ब्रेन वॉश..?

अगं सरिता, मला माहीत आहे की तुझं बोलणं परखड, सडेतोड तितकंच नितळ पाण्यासारखे स्वच्छ आहे. जसं तुझं अंतरंग तसं तुझं कामही.. त्यामुळे बर्‍याचदा महत्त्वाची कामं नि जबाबदार्‍याही तुझ्याकडे आपोआप येतात. प्रामाणिकपणे त्या तू पारही पाडतेस.. अनेकदा काहींकडून तुझं कौतुकही होतं. पण सारीच माणसं तुझ्या कौतुकाने सुखावतात असं नाही गं..! सरिताची मैत्रीण मेघा तिला काळजीच्या सुरात म्हणाली. सरिता हसत म्हणाली, अगं जीवनाच्या पुस्तकात माणसं वाचायलाही शिकलीय मी, मलाही कळतात सारी माणसं. पण आपण आपलं कर्म करत राहायचं.. त्यावेळी मेघाने तिला जवळची मैत्रीण म्हणून सल्ला दिलाच. प्रत्येक व्यक्तीला माणूस कळतो पण कधी अहंकार, असूया, स्वत:ची हतबलता, श्रेष्ठ – कनिष्ठ भावना, यां सगळ्यांमुळे आपण कितीही प्रामाणिक, सरळ असलो तरी एखाद्या व्यक्तीच्या मनात पूर्वग्रह तयार करण्यासाठी वारंवार त्याचा ‘ब्रेन वॉश’ केला जातो हे कधी विसरू नकोस.. असा सल्ला देत ती तिच्या घरी निघून गेली..ब्रेन वॉश हा शब्द मनात घोळवून ती विचार करू लागली की, खरंच एखाद्याचा ब्रेन वॉश करता येतो का..? ज्याने एखाद्या व्यक्तीची चांगली प्रतिमा धुवून टाकता येते..! लहानपणी मातीत खेळून हात खराब व्हायचे तेव्हा आई म्हणायची, मळलेले हात साबणाने धुवून स्वच्छ कर. ज्याला आता आपण हॅण्डवॉश म्हणतो… कपड्यावरील डाग डिटर्जंट पावडर नाही तर साबणाने सहज काढून टाकले जातात… तसं ब्रेन वॉश.. ज्याने एखाद्याच्या गुणांची चांगली प्रतिमा तयार करण्याऐवजी तिची चांगली प्रतिमा पुसण्यासाठी एखाद्याच्या मनात वारंवार त्या व्यक्तीविषयी चुकीची माहिती देऊन किंवा तिच्याविषयी नकारात्मक विचार पेरून हळूहळू तिची चांगली प्रतिमा पुसली जाते.. ती ही कपड्यावरचे डाग हळूहळू काढावेत अगदी तसेच.. ती स्वत:शीच उद्गारली, किती भयानक आहे हे…! एखादी व्यक्ती उत्कर्ष करत असताना त्या आधी तिने त्यासाठी संघर्ष केलेला असतो. हे मात्र लक्षात घेतले जात नाही.. उलट प्रगती बरोबर जर ती चांगले काम करत असेल तर असूयेने काहींबद्दल ब्रेन वॉश करून तिला अडचणीत टाकले जाते..
यामुळे कधी कधी त्या व्यक्तीकडून चांगले काम करण्याची ऊर्जा कमी होते. त्याचा विपरीत परिणाम तिच्याबरोबर तिच्या चांगल्या उत्पादक कार्यावर होऊ शकतो. म्हणूनच माणूस म्हणून माणसाने माणसाशी वागले, भलेही कुणाचे चांगले करता आले नाही तरी कुणाचे वाईट करण्याची भावना तयार झाली नाही तर नक्कीच कुणाचा ब्रेन वॉश होणार नाही.. ब्रेन वॉशमुळे खरंच काहींना कोणताही अपराध नसताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ब्रेन वॉशऐवजी सारे भेद विसरून मग ते कोणतेही असोत माणसाच्या मनात चांगले विचार पेरले तर समाजात नक्कीच एका सुदृढ समाजाची निर्मिती होईल..!
-प्रा. गंगा गवळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *