संपादकीय

आखाती युद्धात भारत पेचात

महासत्ता अमेरिकेला सनकी डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष लाभल्यापासून अमेरिका जगासाठी चिंता वाढविणारा देश म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. तसेही अमेरिकेची दादागिरी, दंडेलशाही जगाला नवीन नाही. इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात वर्षानुवर्षे संघर्ष चालत आहे. गेल्या वर्षीदेखील दोन्ही देशांत संघर्षाची ठिणगी पडली. त्यावेळी गाझा पट्टीत मोठा नरसंहार झाला होता.
इस्रायल हा आखाती देशांत चहूबाजूंनी मुस्लिम राष्ट्रांनी वेढलेला देश. त्याला सर्वतोपरी अमेरिका, पश्चिम राष्ट्रांचे पाठबळ. अमेरिकेबरोबरच इस्रायलदेखील अण्वस्त्रधारी देश. मात्र, इराण अणुबॉम्ब बनवतो आहे, या संशयावरून गेल्या आठवड्यात इस्रायलने इराणवर हल्ला केला. लागलीच अमेरिका युद्धात उतरली. वास्तविक हल्ला करण्याच्या दोन दिवस अगोदर मध्यस्थ ओमनने इराण सर्व अटी-शर्ती मान्य करण्यास तयार आहे आणि काही तासांतच तोडगा निघणार, असे जाहीर केले असतानाही इस्रायलने युद्धाला तोंड फोडले. योगायोग म्हणजे, इस्रायलच्या पंतप्रधानांनी सुरक्षेच्या कारणास्तव भारताचा दौरा रद्द केला, पण हल्ल्याच्या दोन दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौर्‍यावर होते. तेथील संसदेला त्यांनी संबोधित केले. त्या देशाचा सन्मान स्वीकारला. मात्र, इस्रायल किंवा अमेरिका असे काही करेल, अशी कल्पना कोणालाच आली नाही. इराणची अण्वस्त्रे हे केवळ निमित्त. खरे कारण काही वेगळेच असावे. हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी इराणमधील सर्वोच्च नेत्यांसह अनेकांना ठार मारले गेले.
अमेरिका, इस्रायलच्या मानाने इराण फारच कमी शक्तीचा मानला जातो. मात्र, त्याने ज्या पद्धतीने प्रतिहल्ले सुरू केले आहेत ते पाहता इस्रायल व अमेरिकेचा नेम चुकला का, असा प्रश्न पडतो. आज ना उद्या इराणचा पराभव निश्चित आहे. मात्र, तो चिवट झुंज देत आहे. इराणमधील जुलमी राजवट उलथवून टाकायची आहे, असे अमेरिका म्हणते. जगातील एखाद्या सार्वभौम राष्ट्रात हस्तक्षेप करण्याचा अधिकार अमेरिकेला कोणी दिला? काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने दंडेलशाही करत व्हेनेझुऐलाचे राष्ट्राध्यक्ष व त्यांच्या पत्नीचे त्यांच्या देशात घुसखोरी करून अपहरण केले होते. इराणसह आखाती देशांत अमेरिकेला तेल का खेल करायचा आहे. त्यासाठी अशी दंडेलशाही चालली आहे. आखातातील पश्चिम अशियातील सौदी अरेबिया, कुवेत, ओमान, दुबई अशा अनेक देशांत या देशांना व्यापार व लष्करी संरक्षण देण्याच्या नावाखाली अमेरिकेने आपले लष्करी तळ उभारले आहेत. इराणने या देशांवर हल्ले सुरू केले आहेत. यात मोठी जीवितहानी व वित्तहानी झाली आहे. जगाला तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले गेले आहे आणि वेठीस धरले गेले आहे. गेल्या 47 वर्षांपासून इराण धमकी देत असल्याचा दावा इस्रायल करत आहे. 1990-91 या काळातदेखील अमेरिकेने अण्वस्त्रांचे कारण देत इराकवर हल्ला करत सद्दाम हुसेन यांची राजवट उलथवून लावली होती. अखेर त्यांना फाशी दिली गेली. तालिबानला बळ देत अमेरिकेने अफगाणिस्तानातदेखील खेळ केला. कालांतराने तो अंगाशी आल्याने अफगाणिस्तानातून माघारीची नामुष्की अमेरिकेवर ओढावली. काही महिन्यांनी अमेरिका व इस्रायल दोन्ही देशांत निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यात डोनाल्ड ट्रम्प व बेंजामिन नेत्यानाहू यांचा पराभव निश्चित आहे. एपस्टीन फाइल दोघांसाठी अडचणीची आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर इराणवर हल्ला केला गेला असावा का, याची चर्चा सुरू झाली आहे.
