अग्रलेख

बिहारी घराणेशाही

राजकारणातील घराणेशाहीच्या नावाने शंख करणार्‍या भाजपाला मित्रपक्षांतील घराणेशाही चालते. सत्तेसाठी वेगवेगळ्या राज्यांत आणि देशांतही भाजपाला घराणेशाही नुसती चालत नाही, तर सहन करावी लागत आहे. बिहारमध्ये प्रादेशिक पक्षांत घराणेशाही आहेच. जनता दल युनायटेडचे नेते, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्या संभाव्य राजकीय प्रवेशाने बिहारमधील घराणेशाही चर्चेत आली आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्याकडे पक्षाची सूत्रे आहेत. दुसरे पुत्र तेजप्रताप यादव यांनी बंडखोरी करून जनशक्ती जनता दल हा पक्ष स्थापन केलेला आहे. लोक जनशक्ती पक्षाचे दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग हे पक्षाच्या एका गटाचे अध्यक्ष असून, ते केंद्रात अन्नप्रक्रिया खात्याचे मंत्री आहेत. त्यांचे काका व रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू पशुपति पासवान दुसर्‍या गटाचे अध्यक्ष आहेत. त्यांनीही केंद्रात भाजपाच्या आश्रयाने मंत्रिपद भूषविलेले आहे. रामविलास पासवान यांचे दुसरे बंधू रामचंद्र यांचे पुत्र प्रिन्स राज हे समस्तीपूरचे 2019 च्या निवडणुकीत खासदार झाले होते. लोेक जनशक्तीचे दोन्ही गट भाजपाचे मित्रपक्ष आहेत. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जनता दल युनियटेडला केवळ दोन जागा मिळाल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून नितीश कुमार यांनी राजीनामा देऊन जीतनराम मांझी यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली होती. मांझी यांनी नंतर मुख्यमंत्रिपद सोडण्यास नकार दिला होता. त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आणि नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण मांझी यांनी हिंदुस्तान अवामी मोर्चा या पक्षाची स्थापना केली. त्यांचा पक्ष भाजपाचा मित्र आहे. मांझी यांनीही घराणेशाही जोपासली आहे. त्यांचे पुत्र संतोष सुमन विधान परिषद सदस्य असून, बिहार सरकारमध्ये जलसंधारणमंत्री आहेत. संतोष सुमन यांच्या पत्नी दीपा या इमामगंज विधानसभा मतदारसंघात आमदार आहेत. दीपा यांच्या मातोश्री म्हणजेच सुमन यांच्या सासूबाई ज्योतीदेवी मांझी (समधन) या बाराचट्टी विधानसभा मतदारसंघात आमदार आहेत. जीतनराम मांझी यांची कन्या सुनैनादेवी 2007 ते 2017 या काळात गया महानगरपालिकेत नगरसेविका होत्या. जीतनराम मांझी यांचे जावई देवेंद्रकुमार मांझी हे बिहार राज्य अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आहेत. बिहारमध्ये भाजपाचा मित्र असलेल्या राष्ट्रीय लोकमोर्चा पक्षातील घराणेशाही ठळकपणे दिसून येत आहे. राष्ट्रीय लोकमोर्चा पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह राज्यसभेवर भाजपाच्या कोट्यातून आहेत. सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कटिहारमध्ये पराभव झाल्याने त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले होते. त्यांची मुदत पुढील महिन्यात संपणार आहे. कुशवाह समाजाची मते डोळ्यासमोर ठेवून भाजपाने त्यांना पुन्हा उमेदवारी देेण्याचे ठरविले. त्यांच्या पत्नी स्नेहलता सासाराम विधानसभा मतदारसंघात आमदार आहेत. त्यांचे पुत्र दीपक प्रकाश बिहारमध्ये पंचायतराज खात्याचे मंत्री आहेत. भाजपाचे मित्र असलेल्या पक्षांचे नेते पासवान, मांंझी, कुशवाह यांनी घराणेशाही निर्माण केली आहे. त्यात जनता दल युनायटेडचे नेते व मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या घराणेशाहीचा उदय होत आहे. नितीश कुमार यांचा वारसा चालविण्यासाठी निशांत कुमार यांना राजकारणात आणण्याचा आग्रह पक्षाच्या नेत्यांनी धरला आहे. निशांत कुमार हे आतापर्यंत राजकारणापासून दूर राहिलेले आहेत. त्यांनी झारखंडमधील नामांकित बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी एका खागी कंपनीत काम केले. गेल्या काही वर्षांत ते प्रामुख्याने आपल्या वडिलांच्या (नितीश कुमार) निवासस्थानी राहून त्यांच्या आरोग्याची आणि वैयक्तिक कामांची काळजी घेत आहेत. आपल्याला राजकारणात रस नाही, असे ते नेहमीच सांगत आले आहेत. त्यांचा कल अध्यात्म आणि सामाजिक कार्याकडे आहे. नोव्हेंबर 2025 च्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे घोषित करून राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. तेव्हा निशांत कुमार यांची राजकीय वारस म्हणून चर्चा झाली होती. परंतु नितीश कुमार यांनी राजकीय निवृत्ती घेतली नव्हती. नितीश कुमार आता पंचाहत्तरीच्या घरात असल्याने त्यांच्या समर्थकांनी निशांत कुमार यांना पुढे आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. निशांत कुमार यांना राज्यसभेवर पाठविण्याचा विचार पक्षाचा एक गट करत आहे. दुसरीकडे, नितीश कुमार राज्यसभेत जाणार असतील, तर राज्याचे नेतृत्व निशांत कुमार यांनी करावे, असे दुसर्‍या एका गटाचे मत आहे. काहीही झाले तरी निशांत कुमार यांना राजकारणात आणून नितीश कुमार यांचा राजकीय वारसदार करण्याचा खटाटोप सुरू आहे. बिहारमधील यादव, पासवान, मांझी, कुशवाह यांची घराणेशाही आहेच. नितीश कुमार यांचे घराणे त्याच मार्गावर आहे. भाजपाला ही घराणेशाही इच्छा नसूनही सहन करावी लागत आहे.

Bihari dynasty

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

3 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

4 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

4 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

4 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

4 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

4 hours ago