वडाळा रोड परिसरातील अल मदिना कॉलनीत घटना
वडाळागाव /सिडको : प्रतिनिधी
नाशिक शहरातील वडाळा रोड येथील अल मदिना कॉलनी परिसरात बुधवारी (दि.12) संध्याकाळच्या सुमारास भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एक चिमुकला आणि एक महिला जखमी झाल्याची धक्कादायक घटना
घडली आहे.
घरासमोरील पटांगणात खेळत असताना आर्यन संदीप विधाते (वय 7 ) या बालकावर भटके तीन ते चार कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवला. त्यावेळी शेजारी राहणार्या रेश्मा शेख या महिलेने आक्रमक झालेल्या कुत्र्यापासून आर्यनची सुटका केली. या हल्ल्यात आर्यनच्या हातावर, कानामागे आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या तर रेश्मा शेख यांच्या हातावर चावा घेतल्याने त्यादेखील जखमी झाल्या आहेत. दोघा जखमींना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकार्यांविरोधात रोष व्यक्त करत तातडीने भटके कुत्रे पकडावेत, अशी मागणी केली आहे. “जर प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही, तर आम्ही हे कुत्रे थेट महापालिकेच्या दालनात सोडून आंदोलन करू,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मागील दोन वर्षांपासून वारंवार कुत्र्यांच्या बाबतीत तक्रारी करत आहे. गाडी पाठवली खरे, पण त्यावर धातूरमातूर कारवाई झाली. कुत्र्यांचा प्रश्न मार्गी नाही लागला तर स्वखर्चाने कुत्रे धरून महानगरपालिकेत आणून सोडू.
– माजिद पठाण, स्थानिक नागरिक