संपादकीय

भगवान जगन्नाथांचा जयघोष; दुमदुमली नाशिकनगरी

मुकुंद बाविस्कर
भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र, भव्य आणि ऐतिहासिक उत्सव आहे. ओडिसा राज्यातील पुरी येथे दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीयेला ही यात्रा सुरू होते. या रथयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे स्वतः भगवान जगन्नाथ (विष्णूचे रूप), त्यांचे मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह मुख्य मंदिरातून बाहेर येऊन भाविकांना दर्शन देतात. अशाच प्रकारचा उत्सव अलीकडच्या काळात नाशिकनगरीमध्ये पंचवटी तसेच सिडको आणि इंदिरानगर या भागातही गेल्या काही वर्षांपासून साजरा करण्यात येत आहे. या रथोत्सवात शहरातील हजारो भाविक सहभागी होतात. ‘जय जगन्नाथ’ असा जयघोष करीत भक्ती, सेवा व सामाजिक ऐक्याचा संदेश देत श्री जगन्नाथ रथोत्सव उत्सव समिती पंचवटीतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. पंचमुखी हनुमान मंदिर येथे शृंगार, पूजा व आरती झाल्यानंतर भगवान जगन्नाथ, बंधू बलभद्र व भगिनी सुभद्रा यांच्या मूर्ती रथात विराजमान केल्यानंतर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कैलास मठाचे स्वामी संविदानंद सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत रथयात्रेचा प्रारंभ झाला.
पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत डॉ. भक्तिचरणदास महाराज यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली निघालेल्या या रथाच्या पुढे बँड पथक, मैदानी खेळ पथक, मृदंग, हनुमान निशाण, देवदेवतांच्या वेशभूषा करून काही भाविक सहभागी झाले. मार्गात ठिकठिकाणी रथाचे स्वागत व पूजन करण्यात आले. रथ पंचमुखी हनुमान मंदिर, जुना आडगाव नाका, गणेशवाडी, माळगे महाराज पूल, नेहरू चौक, मेनरोड, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, शिवाजी चौक, नागचौक, कृष्णनगर येथून येऊन पंचमुखी हनुमान मंदिर येथे समारोप झाला. सायंकाळी महाआरती करण्यात आली. एका बाजूला पुरुष, तर दुसर्‍या बाजूला महिला भाविकांनी रथ ओढला.
‘हरे राम, हरे कृष्ण’च्या गजरात रथयात्रा :
कलिंग सांस्कृतिक समाज सामाजिक संस्थेतर्फे इंदिरानगर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान जगन्नाथ यांची पारंपरिक रथयात्रा भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडली. सराफनगर येथून दुपारी चार वाजता रथयात्रेला प्रारंभ झाला. ‘हरे राम, हरे कृष्ण’च्या अखंड नामघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि जयघोषात शेकडो भाविक सहभागी झाल्याने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. भगवान जगन्नाथ यांच्या रथाला रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. ढोल तसेच रणवाद्य पथकाच्या निनादात कलाकारांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली.इंदिरानगरमध्ये ‘जय जगन्नाथ’च्या जयघोषात श्री जगन्नाथ पुरीच्या धर्तीवर पारंपरिक पद्धतीने भगवान श्री जगन्नाथांची रथयात्रा सलग दहाव्या वर्षी मोठ्या भक्तिभावाने काढण्यात आली होती. रथयात्रेदरम्यान भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून सडा-संमार्जन केले, रस्ते स्वच्छ करून सुंदर रांगोळ्या काढल्या आणि रथावर फुलांची पुष्पवृष्टी करून भगवान श्री जगन्नाथांचे स्वागत केले.
महाकवी कालिदास दिनानिमित्त नाट्यप्रयोग रंगला :
