– सोनाली कदम
यंदा मान्सूनचे आगमन राज्यात अपेक्षेपेक्षा काहीसे उशिरा झाले. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात अनेक भागांत पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप पेरणीबाबत शेतकर्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला. मका, सोयाबीन, बाजरी, तूर, मूग, उडीद, कापूस आदी पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली असून पिकांची उगवणही समाधानकारक दिसून येत आहे.
पण फक्त हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसाच्या आधारे संपूर्ण हंगामाचे चित्र निश्चित करता येत नाही. गेल्या काही वर्षांतील अनुभव लक्षात घेतल्यास पावसाचे वितरण अधिकाधिक अनियमित होत असल्याचे दिसून येते.आणि त्यातच यंदाच वर्ष अल निनोच्या प्रभावाखाली आहे.
अल्प कालावधीत अतिवृष्टी होणे, मध्येच दीर्घ पावसाचा खंड पडणे, तसेच एका भागात अतिवृष्टी आणि दुसर्या भागात अपुरा पाऊस अशी परिस्थिती वारंवार निर्माण होत आहे. हवामानातील या बदलांचा थेट परिणाम पीक वाढ, अन्नद्रव्यांचे शोषण, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि एकूणच उत्पादनक्षमतेवर होत आहे.
अशा परिस्थितीत बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती व्यवस्थापनाचा अवलंब करणे आवश्यक आहे. विशेषतः उपलब्ध पावसाच्या पाण्याचा कार्यक्षम वापर आणि जलसंधारण यांना प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे.
शेतात पडणार्या पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त भाग जमिनीत मुरेल, यासाठी शेतबांधांची दुरुस्ती, कंपार्टमेंट बंडिंग, समतल चर, नाला बांध, तसेच इतर जलसंधारणाच्या उपाययोजना प्रभावी ठरतात. या उपायांमुळे मृदा धूप कमी होते, जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि भूजल पातळी वाढण्यास मदत होते. पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन ही केवळ जलसंधारणाची संकल्पना नसून बदलत्या हवामानात उत्पादन स्थिर ठेवण्याचे महत्त्वाचे साधन आहे.
शेततळे हे संरक्षित सिंचनासाठी प्रभावी माध्यम ठरू शकते. अतिवृष्टीच्या काळात वाहून जाणारे पाणी शेततळ्यात साठविल्यास पावसाचा खंड पडल्यास त्याचा उपयोग संरक्षक सिंचनासाठी करता येतो. पिकांच्या वाढीतील संवेदनशील अवस्थेत उपलब्ध होणारे एक-दोन सिंचनही उत्पादनात लक्षणीय वाढ घडवून आणू शकते. त्यामुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने अंतर्गत शेततळे खोदकाम यांसारख्या उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेततळ्यांची उभारणी करण्यास प्राधान्य द्यावे.
पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. ठिबक सिंचनामुळे पाणी थेट पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचते. परिणामी पाण्याची बचत होते, अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होतो आणि उत्पादन खर्च कमी करण्यास मदत मिळते. विशेषतः फळबागा, भाजीपाला तसेच इतर नगदी पिकांमध्ये सूक्ष्म सिंचनाचा वापर अधिक परिणामकारक ठरतो.
पावसातील अनिश्चिततेमुळे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. पिकांच्या अवशेषांचा वापर, सेंद्रिय आच्छादन किंवा आवश्यकतेनुसार मल्चिंगचा अवलंब केल्यास बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते, तणांची वाढ मर्यादित राहते आणि जमिनीतील आर्द्रता अधिक काळ टिकून राहते.
बदलत्या हवामानात कीड व रोगांच्या प्रादुर्भावातही बदल होत आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी नियमित पीक निरीक्षण करणे आवश्यक आहे. कोणतीही लक्षणे दिसून आल्यास कृषी विभाग किंवा कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचा आणि महाविस्तार एआय ऍप मधील चॅटबोटच्या मार्गदर्शनानुसारच नियंत्रण उपाययोजना कराव्यात. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन फवारणीचे नियोजन केल्यास अनावश्यक खर्च टाळता येतो आणि कीड-रोग नियंत्रण अधिक प्रभावीपणे करता येते.
संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनालाही तितकेच महत्त्व आहे. सततच्या पावसामुळे अन्नद्रव्यांचे धुऊन जाणे किंवा उपलब्धतेत घट होऊ शकते. त्यामुळे मृदापरीक्षणाच्या आधारे शिफारशीनुसार खतांचा वापर करणे, सेंद्रिय खतांचा समावेश वाढविणे आणि आवश्यकतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे फायदेशीर ठरते.
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर हवामान अंदाजाचा वापर करून शेतीतील विविध कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. कृषी विभाग, भारतीय हवामान विभाग आणि कृषी विद्यापीठांकडून वेळोवेळी प्रसिद्ध होणार्या हवामानाधारित सल्ल्याचा अवलंब केल्यास जोखीम कमी करून उत्पादन टिकवून ठेवणे शक्य होते.
यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामाला चांगली सुरुवात झाली असली, तरी पुढील काळात पावसाचे स्वरूप कसे राहील, याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यामुळे जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, ओलावा संवर्धन, नियमित पीक निरीक्षण आणि शास्त्रीय पीक व्यवस्थापन या बाबींना प्राधान्य दिल्यास बदलत्या हवामानाचा परिणाम कमी करून शेती अधिक शाश्वत आणि उत्पादनक्षम बनविणे शक्य होईल.
Changing Rainfall Patterns and Agricultural Planning