भारतीय शेती ही आजही मोठ्या प्रमाणावर निसर्गाच्या चक्रावर अवलंबून आहे. विशेषतः लहान व मध्यम शेतकरी हे प्रामुख्याने पावसावर आधारित शेती करतात. अशा परिस्थितीत हवामानाच्या बदलत्या स्वरूपाचा थेट परिणाम त्यांच्या उत्पादनावर, उत्पन्नावर आणि जीवनमानावर होतो. मागील काही दशकांमध्ये हवामानाच्या चक्रात झालेला बदल, अति पावसाचे प्रमाण, वेळेआधी किंवा उशिरा पडणारे वादळ, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, अयोग्य तापमान – हे सगळं शेतीच्या दृष्टिकोनातून गंभीर ठरत आहे. यामुळेच आजच्या काळात ‘हवामान साक्षरता’ ही केवळ पूरक गोष्ट न राहता, शेतकर्यांसाठी एक नवी अत्यावश्यकता बनली आहे.
‘हवामान साक्षरता’ म्हणजे फक्त हवामानाचा अंदाज ऐकणं नाही; तर हवामान बदल, त्याचे पिकांवर होणारे संभाव्य परिणाम, त्यावरील अन्नद्रव्यांची गरज, कीड व रोगप्रादुर्भावाचे चक्र आणि हवामानाशी सुसंगत पीक निवड या सार्यांची समज. हे म्हणजे केवळ विज्ञान नव्हे, तर शाश्वत शेतीसाठी आवश्यक निर्णयक्षमतेचं प्रशिक्षण आहे. शेतकर्यांनी पावसाच्या तारखा, दिशा व प्रमाण याबाबत आडाखे लावून शेती करायची पद्धत पारंपरिक होती. परंतु, आता हवामानाचं चक्र इतकं अनियमित झालं आहे की, शेतकर्याला तांत्रिक आणि वैज्ञानिक आधाराशिवाय निर्णय घेणं धोकादायक ठरू शकतं. पावसाची सुरुवात झाली म्हणून पेरणी केली, पण दोन आठवडे कोरडी हवा राहिली तर अंकुरित झालेली बियाणं वाया जातं. उशिरा पडणार्या पावसामुळे काढणीची पिकं खराब होतात. त्यातून होणारे आर्थिक नुकसान केवळ शेतकर्याचं नाही, तर संपूर्ण अन्नसाखळीचं संकट ठरू शकतं. या पार्श्वभूमीवर शेतकर्यांनी हवामान साक्षरतेकडे गांभीर्याने पाहणं अत्यंत गरजेचं आहे.
याचा अर्थ, ‘कधी आणि कुठे किती पाऊस पडणार आहे’ याच्या अंदाजांबरोबरच ‘या पावसामुळे माझ्या पिकांवर काय परिणाम होईल?’, ‘कशाप्रकारे मी नियोजन करू शकतो?’, ‘काही पर्यायी पीक घ्यावं का?’ मातीचा ओलावा किती आहे?’‘जमिनीत बदलत्या तापमानाचा परिणाम कोणत्या टप्प्यावर होतो?’ यांसारख्या प्रश्नांची उत्तरं शोधता येणं हीच खरी हवामान साक्षरता. भारतात सध्या हवामानविषयक माहिती देणारी अनेक प्रणाली अस्तित्वात आहे. भारतीय हवामान विभाग, कृषी विज्ञान केंद्र, विविध मोबाइल अॅप्स, राज्य सरकारच्या ‘कृषी सल्ला’ प्रणाली, विद्यापीठांचं कृषीदर्शन, तसेच खासगी कंपन्यांची विश्लेषणं – हे सर्व शेतकर्यांना माहिती मिळवण्यासाठी उपयोगी ठरतात. पण प्रश्न असा आहे की, ही माहिती प्रत्यक्ष शेतकरी वापरतो का? तिचा अर्थ समजतो का? आणि त्या आधारे तो निर्णय घेतो का? अनेक वेळा ही माहिती शास्त्रीय भाषेत असते, वेळेवर पोचत नाही, किंवा संदर्भाशिवाय असते. त्यामुळे हवामान साक्षरता ही केवळ माहिती पोहोचवण्याची गोष्ट नसून, माहितीचा अर्थ लावण्याची क्षमता निर्माण करणं ही खरी गरज आहे.
