नाशिक : देवयानी सोनार
गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांचे हल्ले मानवी वस्तीवर वाढले आहेत. नुकताच गंगापूर रोडवर बिबट्याने रहिवाशांंंवर, तसेच वन कर्मचार्यावरही हल्ला केला होता. अहिल्यानगर, पुणे येथेही बिबट्यांचे हल्ले मानवी वस्तीवर वाढले असून, वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांच्या निबीर्र्जीकरणाचा विचार सुरू असल्याचे सांगितले.वन्यप्राणीप्रेमींचा यास आक्षेप असून, त्याबद्दल नाराजी व्यक्त केली
पिंजर्यांची संख्या
वन विभाग………. पिंजर्यांची संख्या
पूर्व भाग नाशिक………… 210
पश्चिम भाग नाशिक ………. 70
अहिल्यानगर………….. .. 234
नाशिक वनवृत्त एकूण……. 514
बिबट्यामुळे जर मानवी जीवन धोक्यात येत असेल, अशा वेळी कठोर कायदे होतील तेव्हा होतील; परंतु सद्यःस्थितीत लहान मुले, ज्येष्ठांना मात्र बिबट्याच्या भीतीखाली वावरावे लागत आहे. शेतीप्रधान देश असल्याने अनेक शेतकरी, मजूर व कष्टकरी यांना शेतात राबण्याशिवाय गत्यंतर नसते. कितीही यंत्रसामग्री आली, तरी जी कामे करावी लागतात ती करावीच लागतात. त्यामुळे उसाचे क्षेत्र असो वा मका, बाजरी, ज्वारी येथे बिबट्यांना लपण्यासाठी, प्रजननासाठी जागा उपलब्ध होते. त्यामुळे त्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असते. भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीवर पाण्याच्या ठिकाणी बिबटे नजरेस पडतात. रात्री रस्त्यावर येतात.पशुधन, मानवावर हल्ले
केले जातात.
नाशिक जिल्ह्यात सिंचनाखाली एक लाख 72 हजार 831 हेक्टर क्षेत्र आहे.नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात सिंचनाखाली क्षेत्र भरपूर प्रमाणात असल्याने या भागात ऊस, मका, ज्वारी यांसारखी पिके प्रामुख्याने घेतली जातात. नाशिक जिल्हा व अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागांत उसाचे क्षेत्र, तसेच कॅनॉल, नदी परिसर जास्त प्रमाणात असल्याकारणाने बिबट्या या वन्यप्राण्याला आश्रयस्थान मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे.
वन्यजीव विभागाची उपाययोजना
मानव-बिबट संघर्ष टाळण्याकरिता वन विभागामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. नियमितपणे वन परिक्षेत्रातील बिबटप्रवण सर्व गावांमध्ये शासकीय वाहनावर स्पीकर लावून बिबट व इतर हिंस्त्र प्राण्यांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. ज्या क्षेत्रात बिबट्याचे अस्तित्व आहे, त्या क्षेत्रात गस्तीपथक तयार करून गावामध्ये जाऊन जनजागृती करीत आहे. ज्या क्षेत्रात बिबट्याचा वावर आहे, त्या क्षेत्रालगतच्या गावात भित्तिपत्रक व पाम्प्लेट लावण्यात आले आहेत. गावात दवंडी देण्यात येत असून, गावातील पोलीसपाटील, सरपंच, तलाठी, ग्रामविकास अधिकारी व संयुक्त वनव्यवस्थापन समिती यांचे पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थांची बैठक घेऊन गावातील लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. विविध गावांना जोडणार्या रस्त्याच्या बाजूचा झाडोरा साफ करून रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात ट्रम्प कॅमेरे लावून, तसेच विशेष पथक तयार करून बिबट्याचे पगमार्क, विष्ठा व फोटो इत्यादींबाबत तपासणी करून बिबट्यावर संनियत्रण ठेवण्यात
येत आहे.