महाकवी कालिदासांच्या आयुष्यातील संघर्ष, मल्लिकावर जडलेले प्रेम, पुढे सोसाव्या लागणार्‍या विरहवेदना, त्यातून निर्मिलेले महाकाव्य असा कालिदासांचा संपूर्ण जीवनपट ‘कालाय तस्मै नम:’ या नाट्यप्रयोगातून उलगडला. नाशिक महापालिका व अखिल भारतीय नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास दिनानिमित्त बुधवारी (दि. 15) हे नाटक महाकवी कालिदास कलामंदिरात सादर झाले. विक्रम गवांदे लिखित व दिग्दर्शित या नाटकातून कालिदासांचे जीवन उलगडण्यात आले. आधुनिक काळातील आजी व नातीच्या संवादाने नाटकाला
सुरुवात होते.
सॅटर्डे संडे ग्रुपच्या सायकलिस्टची पंढरपूर वारी
सॅटर्डे संडे ग्रुप, नाशिक यांच्यातर्फे आयोजित पंढरपूर सायकलवारी सलग दुसर्‍या वर्षी अत्यंत यशस्वीपणे झाली. विठुमाउलीच्या जयघोषात, अभूतपूर्व शिस्त आणि उत्साहाच्या वातावरणात झालेल्या या सायकलवारीमध्ये नाशिकमधील डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट, शासकीय अधिकारी आणि नामांकित व्यावसायिक अशा विविध क्षेत्रांतील 135 सायकलिस्ट ‘पंढरपूरची वारी लय भारी…’ अशा घोषणा देत सहभागी झाले होते. या सायकलवारीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात एकाच वेळी तीन पिढ्यांचा संगम पाहायला मिळाला. वारीमध्ये 35 वर्षांखालील 30 पेक्षा जास्त तरुण सायकलिस्ट वारकरी सहभागी झाले होते. तरुणांमधील विठुरायाची ही ओढ सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. नाशिक
येथे या ग्रुपतर्फे तयार करण्यात आलेल्या 12 फूट उंच देखण्या विठुरायाच्या रथाची भव्य आरती करण्यात आली. पंढरपूरला पोहोचल्यानंतर सॅटर्डे संडे ग्रुपच्या 125 सायकलिस्टनी
एका रेषेत येत शिस्तबद्ध सायकलिंगचे प्रदर्शन केले.
हास्य-काव्यधारांमध्ये ज्येष्ठ नागरिक चिंब
नाशिकरोड येथील नगरसेवक कैलास मुदलियार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिखरेवाडीतील कुसुमाग्रज विरंगुळा केंद्रात कवी रवींद्र मालुंजकर यांच्या ‘चला कवितांच्या गावात…’ ही काव्यमैफल रंगली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या व्याख्यानात कवी रवींद्र मालुंजकर यांनी सुरेल आवाजात लोकप्रिय गीते, विडंबन कविता, वात्रटिका, हास्यकविता, गझल, पोवाडा, लोकगीते अशा आशयसंपन्न रचनांसह विविध कवितांचे सादरीकरण केले. या उपक्रमातून ज्येष्ठ नागरिकांना निखळ हास्यरसाची मेजवानी देत हास्य-काव्यधारांमध्ये चिंब-चिंब भिजवले. मनसोक्त गप्पा मारत काही गंभीर कविता सादर करून हसता-हसता अंतर्मुख केले.
स्वानंद संस्थेचा अठरावा वर्धापन दिन :
शिखरेवाडी येथील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभागृहात संस्थेचा अठरावा वर्धापन दिन उत्साहात झाला. संत साहित्यातील पुरुष व्यक्तिरेखा हा इ.स.1131 ते 1968 या कालावधीतील संतसाहित्यातील काही थोर संतांचा जीवनक्रम संस्थेच्या पुरुष सभासदांनी अभिनयाने आणि त्यांच्या अभंगांनी उपस्थितांना करून दिला. उपाध्यक्षा सुनंदा गोसावी यांच्या संकल्पना आणि मार्गदर्शनातून तसेच मनीषा जोशी यांचे नृत्यदिग्दर्शन आणि अनिता जोशी यांचे सुमधुर आवाजातील अभंग सादरीकरण यामुळे कार्यक्रम उंचीवर गेला.

Chants hailing Lord Jagannath; the city of Nashik reverberates.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

21 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

21 hours ago