मुकुंद बाविस्कर
नव्या वर्षाचे स्वागत नाशिकनगरीत जल्लोषात झाले. नवी ऊर्जा, नवचैतन्य, नवा उत्साह घेऊन नव्या संकल्पांसह आबालवृद्धांनी नववर्षामध्ये वाटचाल सुरू केली आहे. सध्या नाशिक शहरात महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण असले तरी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुरूच आहेत. त्यातच शीख बांधवांचे गुरू गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त शहरातून काढलेल्या मिरवणुकीमुळे धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडले. शीख समुदायासाठी सर्वांत महत्त्वपूर्ण सणांपैकी एक म्हणजे गुरू गोविंद सिंग जयंती होय.
हा दिवस प्रकाश पर्व म्हणून साजरा केला जातो. शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंग यांची जयंती दि. 28 डिसेंबर रोजी साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये शीख समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी रथावर गुरू गोविंद सिंगजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती.
गोदाघाटावर स्वच्छता अभियान :
नाशिक तीर्थक्षेत्री पुढील वर्षात जागतिक दर्जाचा सिंहस्थ कुंभमेळा 2027 महोत्सव भरणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा हायटेक तसेच पर्यावरणपूरक करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांमध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षण संस्था व आदिवासी सेवा समिती, नाशिक संस्थाअंतर्गत नाशिक कॅम्पसमधील महाविद्यालयांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. याचाच भाग म्हणून संस्थेच्या वतीने पावन गोदावरी-स्वच्छ गोदावरी, सुंदर गोदावरीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शहरातील गोदावरी नदी व गोदाघाट भागात गेल्या रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे 250 किलोवर कचरा व प्लास्टिकचे संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
कलाप्रदर्शनाला प्रतिसाद :
अन टायटल आर्टिस्ट ग्रुप व नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या शाळेतील कर्णबधिर, दिव्यांग व गतिमंद विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींनी नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. कुसुमाग्रज स्मारकात सुरू झालेल्या या प्रदर्शनात या विशेष मुलांच्या कल्पकतेला व्यासपीठ मिळाल्याने उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले. या प्रदर्शनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजेश सावंत यांच्या हस्ते झाले. तसेच प्रदर्शनात व्यावसायिक कलाकारांच्या चित्रांसोबतच दिव्यांग विद्यार्थ्यांनी कुंभमेळा 2026, गोदावरी नदी, नाशिकची संस्कृती व सामाजिक जीवन या विषयांवर आधारित चित्रे मांडली होती.
गोदाघाटावर उजळले सहस्रदीप :
भारतीय संस्कृती टिकली तर संस्कार टिकतील, या निर्मळ हेतूने सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषात स्वागत करताना भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, भारतीय संस्कृती टिकून राहावी यासाठी पेठरोड येथील शिवनेरी युवक मित्रमंडळ आणि स्वामी मित्रमेळा विश्वस्त मंडळातर्फे गेल्या बुधवारी (दि.31) रात्री रामकुंडावर शेकडो सहस्रदीप प्रज्वलन करून नववर्षाचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. नववर्षाचे स्वागत भक्तिमय वातावरणात व्हावे, आपल्या भारत देशाची संस्कृती टिकून राहण्यासाठी दीप प्रज्वलित करत स्वतःतील आत्मशक्ती जागृत करणे, समाजात सुसंस्कृत पिढी घडावी, व्यसनमुक्ती उद्देशाने सद्गुरू श्रीमद परमहंस स्वामी सुमंताश्रम यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
भाविकांच्या गर्दीने गजबजली मंदिरे :
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी असंख्य नाशिककरांनी गुरुवारी श्री काळाराम मंदिर, कपालेश्वर आणि नवश्या गणपतीसह शहर व उपनगरांतील विविध मंदिरांमध्ये रांगा लावल्या होत्या. सीतागुंफा आणि गोदाघाटावरही मोठी गर्दी दिसून आली. सोमेश्वर, एकमुखी दत्त मंदिर, नवश्या गणपती मंदिरासह तपोवनात गर्दीमुळे दर्शनासाठी भाविकांना अर्धा ते एक तास रांगेत उभे राहावे लागले. उपनगरांतही असेच चित्र होते. शहरवासीयांनी रात्री मोठा जल्लोष अन् आतषबाजी करीत सन 2025 या सरत्या वर्षाला निरोप देत सन 2026 या नववर्षाचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत केले. कॉलेजरोड, गंगापूररोड, तसेच उपनगरांमध्ये तरुणाईने मध्यरात्री बारा वाजता फटाके फोडून जल्लोष केला.
कीर्ती कला मंदिराचा
सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम :
कीर्ती कला मंदिराच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त दर महिन्याला होणार्या सुवर्णरेखा या विशेष कार्यक्रमांतर्गत कालिदास कला मंदिरात एक भावस्पर्शी व संस्मरणीय कार्यक्रम झाला. प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जीवनात घडणार्या प्रत्येक प्रसंगाचे नृत्यमय सादरीकरण रामलल्ला या नृत्यातून सादर करण्यात आले. गुरू पंडित क्षमा भाटे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार, मुलाखत तसेच त्यांच्या शिष्यांतर्फे सादर करण्यात आलेली रामलल्ला ही कथक नृत्यप्रस्तुती हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. याप्रसंगी गुरू क्षमा भाटे, गुरू रेखा नाडगौडा, गुरू आदिती पानसे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके आणि शोभना दातार उपस्थित होते.
ब्राह्मण संस्थेतर्फे पुरस्कार प्रदान :
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांना जीवनगौरव व समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून बांधकाम व्यावसायिक जयंत भातांबरेकर, संस्थेचे अध्यक्ष अॅड. अविनाश भिडे, कार्याध्यक्ष अनिल देशपांडे, कार्यवाह अॅड. सुहास भणगे तसेच कोषाध्यक्ष उल्हास पंचाक्षरी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ सहकारमहर्षी जयंतीभाई जानी व ज्येष्ठ विधिज्ञ शशीकुमार तळेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानचे प्रमुख वेदाचार्य रवींद्र पैठणे व क्रीडा पत्रकार नितीन मुजुमदार यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आले. ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल संस्थेला उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
City procession on Guru Gobind Singh Jayanti shows religious unity सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…