रेस्क्यूसाठी प्रशिक्षण
मानव-बिबट संघर्ष टाळण्याबाबत उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याकरिता शासकीय यंत्रणांना सहकार्य करण्याबाबत जिल्हाधिकार्यांशी वेळोवळी चर्चा करण्यात येत आहे. वनक्षेत्रात बिबट्याचा अधिवास वाढावा म्हणून कुरण विकासाची कामेदेखील हाती घेण्यात आलेली आहेत. यामुळे या क्षेत्रात तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढण्यास हातभार लागणार आहे. बिबट्याचे व्यवस्थापन करण्यासाठी त्याला प्रसंगी रेस्क्यू करण्यासाठी लागणार्या कौशल्यासाठी वन कर्मचार्यांना स्थानिक पातळीवर प्रशिक्षण देण्यात येत आहे. ऊसतोड हंगामात बिबट्या हल्ल्याच्या घटना घडू नयेत म्हणून ऊसतोड मजुरांकडून घ्यावयाच्या खबरदारीबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत, तसेच वर्तमानपत्रांतदेखील याबाबत जनजागृती केली जाते. नाशिक वनविभागात बिबट्या पकडण्यासाठी 514 पिंजरे उपलब्ध आहेत. या अल्पकालीन उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
मध्यमकालीन उपाययोजना
नाशिक वनवृत्तात मागील काही दिवसांत काही प्रमाणात बिबट्यांची संख्या वाढलेली आहे. यात मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या बिबट्यांना जेरबंद करणे आवश्यक असते, जेणेकरून मानवहानीच्या घटनांमध्ये वाढ होणार नाही. याकरिता नाशिक वनवृत्तामध्ये अशा प्रकारच्या घटनांवर तत्काळ कार्यवाही करण्याकरिता प्रशिक्षित शीघ्र बचाव दल व प्रायमरी रिस्पॉन्स टीम तयार करण्याची कार्यवाही चालू आहे.
नाशिक येथे टीटीसी (ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर) कार्यरत असून, राहुरी (जि. अहिल्यानगर) येथे नवीन टीटीसी बांधकाम प्रगतिपथावर आहे. अहिल्यानगरमधील राहुरी येथे रेस्क्यू सेंटरचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला आहे. पूर्व भाग नाशिक, पश्चिम भाग नाशिक येथे एकूण नऊ आरआरटी प्रस्तावित आहेत. अहिल्यानगर येथे दोन पीआरटी स्थापन केले आहेत. पूर्व भाग नाशिक व पश्चिम भाग नाशिकमधील म्हसरूळ येथे रेस्क्यू सेंटरचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला आहे.
दोन बालकांचा मृत्यू, अकरा जखमी
नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीत बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका गंभीर स्वरूपात वाढत असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 1 एप्रिल 2025 पासून आजपर्यंत झालेल्या हल्ल्यांमध्ये दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच तीन जण गंभीर जखमी झाले असून, आणखी आठ जणांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती वन विभागाने दिली.
वनक्षेत्रातील मानवनिवासांमध्ये वाढती घुसखोरी, पाण्याची कमतरता आणि अन्नटंचाई यामुळे बिबटे मानववस्तीच्या जवळ येत असल्याचे प्राथमिक निरीक्षणात दिसून आले आहे. विशेषत: सायंकाळनंतर नागरिकांनी खबरदारी घ्यावी, विनाकारण निर्जन भागात जाणे टाळावे, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.
वन विभागाने या घटनांची दखल घेत परिसरात गस्त वाढवली असून, संवेदनशील भागांत पिंजरे, कॅमेरे आणि शोध पथके तैनात करण्यात आली आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात आहे. हल्ल्यांतील पीडित कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही अधिकार्यांनी दिली.
दीर्घकालीन उपाययोजना
नाशिक वनवृत्तात जुन्नरच्या धर्तीवर बिबट्यांच्या संख्येचा अभ्यास करून निर्बीजीकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या परवानगीकरिता सादर करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
मानव-बिबट संघर्षात लोकांनी पुढील बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात शेतात असलेल्या घराभोवती चेनलिंक, सौर कुंपण बांधणे आवश्यक आहे. तसेच उघड्यावर शौच करणे थांबविण्याकरिता स्वतंत्र शौचालये बांधणे आवश्यक आहे.
शेतात जाताना सोबत संरक्षणात्मक वस्तू जसे काठी व इतर वस्तू घेऊन जाणे आवश्यक आहे. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत शेती व आसपासच्या क्षेत्रात काळजीपूर्वक वावर करणे आवश्यक आहे.
मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी इतर विभागांकडून अपेक्षित कार्यवाही-
मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासंदर्भात इतर विभाग उदा. वीज कंपनी, सहकार व पणन विभाग आणि कृषी विभाग यांचे सहकार्य अत्यावश्यक आहे.
वीज कंपनीने बिबट्याप्रवण क्षेत्रात रात्री वीजपुरवठा खंडित होऊ नये, याकरिता वेगळ्या योजना आखणे गरजेचे आहे. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचा सांभाळ व संरक्षण देण्याची जबाबदारी साखर कारखान्यांना देणे आवश्यक आहे.
कृषी विभागामार्फत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसशेतीच्या लागवड पद्धतीमध्ये सुधार करणे आवश्यक वाटते.
अशी मिळाली भरपाई
नाशिक वनवृत्त परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांनी नाशिक वनवृत्तातील पूर्व भाग, पश्चिम भाग व अहिल्यानगर या परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. गेल्या पाच वर्षांत नाशिक जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या झालेल्या घटना व नुकसानभरपाई देण्यात आली आहे. 2021-22 या वर्षात पूर्व भाग नाशिक, पश्चिम भाग नाशिक, अहिल्यानगर येथे एकूण 12 जण मृत्युमुखी पडले, तर 39 जण जखमी झाले होते. 2022-23 मध्ये एकूण दहा मृत्यू, तर 61 जखमी, 2023-24 मध्ये दहा मृत्यू आणि 44 जखमी झाले. 2024-25 मध्ये 16 मृत्यू, तर 76 जखमी झाले. 2025-26 मध्ये 20 मृत्यू व 55 जखमी झाले होते. म्हणजेच गेल्या पाच वर्षांत 83 व्यक्तींचा मृत्यू आणि 289 जण बिबट्याच्या हल्ल्यांत जखमी झाले होते. मृत व जखमींच्या कुटुंबासाठी चार कोटी 34 लाख इतकी रक्कम नुकसानभरपाई म्हणून देण्यात आली आहे.
पशुधनाची सर्वाधिक हानी
गेल्या पाच वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात पशुधन नुकसान झालेल्या घटनांत नुकसानभरपाई देण्यात आली आहे. 2021-22 मध्ये पूर्व भाग नाशिक 200, पश्चिम भाग नाशिक 91, अहिल्यानगरमध्ये 1,678, अशा एकूण 1,969 वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशुधनाचे नुकसान झाले होते. 2022-23 एकूण 2561, 2023-24 मध्ये 7120, 2024-25 मध्ये 9305 आणि 2025-26 मध्ये 4651 इतक्या पशुधनाची हानी झाली आहे. त्यासाठी वन विभागाने दोन कोटी 52 लाख 96 हजार 773 इतकी रक्कम नुकसानभरपाईसाठी दिली.
राज्य सरकारचे 560 कोटींचे पॅकेज
नाशिकमध्ये बिबट्यांसाठी रेस्क्यू सेंटर उभारणार
राज्यात वाढत्या बिबट हल्ल्यांनी सर्वत्र चिंता पसरली असून, शासन याबाबत गांभीर्याने पावले उचलू लागले आहे. सध्या राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये बिबटे मानवी वस्त्यांमध्ये शिरण्याच्या घटना वाढल्या असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत वन विभागासाठी 560 कोटींच्या मोठ्या पॅकेजची घोषणा करण्यात आली. या निधीतून मानवी वस्त्यांमध्ये येणारे बिबटे पकडणे, त्यांचे पुनर्वसन, तसेच संरक्षक उपाययोजना राबविण्याचे ठरले आहे.
राज्यात बिबट्यांच्या वाढत्या हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 600 क्षमतेचे रेस्क्यू सेंटर उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकूण 1800 बिबट्यांना नियंत्रित वातावरणात ठेवण्याची योजना राबवली जाणार आहे. वनक्षेत्रातील उपलब्ध सरकारी जागांवर ही केंद्रे तातडीने उभी राहणार असून, परिस्थितीनुसार अशा केंद्रांची संख्या इतर जिल्ह्यांतही वाढवली जाईल. तसेच प्रथमच रॅपिड रेस्क्यू युनिट स्थापन करून अशा ऑपरेशन्सना गती देण्यात येणार आहे.
वडनेर गेट परिसरातून बालकाला उचलून नेले
24 नोव्हेंबर : मुंगसरे शेतात बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत
मौजे मुंगसरे येथे गट क्र. 18 मधील शेतात साधारण 4 ते 5 महिन्यांचे नर बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळले. माहिती मिळताच वनविभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करून मृत पिलाला म्हसरूळ वन्यप्राणी उपचार केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक तपासणीमध्ये हा मृत्यू मोठ्या बिबट्याच्या हल्ल्यातून झाल्याचा अंदाज वन्यजीव पशुवैद्यकांनी व्यक्त केला आहे. 24 नोव्हेंबर रोजी अधिकार्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन होणार असून, त्यानंतर सविस्तर माहिती जाहीर केली जाणार आहे.
वन्यप्राणीच तो त्याचा काय दोष…
नाशिक : प्रतिनिधी
वन्यप्राणीच तो त्याचा काय दोष, तुम्हीच घ्या दक्षता..उगाच नको रोष अशा प्रकारचे जनजागृती करणारे पत्रक वन्यजीव विभागामार्फत ग्रामस्थांसाठी ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. बिबट्या आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी वन्यजीव विभागामार्फत जनजागृती करणारे फलक तसेच काय काळजी घ्यावी, याबाबतच्या सूचना :
♦ कामानिमित्त वाडी-वस्ती ते शेत, त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी यांच्या घरापासून शाळेत जा-ये करताना शक्यतो समूहाने जावे.
♦ विविध जत्रा, उरूस या कलावधीत घरी परतताना विशेष काळजी घ्यावी.
शेतात वाकून काम करताना बिबट्या पाठीमागून हल्ला करण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी दक्ष राहावे.
♦ बिबट्या दिसल्यास अथवा हल्ला केल्यास तातडीने वनपरिक्षेत्र अधिकार्यांना कळवावे.
♦ सायंकाळच्या वेळेस घराच्या अंगणात किंवा परिसरामध्ये लहान मुलांना एकटे सोडू नये.
♦ शेतात राहत असल्यास अंगणात प्रकाश दिवे प्रखर लावावेत.
♦ कामावर जाताना मुलांना एकटे सोडू नका. त्यांची योग्य ती व्यवस्था लावावी.
♦ गुरे चारायला घेऊन जाताना समूहाने जावे. आपल्या पशुधनाची काळजी म्हणून गोठ्यात आवश्यक ती सुरक्षाव्यवस्था करावी.
16 नोव्हेंबर
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी श्री गुरुजी हॉस्पिटल, नाशिक येथे भेट देऊन रेस्क्यू ऑपरेशनमध्ये जखमी झालेल्या वनरक्षक संतोष बोडके व प्रवीण गोलाईत यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मंत्री महोदयांनी दोघांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक करत त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. जखमींची आरोग्यस्थिती व उपचारांबाबत हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकार्यांशी चर्चा करण्यात आली. या भेटीवेळी मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, सहाय्यक वनसंरक्षक प्रशांत खैरनार, वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ उपस्थित होते.
दि.20 नोव्हेेंबर
पहाटे नाशिक परिमंडळातील हनुमानवाडी-शिंदेमळा, मखमलाबाद रोड, पंचवटी येथे आप्पासाहेब शिंदे यांच्या गट क्र. 55 मधील पिंजर्यात अंदाजे 3-4 वर्षांची मादी बिबट्या सुरक्षितरीत्या रेस्क्यू करण्यात आली. बिबट्याला तत्काळ ताब्यात घेऊन प्राथमिक तपासणीसाठी व पुढील उपचारांसाठी वन्यप्राणी उपचार केंद्र, म्हसरूळ येथे हलविण्यात आले.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…