेक मुस्लिम धार्मिक नेतेही एक पाऊल मागे सरकले. त्याचसोबत शासकीय यंत्रणांनीही सांभाळून घेण्याची भूमिका ठेवली. परिणामी संघर्ष टळला आणि महाआघाडी ओरड करीत असलेली राष्ट्रपती राजवटही पुढे सरकली आहे.
या सर्व घटनाक्रमात कोणी काय गमावले आणि कोणाला काय मिळाले याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केल्यास या आंदोलनाचा सर्वाधिक फटका सत्ताधारी शिवसेनेला बसणार आहे हे स्पष्ट दिसून येते. शिवसेना ही आधी मराठी माणसांसाठी संघर्ष करणारी संघटना होती. नंतर 1987 पासून शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली. तेव्हापासून काल-परवापर्यंत शिवसेना ही हिंदुत्ववादी संघटना म्हणून ओळखली जात होती. ज्यावेळी शिवसेनेने भाजपशी युती तोडून कांँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी हातमिळवणी केली तेव्हापासून शिवसेनेेचे कडवे हिंदुत्व वादग्रस्त ठरले होते. शिवसेना ही 15 वर्षांपूर्वीची असती तर सरळ भोंग्यांबाबत नियम करून मोकळी झाली असती. त्याची कडक अंमलबजावणीही करण्याचे आदेश दिले असते. मात्र, आज तशी परिस्थिती नाही. शिवसेनेचे मुख्यमंत्रिपद कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या टेकूने टिकले आहे. या दोन्ही पक्षांचे मुस्लिमांचे लांगूलचालन करण्याचेच धोरण राहिलेले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचे तोंड बंद करण्यासाठी कुणतेही कडक पाऊल उचलणे उद्धव ठाकरेंना शक्य नव्हते. उद्धव ठाकरे यांची हीच मजबुरी राज ठाकरे यांनी ओळखली होती. आणि त्यांनी भोंग्यांची खेळी खेळली होती. इथे उद्धव ठाकरेंना बोटचेपी भूमिका सुरुवातीपासून अखेरपर्यंत घ्यावी लागली. 2019 मध्ये जेव्हा शिवसेनेने महाआघाडी केली तेव्हाच त्यांचा हिंदुत्ववादी मतदार दुखावला होता. यावेळी त्यांचा हिंदुत्ववादी मतदार त्यांच्यापासून तुटून वेगळा होईल ही चिन्ह स्पष्ट दिसत आहे.
हे प्रकरण इतक्यावरच थांबत नाही. आता महापालिका निवडणूका तोंडावर आल्या आहेत. अशावेळी मुंबई, ठाणे, नाशिक या परिसरात मनसे निवडणूक रिंगणात उतरणार हे निश्चित आहे. यावेळी शिवसेनेचा दुखावलेला हिंदुत्ववादी मतदार मनसेकडे वळल्यास फारसे नवल वाटणार नाही. अर्थात या मतदारांच्या जोरावर मनसेला भरपूर जागा मिळतील असे नाही. मात्र, शिवसेनेच्या बर्याच जागा कमी होऊ शकतील. जी मुंबई महापालिका शिवसेनेची जीवनदात्री समजली जाते. तिथेच मनसेमुळे शिवसेनेला जबर फटका बसला हे स्पष्ट दिसते आहे. याचे पर्यावसान शिवसेनेची महापालिकेतील सत्ता जाण्यात देखील होऊ शकते.
वर नमूद केल्याप्रमाणे मनसेच्या जास्त जागा निवडून आल्या नाही तरी शिवसेनेला धोका पोहोचणार हे नक्की आहे. शिवसेनेच्या कमी झालेल्या जागा या भाजपच्या पदरात पडतील आणि भाजपला सत्ता सोपान सुकर होईल हे स्पष्ट दिसते आहे. अर्थात भाजप सत्तेत आल्यावर मनसेला त्याचे अप्रत्यक्ष फायदे दिले जातील हे उघड गुपित आहे.
अविनाश पाठक