आखातातील युद्धाने जगाची चिंता वाढवली आहे. त्याची झळ भारतालादेखील बसणार आहे. इराण हा आपला जुना मित्र. गेल्या काही वर्षांपासून इस्रायलबरोबरदेखील भारताची जवळीक वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून रशियासारखा आपला पारंपरिक सच्चा मित्र भारतापासून दुरावत चालला आहे आणि अमेरिकेशी जवळीक वाढली आहे. ऑपरेशन सिंदूर, अमेरिकेबरोबर होऊ घातलेला व्यापारी करार यावरून सरकारवर टीका होत आहे. असे असताना या युद्धाच्या निमित्तानेदेखील भारत, इस्रायल, अमेरिका हे तीन मित्र एका बाजूला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, इराणच्या सर्वोच्च नेत्यांची हत्या होऊनदेखील भारताने साधे दुःख व्यक्त केले नाही की दुखवटा. त्याचवेळी इराणने हल्ला केलेल्या इतर देशांबाबत भारताने संवेदना व्यक्त केली. इस्रायलबरोबर जवळिकीमुळेच कदाचित इस्राायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी संकटसमयी भारत आपल्या पाठीशी उभा राहिला म्हणून आभार मानले. वास्तविक दोन्ही देश आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. दोघांपासून आपण सारखे अंतर किंवा जवळीक ठेवायला हवी. मात्र, जणू काही आपण इराणपासून दूर होत आहे, असेच चित्र निर्माण झाले आहे.
वास्तविक आता गरज आहे कुठल्याही परिस्थितीत हे युद्ध थांबविण्याची आणि त्यासाठी इतर देशांनी भूमिका घेण्याची. जगातील सर्वार्ंत मोठी लोकशाही म्हणून आपली ओळख, जगातील चौथी अर्थव्यवस्था, असा आपला लौकिक आहे. 142 कोटींची आपली लोकसंख्या. अशावेळी भारताकडे अपेक्षने पाहिले जाते. मात्र, आपण तर इस्रायल अमेरिकेच्या बाजूने उभे आहेत का, असे चित्र निर्माण झाले आहे. इतिहासात गुट निरपेक्ष गटाचे नेतृत्व करणारा भारत आज या कठीण प्रसंगी कुठे आहे आणि कोणती भूमिका पार पाडत आहे, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. युद्ध लांबल्यास त्याचा विपरीत परिणाम भारतावर आणि जगाच्या अर्थकारण, व्यवसाय, व्यापारावर होणे अटळ आहे. स्वतःला जगाचा पोलीस समजणारा अमेरिका दंडेलशाही करत आहे. याला रोखणार तरी कोण, असा प्रश्न जगाला पडला आहे. अगोदरच आर्थिक मंदी, बेरोजगारी, महागाईने जग आणि भारत त्रस्त झालेला असताना या युद्धाने संकट अधिकच गंभीर होणार, हे निश्चित. हळूहळू त्याची सुरुवात झाली आहे. जागतिक व्यापारावर विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. भारतातून होणारी निर्यातदेखील काहीशी थांबली आहे. केळी, द्राक्षे यांची निर्यात थांबली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. पेट्रोल मिळणार नाही म्हणून अनेक ठिकाणी अफवा पसरल्या आणि वाहनधारकांची पेट्रोलपंपांवर गर्दी झाली. त्यातच या युद्धाबाबत आपण कोणी भूमिका घ्यावी याबाबत काहीच ठरत नाही की निश्चित परराष्ट्रनीती आखली जात नाही.

India in trouble in the Gulf War

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

1 hour ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago