80 टक्के निर्यात घटणार?
लासलगाव : समीर पठाण
यावर्षी मे ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत झालेल्या सातत्यपूर्ण अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. हवामानातील या अनियमिततेमुळे वेलींना पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही, परिणामी घडनिर्मितीची (गर्भधारणा) प्रक्रिया बाधित झाली. परिणामी, अनेक ठिकाणी 50 ते 90 टक्क्यांपर्यंत उत्पादन घटले आहे. दरवर्षी एका वेलीपासून 60 ते 70 घड मिळत असताना, यंदा ही संख्या फक्त 2 ते 5 घडांवर आली आहे. हवामान बदलाच्या या थेट परिणामाचा द्राक्ष निर्यातीवरही गंभीर परिणाम
होणार आहे.
भारताने 2023-24 मध्ये 3.44 लाख टन ताज्या द्राक्षांची निर्यात केली होती. त्यातून भारताला 3460 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले होते. त्यात एकट्या महाराष्ट्राचा वाटा 67 टक्के होता. द्राक्ष निर्यातीसाठी युरोप हा भारताचा प्रमुख बाजार असून, विशेषतः नेदरलँड्स, जर्मनी आणि युनायटेड किंगडम या देशांना सर्वाधिक द्राक्षे निर्यात केली जाते. परंतु, या हंगामात हवामान बिघडल्यामुळे निर्यातीचे प्रमाण 15 ते 20 टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अल्प उत्पादनासोबतच काही भागात द्राक्षवेलींची वाढ खुंटल्याने आणि दर्जा कमी झाल्याने निर्यातीयोग्य फळांचा टक्का अजून कमी झाला आहे. परिणामी, युरोपमधील मागणी पूर्ण करण्यासाठी लागणारा पुरवठा घटणार आहे. द्राक्ष पंढरी ठप्प झाल्याने व उत्पादन घटल्याने आणि दर्जा टिकवणे कठीण झाल्याने निर्यातीतील भारताची स्पर्धात्मकता धोक्यात आली आहे. यामुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान तर होणारच आहे. त्यासोबतच, द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
नाशिक जिल्ह्यात द्राक्ष पिकाला योग्य हवामान राहिले नाही, त्यातच यावर्षी अतिवृष्टीने फटका दिला.अवकाळी पाऊस आणि उष्णतेच्या बदलत्या चक्रामुळे वेलींना योग्य पोषण आणि सूर्यप्रकाश मिळाला नाही. परिणामी, घडनिर्मिती थांबली आणि उत्पादन घटले. त्यामुळे शासनाने द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना आर्थिक मदत करावी.
-सुनील गवळी, द्राक्ष उत्पादक शेतकरी, ब्राह्मणगाव(नजीक)
हवामान बदलाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, द्राक्ष उत्पादकांना पीक व्यवस्थापन आणि जलनियोजनासाठी तज्ज्ञ मार्गदर्शनाची गरज भासत आहे. भविष्यात हवामान प्रतिरोधक वाण, पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन आणि ग्रीन हाउस शेती यांसारख्या उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे. अन्यथा भारताची द्राक्ष निर्यात दीर्घकाळ घटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-अॅड. रामनाथ शिंदे, संचालक, द्राक्ष बागायतदार उत्पादक संघ, नाशिक जिल्हा