या क्षमतेच्या अभावामुळे कित्येक वेळा शेतकर्यांनी चुकीचं नियोजन केलं, अनाठायी फवारणी केली, कीडरहित पिकावर रसायनं फवारली अथवा पाण्याचा चुकीचा अंदाज घेतला. याचा थेट परिणाम उत्पादनावर आणि खर्चावर झाला.हवामान बदलाचे शास्त्र हे केवळ प्रयोगशाळेपुरतं मर्यादित न ठेवता, ते शेतकर्याच्या शेतात नेणं आणि त्यांच्या अनुभवांना विज्ञानाशी जोडणे हाच पुढील दिशेचा पाया आहे. हवामान साक्षरतेसाठी शेतकर्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे, ग्रामपातळीवर हवामान निरीक्षण केंद्रं उभी केली पाहिजेत, स्थानिक बोलीभाषेत माहिती दिली पाहिजे आणि त्यावर आधारित ‘काय करावं आणि काय टाळावं’ याचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. आज आपण बघतो की, हवामान बदलांमुळे कृषी संकट वाढलं आहे. कोरडवाहू भागात पावसाचं प्रमाण कमी झालं आहे, काही भागात अतिवृष्टी झाली आहे, उन्हाळ्यातही गारपीट होत आहे. ज्या भागात एकेकाळी साखर ऊस भरभरून यायचा, तिथे आता पाण्याचा ताण आहे. काही भागांत उष्णतेमुळे परागीकरणाच्या प्रक्रियेत अडथळा येतोय. या सार्या बदलांचा थेट संबंध हवामान साक्षरतेशी आहे. शेतकरी जर हवामान समजून घेतला, तर तो या बदलांना सामोरा जाण्यास अधिक सक्षम ठरतो.
पिकांचे जीवनचक्र हवामानाशी निगडित असते. उगम, वाढ, फुलोरा, फळधारण, काढणी – या सर्व टप्प्यांवर विशिष्ट तापमान, आर्द्रता आणि प्रकाश आवश्यक असतो. हवामानात अनपेक्षित बदल झाल्यास पीक तणावात येतं. त्याचा परिणाम उत्पादनावर होतोच, पण काही वेळा रोगप्रवणता वाढते. उदा. अधिक आर्द्रतेमुळे बुरशीजन्य रोग जास्त होतात, कोरड्या हवेत अळीचं प्रमाण वाढतं.
अशा परिस्थितीत हवामान साक्षरतेचा उपयोग होतो – कारण यामुळे शेतकरी योग्यवेळी जैविक किंवा पर्यायी उपाय करू शकतो. शेतकर्यांना हवामान साक्षर करण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन कृषी अभ्यासक्रमात याचा समावेश करायला हवा. याशिवाय, कृषी विस्तार अधिकार्यांनी नियमित हवामान साक्षरता शिबिरं घेणं, स्थानिक रेडिओ, मोबाइल अॅप्सचा वापर करून सल्ला देणे हे गरजेचे आहे. या सार्यासाठी धोरणात्मक पातळीवर प्रयत्न आवश्यक आहेत.
हवामान साक्षरता ही आता केवळ पर्यावरण हवामान साक्षरतेपासूनचा भाग राहिलेली नाही. ती आर्थिक निर्णय, बीमाधोरणं, बियाण्यांची निवड, कृषी व्यवसाय आणि शाश्वततेशी जोडलेली आहे. हवामान साक्षर शेतकरी अनावश्यक खर्च टाळतो, योग्य पीक घेतो, पर्यायी उत्पन्नाच्या संधी शोधतो आणि संकटप्रसंगी कमी नुकसान सहन करतो. आपण आज यंत्र, ड्रोन, कृषी अॅप्स, सिंचन यंत्रणा यांच्याविषयी बोलतो; पण हे सगळं वापरण्यासाठी हवामान साक्षरता हवीच. केवळ कोणी फवारणी करतं म्हणून आपण करायचं, असं नको. आपल्या शेतात खरंच गरज आहे का? कीटकाचा प्रादुर्भाव वातावरणाशी संबंधित आहे का? अशा प्रश्नांची उत्तरे हवामान साक्षरता देऊ शकते.
आज हवामान बदल हे केवळ भविष्याचं संकट न राहता वर्तमानाचं वास्तव बनलं आहे. शाश्वत शेती, कमी निविष्ठा वापरणारी शेती आणि हवामान-सहनशील पिकं हे यावर उपाय आहेत, पण या सगळ्यांच्या मुळाशी शेतकर्याची साक्षरता आहे ती म्हणजेच हवामान साक्षरता. शेवटी, हवामान साक्षरता म्हणजे केवळ थोडी अधिक माहिती नव्हे – ती निर्णयक्षमतेची उंची आहे. अचूक हवामान वाचन, नियोजन आणि अंमलबजावणी केल्यासच शेतकरी बदलत्या हवामानाच्या लाटेवर आपली नाव सुरक्षितपणे चालवू शकतो. शेतीसाठी खतं, पाणी, बी-बियाणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच आता हवामानविषयीचं ज्ञान महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळे आता काळजीची नाही, तर कृतीची वेळ आहे आणि ती कृती सुरू होते हवामान साक्षरतेपासून.
Climate Literacy: A New Need for Farmers
नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…
खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…
दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. बांगलादेशमधील नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दीर्घकाळ…