तंटामुक्त गाव योजना नावापुरतीच

गावोगावी वाद, तंटे मिटवण्यासाठी पुन्हा वाढली पोलिसांची डोकेदुखी

मुकणे : प्रतिनिधी
गावातील तंटे गावातच मिटावे, त्यासाठी पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ येऊ नये व पोलीस प्रशासनावरील कामाचा ताणही हलका व्हावा, हा उदात्त हेतू ठेवून राज्याचे तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी 15 ऑगस्ट 2007 रोजी महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू करून त्याची अंमलबजावणीही तितकीच जोमात सुरू झाली होती. मात्र सद्यस्थितीत हे अभियान फक्त नावापुरतेच शिल्लक राहिले आहे. पोलिसांसह प्रशासनालाही याचा विसर पडला की काय..? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. अनेक गावांमधील तंटामुक्त समित्यांच्या बैठका व कामकाज बंद पडले असून, केवळ नावापुरत्याच या समित्या शिल्लक राहिल्या आहेत.
महात्मा गांधी तंटामुक्त अभियानांतर्गत प्रारंभी प्रत्येक गावात ग्रामस्तरावर अध्यक्ष, सचिव व सदस्य अशा समित्या गठित केल्या. या समित्यांची निवड करतेवेळीच अध्यक्ष व सदस्य निवड प्रतिष्ठेची करून यावरूनच गावात तंटे निर्माण होण्याच्या घटनाही इगतपुरी तालुक्यात घडल्या आहेत. अध्यक्ष व सदस्य म्हणून आपापली वर्णी समितीवर लावल्यानंतर प्रत्यक्षात ज्या कारणासाठी समिती गठित केली गेली, त्या कारणाचा मात्र काही काळानंतर समितीलाच विसर पडल्याचा अनुभव दिसून आला.
सुरुवातीला इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांतील तंटामुक्त समित्यांचे उत्कृष्ट काम पाहून त्यांना बक्षीसही देण्यात आले. यामुळे काही काळ या समित्यांचे व इतरही समित्यांचे कामकाज थोडे वाढल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते. मात्र, आता या समित्यांच्या गावबैठकाही होतात की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. विशेष म्हणजे, महात्मा गांधी तंटामुक्त समितीत निमंत्रक म्हणून पोलीसपाटील व सचिव म्हणून ग्रामसेवक यांची नियुक्ती ही पदसिद्ध असते. त्यांनी प्रत्येक बैठकीचा लेखाजोखा ठेवणे, बैठक बोलावणे या बाबींकडे लक्ष ठेवणे गरजेचे असते. मात्र, याकडे त्यांच्यासह समितीच्या अध्यक्षाचीही उदासीनता दिसून येत असल्याने व ही समितीच कार्यान्वित आहे की नाही? हा प्रश्न असल्याने या समितीकडे साधा तक्रारी अर्ज द्यायलाही कुणी फिरकत नाही व समितीच्या बैठकीच्या किंवा तक्रार रजिष्टरवर सदस्य किंवा एकही पदाधिकार्‍यांच्या सह्याही गेल्या दोन वर्षांपासून झाल्या नसल्याने गावांमधील वादांचे प्रमाण वाढल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, वाडीवर्‍हे पोलीस ठाणे हद्दीत दोन महामार्ग, त्र्यंबकेश्वर व नाशिक तालुक्याच्या हद्दीतील काही गावे यामुळे वाढलेले कार्यक्षेत्र अपुरे कर्मचारी त्यामुळे वाढती गुन्हेगारी, वाढत्या चोर्‍या यावर अंकुश आणण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

स्वर्गीय गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गावाला तंटामुक्त करण्याबरोबरच पोलीस प्रशासनाचा ताण हलका करण्यासाठी 15 ऑगस्ट 2007 रोजी सुरू केलेले महात्मा गांधी तंटामुक्त अभियान सद्यस्थितीत थंडावलेले दिसून येत आहे. पोलीस यंत्रणा व प्रशासनाने या अभियानाला पुनरुज्जीत करणे गरजेचे असून, यामुळे गावोगावी शांतता टिकून गावातील तंटेही गावातच मिटवले जातील व पोलीस प्रशासनाचाही ताण हलका होईल व गावातील शांतता अबाधित राहील.
– हेमंत झोले, माजी सरपंच, शेनवड खुर्द

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *