संस्कृत भाषा टिकली तरच सुसंस्कृतपणा टिकेल

डॉ. धनश्री तळवलकर : संस्कृत भाषा संवर्धन कार्य पुरस्काराचे वितरण

नाशिक : प्रतिनिधी
प्रत्येक भाषा उत्तम असते. त्यामुळेच संवाद साधता येतो. मात्र, संस्कृत भाषेचा प्रथम क्रमांक आहे. कारण संस्कृतमधून अनेक भाषा निर्माण झाल्या आहेत. संस्कृत नियमाच्या बाहेर मर्जीप्रमाणे वापरली जात नाही. व्याकरण हाच संस्कृत भाषेचा गाभा आहे. संस्कृत भाषा ही देवांची भाषा असून, यात वेद, उपनिषदे, पुराण, श्रीमद्भगवद्गीता यांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाला संस्कृत भाषा यायला हवी. संस्कृत भाषा शाळेत शिकवली गेली पाहिजे. संस्कृत भाषा टिकली तरच संस्कार, संस्कृती आणि सुसंस्कृतपणा टिकेल, असे प्रतिपादन स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख डॉ. धनश्री आठवले-तळवलकर यांनी येथे केले.
कै. डॉ. वि. म. गोगटे यांच्या 39 व्या स्मृतिदिनानिमित्त संस्कृत भाषा सभा आणि सावाना यांच्या वतीने देण्यात येणार्‍या संस्कृत भाषा संवर्धन कार्य पुरस्काराचे वितरण मंगळवारी (दि.3) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर संस्कृत भाषा सभेचे अध्यक्ष रमेश देशमुख, उपाध्यक्ष श्रद्धा शहा, सहकार्यदर्शिनी तेजश्री वेदविख्यात, संस्कृत भाषा सभेचे सल्लागार विकास गोगटे व विवेक गोगटे, स्वाध्यायी परिवाराचे राजीव पटेल, सावाना अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, कायार्र्ध्यक्ष संजय करंजकर, सांस्कृतिक सचिव जयप्रकाश जातेगावकर, सोमनाथ मुठाळ, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार उपस्थित होते.
डॉ. तळवलकर पुढे म्हणाल्या, की कितीही प्रयत्न केले तरी कधीही संस्कृत बोलीभाषा होऊ शकणार नाही. संस्कृत शुद्ध भाषा टिकली पाहिजे. संस्कृत भाषेत तत्त्वज्ञान निर्माण झाले आहे. म्हणून संस्कृत भाषेला अधिक महत्त्व आहे. तत्त्वज्ञानासाठी संस्कृत शिकायला पाहिजे. संस्कृत भाषेत तत्त्वज्ञान आहे. अनेक जण त्याचे मराठीत भाषांतर करतात, पण ते बरोबर आहे, हे आपण सांगू शकत नाही. प्रत्येकाचे आकलन वेगळे असते. त्यासाठी आपली आपण भाषा शिकली पाहिजे. तत्त्वज्ञान समजून घेतले पाहिजे. त्यांनी जो अर्थ काढला तो बरोबर आहे, असे असू शकत नाही. प्रत्येक जण वेगळा अर्थ सांगेल. त्यापेक्षा आपले आपण भाषा शिकून अर्थ काढला पाहिजे.श्रीमद्भगवद्गीता समजून घ्यायची असेल तर संस्कृत आली पाहिजे. संस्कृत भाषेच्या तत्त्वज्ञानासमोर मी नतमस्तक होते. कुठल्याही भाषेत तत्त्वज्ञान सांगायला आवडेल. संस्कृत आवडते म्हणजे दुसर्‍या भाषेचा द्वेष नाही. माणसामाणसांतला भेद दाखवणारे कोणत्याही भाषेतील तत्त्वज्ञान आम्हाला मान्य नाही. भाषेचा भेद न ठेवणारा स्वाध्याय परिवार आहे. यावेळी विवेक गोगटे, ऋतुजा वेलणकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुरेश गायधनी यांनी आभार मानले.

यांचा झाला सन्मान

संस्कृत भाषा प्रसारिणी सभा, ठाणे यांना संस्कृत भाषा संवर्धन कार्य पुरस्कार-2026 देण्यात आला. पुरस्कारार्थी संस्थेला 21 हजार रुपये, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हजीरनिस व संस्था कार्यवाह ऋतुजा वेलणकर उपस्थित होत्या.

श्रीविष्णुसहस्त्रनाम पुस्तकाचे प्रकाशन

संस्कृत भाषा सभा, नाशिकच्या कार्यदर्शिनी सरिता देशमुख, कोषाध्यक्ष शोभा सोनवणे लिखित श्रीविष्णुसहस्त्रनाम पुस्तकाचे प्रकाशन डॉ. धनश्री तळवलकर यांच्या हस्ते झाले.

 

Civilization will survive only if the Sanskrit language survives.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *