भुसावळ-नाशिक-पुणे रेल्वे सेवा १० जुलैपासून सुरू होणार 

दोन वर्षानंतर अखेर मुहूर्त

नाशिकरोड :  प्रतिनिधी

करोनासंकटामुळे २२ मार्च २०२० पासून बंद करण्यात आलेली भुसावळ-नाशिक-पुणे रेल्वे सेवा १० जुलैपासून दोन वर्षाच्या खंडानंतर सुरु होत आहे. हक्काची नाशिक-पुणे गाडी सुरु होत असल्याने  हा सर्व ताणतणाव वाचून प्रवाशांची पैसा व वेळेची बचत होणार आहे.  ही गाडी सुरू होत असल्याने नाशिक, जळगाव आणि पुणे जिल्ह्यातील प्रवाशांना लाभ होणार आहे. तसेच रेल्वेस्थानकातील कुली, रिक्षा व छोटे मोठे व्यावसायिक यांनाही रोजीरोटी मिळणार आहे.रेल्वे मंत्रालयाने करोनाच्या संकटामुळे रेल्वेने खबरदारी म्हणून अनेक रेल्वेगाड्या बंद केल्या आहेत. करोनाचे संकट निवळू लागल्याने हळू हळू रेल्वेगाड्या स्पेशल ट्रेन नावाने सुरु केल्या. मात्र, त्या सर्वांना रिझर्व्हेशन सक्तीचे आहे. तिकीटही जास्त असून रिझर्व्हेशनसाठी वेळही जास्त लागत आहे.  प्रवाशांच्या मागणीनंतर पंचवटीसारख्या इंटरसिटी ट्रेनला रिझर्व्हेशन एवजी जनरल करण्यात  आले आहे. आणखी काही गाड्या जनरल करण्यास सुरुवात झाली आहे. इगतपुरी-भुसावळ ही पॅसेंजर गाडी मेमू ट्रेनच्या स्वरुपात काही दिवसांपूर्वी सुरु करण्यात आली आहे.  पुण्याला जाताना ही गाडी पहाटे नाशिकला येते. तेथून सुमारे सहा तासांनी पुण्याला पोहोचते. ही गाडी सध्या बंद असल्यामुळे नाशिककरांना बस आणि खासगी वाहनाने पुणे गाठावे लागत आहे. नाशिक-पुणे रेल्वेगाडी स्वस्त आहे. तिच्यापेक्षा रस्तामार्गे किमान तिप्पट भाडे लागते. स्पेशल चारचाकी गाडी केली तर हा खर्च अनेक पटींनी वाढतो. टोलनाकेही लागतात. याशिवाय खासगी वाहनाने जाताना मंचर, चाकणपासून पुणे येईपर्यंत वाहतुक कोंडीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे इंधनही जास्त खर्ची पडते. पुण्याहून रस्ता मार्गे नाशिकला येताना एक-दोन तास वाहतूक कोंडीतच जातात. मानसिक व शारिरीक ताणतणावाला सामोरे जावे लागते. धूळवड साजरी करावी लागते. चिडचिड होते. अपघाताचाही धोका रस्तामार्गे असतोच. काही जण पंचवटी, राज्यराणीसारख्या गाडीने कल्याणला उतरून तेथून पुण्याला जाणारी रेल्वेगाडी पकडतात. परंतु, त्यात जास्त वेळ लागतो. अनेकदा जागा मिळत नाही. आता  गाडीत झोप मिळाल्याने प्रवासही आरामदायी होणार आहे. नाशिकचे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पुण्यात राहतात. अनेक युवक पुण्यात नोकरी करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *