संपादकीय

कटाक्ष:कॉंग्रेसच सामूहिक चर्वितचर्वण!

 

गेल्या आठ वर्षापासून केंद्रीय सत्तेपासून दूर असलेल्या आणि सध्या केवळ 52 खासदार असलेल्या कॉंग्रेसने आपल्या कार्यपद्धतीत बदल करून भाजपच्या पराभवासाठी सामूहिक प्रयत्न करावे, हे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे उद्गार योग्य आहेत.आणि हे सामूहिक प्रयत्न करण्यासाठी कॉंग्रेसनेच प्रयत्न केले पाहिजेत आणि सोनिया गांधींनी काळाची गरज ओळखून त्याची सुरुवात केली आहे.
जवळपास 55 वर्षे देशावर एकछत्री अंमल करणार्‍या कॉंग्रेसवर सध्या नामुष्कीची वेळ आली आहे. आणि यातून बाहेर पडण्याकरता भाजपविरुद्ध एकास एक लढत हा एकमेव उपाय आहे. आणि सामूहिक नेतृत्वाच सूतोवाच करताना सोनिया गांधीना तेच अभिप्रेत असावं असं वाटत.
1977 साली जेव्हा कॉंग्रेसचा देशात पहिला पराभव झाला तेव्हा आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली होती आणि कॉंग्रेस विरुद्ध एकास एक लढत दिल्यामुळे जनात पक्षाला 295 जागा मिळाल्या होत्या तर कॉंग्रेसला 154. मतांची विभागणी टाळली तर काय होऊ शकत हे देशाला दाखविणारा तो पहिला प्रयत्न होता. त्यावेळेस सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते कॉंग्रेस विरुद्ध! आज तीच गरज आहे भाजपविरुद्ध! हाच प्रयत्न 2019 ला केला असता तरीही त्याच फळ मिळालं असत. इतकच कशाला अगदी आत्ताच्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत सपा, बसपा आणि कॉंग्रेस आणि रालोद एकत्र आले असते तरीही राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या राज्यात वेगळा निकाल पाहायला मिळाला असता. पण बसपा या युतीत सामिल झाली नव्हती. अर्थात भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न कॉंग्रेसनेच केले पाहिजे.ते काम एखादया राज्यापुरता मर्यादित असलेल्या आप किंवा तृणमूल कॉंग्रेस च्या अरविंद केजरीवाल किंवा ममता बॅनर्जी यांचं नाही.ते काम नेहरू गांधी परिवारालाच करावं लागेल. त्यासाठी त्यांना स्वत:कडे कमीपणा घेऊन काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या 543 लोकसभेच्या एकास एक लढत द्यावी लागेल.त्यासाठी दिल्ली आणि पंजाब मध्ये हात पाय पसरलेल्या आप साठी कदाचित गुजरात मध्येही जागा सोडाव्या लागतील. ही मोट बांधताना बिजु जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती यासारख्या भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांपासुन समान दुरी ठेवणार्‍या प्रादेशिक पक्षांसमोर लोटांगण सुद्धा घालावं लागेल तर ते सुद्धा केलं पाहिजे. कारण हे केलं तर आणि तरच भाजपचा पराभव होऊ शकतो आणि पुन्हा एकदा नेहरू गांधी परिवाराकडे पंतप्रधानपद येऊ शकत. मीडियाद्वारे अथवा स्वत: हून आपल नाव पंतप्रधानपदासाठी कोणीही घोषित केल तरीही केजरीवाल,ममता बॅनर्जी किंवा 1991 पासून सतत पंतप्रधानपदासाठी सतत चर्चेत राहणारे शरद पवार पंतप्रधानपदाचे सर्वमान्य उमेदवार होऊ शकत नाहीत.
एकाच परिवारात केवळ एक उमेदवार देण्याची सोनिया गांधींच्या घोषणेच स्वागत केलं पाहिजे. पण याची सुरुवात त्या स्वत: च्या परीवारापासून करणार का? प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वत: सोनिया गांधी 2024 ची निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. त्यांची जागा त्या प्रियांका गांधींनाच देणार. अर्थात त्यांच्याच परिवारात राहुल , प्रियांका हे दोन उमेदवार असतील. तरीही आपण या घोषणेच स्वागत केलं पाहिजे. कारण भाजपचा कॉंग्रेस वरचा सर्वात मोठा आरोप म्हणजे परिवार वादाचा आहे.एक परिवार एक उमेदवार या तत्त्वामुळे याला बर्‍याच प्रमाणात खिळ बसू शकते. कॉंग्रेसमधील असे अनेक परिवार नवीन मध्यममार्गी विचारांच्या लोकांना आपल्यात येऊ देत नाही. कारण त्यांना आपल्या परिवाराचे महत्त्व कमी होण्याची भीती वाटते. नेहरू गांधी परिवाराने देशासाठी त्याग केला आहे. पण असा कुठलाही त्याग न करता सत्तेची फळे, लाल दिव्याची गाडी आपल्या परिवारात ठेवणारे अनेक परिवार कॉंग्रेसमध्ये अनेक राज्यात विखुरलेले आहेत. सत्ता नसताना त्यातील अनेकांनी दुसर्‍या पक्षात उड्याही घेतल्या.या सर्वांवर अंकुश ठेवणार हे वाक्य. प्रत्येक व्यक्तीने पक्षाचे काम किमान पाच वर्षे केलच पाहिजे हाही त्यातलाच नाव नियम. या सर्व शिफारसी योग्य आहेत.पण तंतोतंत अमलात आणल्या गेल्या पाहिजेत.ज्या राजस्थानच्या उदयपूर मध्ये हे विचार मंथन शिबिर पार पडले त्या राजस्थान मध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातुन विस्तव जात नाही. तीच गोष्ट छत्तीसगडचे मुखयमंत्री भूपेश बघेल आणि आरोग्य मंत्री टी एस सिंगदेव यांच्यात आहे.पंजाब प्रमाणेच या दोन राज्यातील सत्ता गमावण्याची नामुष्की टाळायची असेल तर कॉंग्रेसला आपल उर्वरित घर नीट ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतरच इतर भाजप विरोधी पक्षांना एकत्र घेऊन सामूहिक प्रयत्नांद्वारे भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल.
लोकसभेच्या निवडणुका अजून दोन वर्षे दूर आहेत. दरम्यान गुजरात सारख्या राज्याच्या निवडणुका आहेतच. अर्थात भाजप विरुद्ध सामूहिक आघाडी उघडण्यास भरपूर वेळ आहे. जम्मू काश्मीर मध्ये यासाठी कॉंग्रेसला एकच वेळी अब्दुल्ला परिवार आणि मेहबूबा मुफ्ती या नॅशनल कॉन्फरंस आणि पिडीपी या दोन्ही पक्षांशी बोलावे लागेल.पंजाब आणि दिल्ली साठी आपशी बोलणे करावे लागेल. महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार सूरू असतानाही प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे ज्या पद्धतीने शरद पवारांवर शरसंधान करत आहेत ते चूक आहे. त्यामुळे मूळ भाजपचे असलेल्या या नानाना आवर घालावा लागेल. तर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याशी मैत्रीचा हात पुढे करण आवश्यक आहे. ममता बॅनर्जींना बंगालच्या बाहेर फारस महत्त्व देणं अयोग्य आहे.समाजवादी आणि डाव्या
विचारांच्या नेत्यांना कॉंग्रेसने आपल्या बरोबर घेणं आवश्यक आहे. शिवसेनेसारख्या पक्षाला त्यांची हिंदुत्वाशी असलेली जवळीक पाहता योग्य महत्त्व देणं आवश्यक आहे.मला याक्षणी जनसंघाशी प्रायोगिक तत्त्वावर युती करण्याचा डॉ राम मनोहर लोहिया यांच्या प्रस्तावाला विरोध करणारे मधू लिमये आठवतात. शेवटी मधू लिमयेनी लोहियांच्या प्रस्तावाला मान्यता दिली. आज समाजवादी, डाव्या, प्रादेशिक विचारांच्या पक्षांची मोट बांधण्याचे अत्यंत जिकीरीचे काम कॉंग्रेसला करायचे आहे. नोटबंदी, कोरोना काळातील अनेक प्रश्न, महागाई यामुळे त्रासून गेलेली जनता भाजपला अर्थात मोदींना पर्याय उपलब्ध करून देण्यास तयार आहे.मात्र जनतेला तसा सबळ पर्याय दिला पाहिजे. 1977 ची पुनरावृत्ती 2024 ला होऊ शकते.जर भाजपविरुद्ध आघाडी उघडण्याची सुरुवात उदयपूरपासून केली तर! तूर्तास इतकेच!
जयंत माईणकर

 

Ashvini Pande

Recent Posts

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन

नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…

11 hours ago

शिंदे टोलनाक्यावर कारला आग

शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…

13 hours ago

मनपा आयुक्त पदाबाबत मोठा ट्विस्ट, कार्डिलेची बदली रद्द, मनीषा खत्री यांची नियुक्ती

नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…

18 hours ago

दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक

दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…

22 hours ago

नाशिक मनपा आयुक्तपदी राहुल कर्डीले

नाशिक: प्रतिनिधी महापालिका आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी वर्धा येथील जिल्हाधिकारी…

3 days ago

महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनित नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

बराजकमल एंटरटेनमेंट'ची दमदार घोषणा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनित नवा मराठी चित्रपट…

3 days ago