पंतप्रधान मोदींची नव्या पदाधिकार्यांसोबत बैठक
नवी दिल्ली : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाने युवा पिढी (जनरेशन झेड) अर्थात ‘जेन-झी’शी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्यांना पक्षाच्या विचारधारेशी जोडण्यासाठी एक विशेष ‘सुपर 5’ संपर्क पथक तयार केले आहे. आजच्या तरुण पिढीच्या आकांक्षा, शिक्षण, रोजगार आणि अपेक्षा समजून घेण्यासाठी ही राजकीय रणनीती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
‘मीसुद्धा कधी काळी तुमच्यासारखे काम केले आहे. तुमच्या जागी राहिलो आहे’, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात भाजपाच्या सर्व 65 नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकार्यांशी संवाद साधला. दिल्लीत झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी या नव्या टीमला गावखेड्यांमध्ये पक्ष संघटना आणखी मजबूत करण्याचे, नवीन कल्पना राबवण्याचे आणि जनतेशी संपर्क वाढवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. भाजपाच्या मुख्यालयात ही बैठक सुमारे सव्वाचार तास चालली. 17 ऑगस्ट रोजी भाजपाचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी 65 सदस्यीय संघटनात्मक राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केल्यानंतर नव्या पदाधिकार्यांसोबत मोदींची ही पहिलीच भेट होती.
या विशेष संपर्क पथकामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय सरचिटणीस स्मृती इराणी आणि पक्षाच्या इतर प्रभावशाली नेत्यांचा समावेश आहे. हे पथक देशभरातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये तरुणांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यांना योग्य उपाय शोधण्यात मदत करण्यासाठी युवा संवाद कार्यक्रमांचे आयोजन करेल.
तरुणांच्या योगदानावर टीम करणार चर्चा
या विशेष ’सुपर 5’ टीममध्ये नितीन नवीन (राष्ट्रीय अध्यक्ष), विनोद तावडे (राष्ट्रीय महासचिव), हर्ष संघवी (गुजरातचे मंत्री) आणि ओ. पी. चौधरी (छत्तीसगडचे मंत्री) यांसारख्या प्रमुख नेत्यांसोबत स्मृती इराणी यांचा समावेश आहे. येत्या काळात, हे नेते तरुणांमध्ये जाऊन डिजिटल युगापुढील आव्हाने आणि देशाच्या विकासातील तरुणांच्या योगदानावर चर्चा करतील.
BJP’s special ‘Super 5’ team for Gen-Z