बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना सावधान

बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना शेतकर्‍यांनी जागरूकता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.शेतकर्‍यांनी अधिकृत निविष्ठा विक्री केंद्रातून बियाणे, रासायनिक खतेकीटकनाशके यांची खरेदी करताना जागरूक राहून खरेदी करण्याच्या सूचना कृषी विभाग नाशिक यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
गुणवत्ता व दर्जाची हमी देणार्‍या अधिकृत विक्रेत्याकडूनच शेतकर्‍यांनी निविष्ठा खरेदी कराव्यात. बनावट/भेसळयुक्त निविष्ठा खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करावी. निविष्ठा खरेदी करताना सील अथवा मोहरबंद पाकिटे / पिशव्या / बाटल्या असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्यावी.
कमी वजनाच्या निविष्ठा व छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री करणे हा गुन्हा आहे. याकरिता कृषी विभाग व वजनमापे निरीक्षकाकडे संपर्क साधावा. कीटकनाशके अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करावी. खते / बियाणे / कीटकनाशके / जैविक कीटकनाशके संबंधित गुणवत्ता नियंत्रण कायद्यांतर्गत नोंदणीकृत असल्याची खात्री करावी. कायद्यांतर्गत येणार्‍या निविष्ठांचे गुणनियंत्रण करणे शक्य असल्याने कायद्यात असलेल्या निविष्ठांचीच खरेदी करावी.
रासायनिक खतांमध्ये भेसळ ओळखणे
सध्या रासायनिक खतांमध्ये भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, खालील मुद्यांच्या आधारावर शेतकर्‍यांनी रासायनिक खते खरेदी करावे.
युरियामध्ये भेसळ ओळखण्यासाठी चिमूटभर युरिया, 2 चमचे पाण्यात विरघळविल्यास तो संपूर्णपणे विरघळतो व द्रावणात थंडपणा जाणवतो. युरियामध्ये मिठाची भेसळ ओळखण्यासाठी युरिया चमच्यात घेऊन तापविल्यास वितळतो. त्यात मीठ असल्यास मीठ न वितळता तसेच राहते.
डाय अमोनियम फॉस्फेटची शुद्धता ओळखण्यासाठी चिमूटभर डीएपी तळहातावर घेऊन त्यावर चुना चोळल्यास अमोनियाचा वास येतो.डाय अमोनियम फॉस्फेटमधील भेसळ ओळखण्यासाठी डीएपीचे दाण्यास थोडी उष्णता दिल्यास दाणे फुगतात. नंतर थोडी जास्त उष्णता दिल्यास दाणे वितळतात. भेसळ असल्यास दाणे फुगत नाही व वितळतही नाही.
सिंगल सुपर फॉस्फेटचे दाणे तापविले तर त्यांच्या आकारात बदल होत नाही, म्हणून डीएपीमध्ये भेसळ केल्यास न फुगणारे दाणे लगेच ओळखता येतात. म्युरेट ऑप पोटॅशमध्ये लाल विटाची वा लाल मातीची भेसळ ओळखण्यासाठी चिमूटभर एमओपी 2 चमचे पाण्यात विरघळविल्यास एमओपी पूर्णपणे विरघळतो व भेसळ खाली राहते.

वाहिद बागवान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *