साधू-महंतांची मागणी; कुंभमेळ्यासाठी विक्रमी निधी दिल्याबद्दल मानले आभार
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने गेल्या 12 वर्षांत देशभरात झालेल्या कुंभमेळ्यांच्या तुलनेत सर्वाधिक निधी देऊन साधू-महंतांचा सन्मान केला आहे. याबद्दल आनंद आखाड्याचे अध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळा व पालकमंत्री गिरीश महाजन, प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आभार मानले. तसेच मंजूर निधीचा सुयोग्य वापर व्हावा, यासाठी सप्टेंबरअखेरपर्यंत विकासकामांना प्रत्यक्ष प्रारंभ करण्याची मागणी त्यांनी
केली आहे.
त्र्यंबकेश्वर येथील 10 आखाड्यांना 73 कोटी आणि सुमारे 100 आश्रमांना 30 कोटी असा एकूण 103 कोटींपेक्षा अधिक निधी सेवासुविधांच्या विकासासाठी उपलब्ध झाला आहे. इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात शासकीय सहकार्यातून विकासाची संधी प्राप्त झाल्याचे महंत शंकरानंद महाराज यांनी सांगितले.
सप्टेंबर 2026 अखेरपर्यंत कामांना सुरुवात झाल्यास मार्च 2027 पर्यंत प्रमुख विकासकामे पूर्ण होतील. त्यामुळे ऑक्टोबर 2026 ते मे 2027 असा 8 महिन्यांचा कालावधी कामांसाठी उपलब्ध होईल. या निधीतून नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात कायमस्वरूपी पायाभूत सुविधा निर्माण होऊन पर्यटनाला आणि स्थानिक रोजगाराला मोठी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला.
शासनाने गेल्या 12 वर्षांतील कुंभमेळ्यांच्या तुलनेत सर्वाधिक निधी देऊन अभूतपूर्व पाठबळ दिले आहे. त्यामुळे यंदाचा संस्कृतीचा उत्सव असलेला कुंभमेळा अधिक भव्यदिव्य होईल.
-महंत शंकरानंद सरस्वती महाराज, अध्यक्ष, आनंद आखाडा
Commence the approved development works by the end of September.