उत्तर महाराष्ट्र

भाजपा-मनसेत ‘उत्तर भारतीय’ फॅक्टरचा अडसर

भाजपा-मनसेत ‘उत्तर भारतीय’ फॅक्टरचा अडसर

मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी म्हणजेच ओबीसींना मिळालेले राजकीय आरक्षण महाराष्ट्रातही लागू होईल, हा आशावाद बळावला आहे. मध्य प्रदेशच्या निकालाचा अभ्यास करुन ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी एखादी तातडीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्याची तत्परता महाराष्ट्र सरकारने दाखविलेली नाही. तरीही आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ओबीसी आरक्षणाचा पेच सुटत नसल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हालचालींना म्हणावा तसा वेग आलेला नाही. नाशिक महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मोर्चेबांधणी वैयक्तिक पातळीवर सुरू असून, राजकीय पक्षांच्या बाबतीत आघाडी, युती करण्याचा प्रश्न अनुत्तरीत आहे. भाजपा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होण्याची शक्यता जितकी बळावत चालली होती तितकीच ‘उत्तर भारतीय’ फॅक्टरने कमकुवत होत चालली आहे.
भाजपाची रणनीती
महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवायच्या की नाही, याचा निर्णय राज्य पातळीवर होईल. परंतु, स्थानिक नेत्यांना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातील. भाजपा आणि मनसेचेही तसेच आहे. भाजपाचा मुंबईतील उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा असून, त्या दृष्टीने हालचाली गतिमान झाल्या आहेत. नाशिकमध्येही उत्तर भारतीय असून, त्यांना वश करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भाजपा हा देशातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष असून, उत्तर भारतात त्याची मोठी ताकद आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या विविध भागात विखुरलेल्या उत्तर भारतीयांवर भाजपाने विशेष नजर ठेवली आहे. परंतु, हाच उत्तर भारतीय घटक संभाव्य भाजपा-मनसे युती होण्यात अडथळा ठरण्याची चिन्हे आहेत. हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यानंतर भाजपा आणि मनसे युती होऊ शकते, यावर बरीच चर्चा होऊनही अद्याप त्या दिशेने पावले काही पडताना दिसत नाहीत. त्यामागे ‘उत्तर भारतीय’ फॅक्टर आहे.
जखमांवरील खपल्या
अयोध्येला भेट देण्याच्या राज ठाकरे यांच्या घोषणेवर राज्यात बरीच चर्चा झाली. तशी चर्चा आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बाबतीतही झाली. (राज ठाकरेंनी अयोध्या भेट तूर्त स्थगित केली आहे.) मनसेची स्थापना झाल्यानंतर राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरुध्द आंदोलन छेडले होते. उत्तर भारतीयांना मुंबई, ठाणे, कल्याण आणि इतरत्र मारहाण झाली होती. ही जुनी गोष्ट उत्तर प्रदेशातील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण यांनी उपस्थित करुन राज ठाकरेंना उत्तर प्रदेशात पाय ठेवू देणार नसल्याची घोषणा करुन उत्तर भारतीयांच्या जखमांवरील खपल्या काढल्या. त्याचमुळे मनसेची भाजपाशी युती होणार की नाही? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मनसेशी युती केली, तर उत्तर भारतीय नाराज होतील, ही भीती भाजपाला वाटत आहे. युती करुनही भाजपाला समर्थन देणार्‍या उत्तर भारतीयांची मते मनसेला मिळणार नाहीत. युती झाली, तर फायदा भाजपाला होईल आणि मनसेला तोटाच सहन करावा लागेल.
मराठी मुद्दा कायम
मनसेशी युती होईल की नाही, याचा विचार न करता भाजपाने उत्तर भारतीयांवर लक्ष केंद्रित केले आहे. याचे कारण म्हणजे भाजपाला मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातून हिसकावून घ्यायची आहे. मनसेशी युती करण्यास भाजपा उत्सुक असला, तरी युती केल्याचा धोकाही तितकाच आहे. मनसेने भलेही हिंदुत्व स्वीकारले, तरी मराठी माणसाचा मुद्दा सोडून दिलेला नाही. हिंदुत्व स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविषयी भूमिका स्पष्ट केलेली नाही. उत्तर भारतीयांची माफी राज ठाकरे यांनी मागावी, अशी मागणी ब्रिजभूषण शरण यांनी केली आहे. अर्थात, राज ठाकरे यांचा स्वभाव आणि स्वाभिमान पाहता ते माफी मागणार नाहीत. त्याचमुळे भाजपा-मनसे युतीची शक्यता दुरावत चालली आहे.

जनसंपर्कावर भर

नाशिक शहरातील सातपूर, अंबड सिडको आणि पंचवटी परिसरात उत्तर भारतीयांची संख्या बर्‍यापैकी आहे. नाशिकरोड आणि जुन्या नाशकातही उत्तर भारतीय विखुरलेले आहेत. त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न भाजपाकडून मुंबईच्या धर्तीवर केला जात आहे. भाजपाच्या आघाडीवर वरवर सामसूम दिसत आहे. तथापि, पडद्याआड याच पक्षाची मोठी तयारी सुरू आहे. दुसर्‍या बाजूला राज ठाकरेंच्या गाजत असलेल्या भाषणांवर मनसे स्वार होऊ पाहत आहे. मात्र, भोंग्यांचा म्हणावा तितका प्रभाव दिसत नाही. केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची महागाईच्या प्रश्नावर आंदोलने केली जात असताना कमकुवत काँग्रेस चाचपडत आहे. उध्दव ठाकरे यांच्या मुंबईतील सभेने शिवसेनेत उत्साह असूनही त्याचे प्रतिबिंब फारसे उमटलेले नसले, तरी शिवसेनेची तयारी आधीपासूनच जोरदार आहे. वंचित बहुजन आघाडीसह इतर लहान पक्षांचा आपल्या कुवतीनुसार तयारीवर भर आहे. सर्व पक्षांतील इच्छुकांसह अपक्षांनी जनसंपर्क पुन्हा एकदा पाठविण्याचा प्रयत्न चालविला आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

केवळ आश्वासन, प्रत्यक्ष पोलिस भरती कधी?

निफाड तालुक्यातील हजारो युवक-युवती प्रतीक्षेत... निफाड ः विशेष प्रतिनिधी राज्य सरकारमधील मुख्यमंत्री अन् मंत्री वारंवार…

60 minutes ago

म्हसरूळ येथून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसासह तरुणाला अटक

सिडको : विशेष प्रतिनिधी गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या गुंडाविरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत म्हसरूळ-आडगाव…

1 hour ago

स्वामी समर्थनगरात अल्टो कारवर हल्ला

अज्ञात टवाळखोरांकडून तोडफोड; परिसरात भीतीचे वातावरण सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंट…

2 hours ago

10 गुन्हे उघडकीस, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

गंगापूर पोलिसांची कारवाई सिडको : विशेष प्रतिनिधी गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी…

2 hours ago

जिल्हाभरात 44 हजार 216 साड्यांचे वाटप

अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मिळणार लाभ नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साडी…

2 hours ago

नाशिकमध्ये पुन्हा खून; या भागात घडली घटना

सिडको : दिलीपराज सोनार सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजवाडा येथे पती पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातुन…

6 hours ago