भाजपचे स्वीकृतसाठी धक्कातंत्र; शिंदेसेनेचे नाशिकरोडला झुकते माप

नाराजी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांत एक-एक वर्षाचे रोटेशन

भाजपकडून संदीप लेनकर, अजित चव्हाण, हेमंत धात्रक, रोहिणी नायडू, रामहरी संभेराव, चंद्रशेखर पंचाक्षरी, तर शिंदेसेनेकडून राजू लवटे, बाबूराव आढाव यांना संधी

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या नियुक्तीवर बुधवारी (दि. 4 नोव्हेंबर) अखेर पडदा पडला. भाजपसह शिंदेसेनेने त्यांच्या उमेदवारांचे अर्ज मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे सादर केले. दरम्यान, भाजपने धक्कातंत्र वापरत अनपेक्षित नावे देत सर्वांनाच धक्का दिला.
शिवसेना शिंदेसेनेने दोन्हीही जागांवर नाशिकरोड विभागातीलच राजू लवटे व माजी नगरसेवक बाबूराव आढाव यांना संधी दिली. भाजपने संदीप लेनकर, अजित चव्हाण, हेमंत धात्रक, रोहिणी नायडू, रामहरी संभेराव, चंद्रशेखर पंचाक्षरी यांना संधी देत महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या उपस्थितीत अर्ज सादर केले.
उद्धव सेनेचे गटनेते केशव पोरजे यांनी मंगळवारीच (दि.3) त्यांच्या दोघा उमेदवारांचे अर्ज भरले होते. त्यानंतर बुधवारी (दि. 4) प्रथम शिंदेसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांच्या उपस्थितीत राजू लवटे, बाबूराव आढाव यांचे अर्ज भरले. यावेळी त्यांच्यासमवेत पक्षाचे नेते विजय करंजकर उपस्थित होते. दुपारी तीन वाजता भाजपने महापौर हिमगौरी आहेर-आडके, गटनेते अ‍ॅड. श्याम बडोदे यांच्या उपस्थितीत सहा उमेदवारांचे अर्ज भरले. शिंदेसेनेने दुपारी एकच्या सुमारस त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर केली. भाजपची गटनेत्यांच्या कार्यालयात बंद दाराआड चर्चा झाली. उच्च न्यायालयाने सहा आठवड्यांत स्वीकृत सदस्यांची निवडणूक घेण्याचे निर्देश दिल्यानंतर महिनाभरापासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली होती. 21 ऑक्टोबर रोजी स्वीकृतची नावे भाजप-शिंदेसेना व उद्धवसेनेचे गटनेत्यांकडून सादर केली जाणार होती. पण सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यामुळे ही प्रक्रिया लांबवण्यात आली होती. येणार्‍या महासभेत दहा सदस्यांच्या नावांची घोषणा महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्याकडून केली जाईल.

भाजपकडून नाशिकरोडकडे पाठ, शांताराम घंटे यांना डावलले
एकीकडे शिंदेसेनेने नाशिकरोड विभागाचे महत्त्व लक्षात घेता, नाशिकरोड आणि जेलरोड या परिसरातून दोघांना संधी देत आगामी काळात पक्षसंघटन अधिक वाढविण्यासाठी पाऊल टाकल्याचे दिसते. याउलट भाजपने मात्र नाशिकरोडकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. भाजपकडून नाशिकरोड मंडल अध्यक्ष शांताराम घंटे यांना हमखास संधी दिली जाईल, असे आश्वासन दिले गेले होते. ते प्रामाणिकपणे भाजपमध्ये वर्षानुवर्षे पक्षसंघटनासाठी काम करीत आहेत. विधानसभेत काही नगरसेवकांनी आ. राहुल ढिकले यांच्या विरोधात आतून काम केले; परंतु घंटे यांनी विधानसभेसाठी प्रामाणिकपणे पक्षासाठी काम केले. त्यामुळे त्यांनाच संधी मिळेल, असे बोलले जात होते. मात्र, ऐनवेळी घंटे यांना बाजूला केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे, शिंदेसेनेने स्वीकृतच्या दोन्ही जागांवर नाशिकरोडचे उमेदवार दिले असता, भाजपच्या या कृतीमागे दडलंय काय? असाही सवाल केला जात आहे. याशिवाय आपले चुकले काय, अशी भावना शांताराम घंटे यांच्या मनाची झाली असेल.

सुफी जीन यांचे प्रयत्न अयशस्वी
स्वीकृतच्या जागेसाठी उद्धवसेनेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे नगरसेवक सुफी जीन यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची मंगळवारी भेट घेतल्याची चर्चा होती. याद्वारे पदरात काही मिळते का, यासाठी त्यांनी प्रयत्न केले; परंतु या भेटीचा कुठलाही उपयोग जीन यांना न झाल्याने त्याची महापालिका वर्तुळात चर्चा होती.

पक्षवाढीकरिता योगदान देणार्‍यांना संधी देण्यात आली आहे. ज्या सहा उमेदवारांनी अर्ज भरले ते सर्वही पक्षवाढीकरिता सक्रिय असणारे आहेत. त्यामुळेच त्यांना ही संधी दिली आहे. पक्षात इच्छुकांची संख्या खूपच असल्याने सर्वांना संधी मिळावी याकरिता एक वर्षाच्या रोटेशनप्रमाणे संधी दिली जाईल.
– हिमगौरी आहेर-आडके, महापौर

पक्षाच्या निर्णयानुसार राजू लवटे व बाबूराव आढाव यांचे अर्ज भरण्यात आले. वर्षभरासाठी कार्यकाळ असून, याद्वारे जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांना स्वीकृतची संधी दिली जाणार आहे. – अजय बोरस्ते, गटनेते, शिंदेसेना

BJP employs ‘shock tactics’ regarding nominated member posts; Shinde-led Shiv Sena gets the upper hand in Nashik Road

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *